पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करून त्यांची धुलाई करणारा एकमेव पंतप्रधान

तीनवेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसलेले नवाझ शरीफ म्हणजे राजकारणातील एक न उलगडलेलं कोडं. फक्त नावालाच शरीफ असलेले नवाज पाकिस्तानमध्ये लष्करशाही विरुद्ध लढून लोकशाही आणणारा नेता अशी फुशारकी जगभर मारत असतात मात्र त्यांच्याच काळात पाक मधला दहशतवाद कसा वाढला याच उत्तर ते कधी देताना दिसत नाहीत.

मिठू मियाँ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवाझ शरीफ यांच्या लोकशाहीवादी चेहऱ्याला भलेभले फसलेले आहेत. त्यांच्याच गोड बोलण्यावर आपल्या वाजपेयींनी विश्वास ठेवला होता, एवढंच काय तर इट का जवाब पथ्थर से असं म्हणणारे मोदीजी सुद्धा नवाज शरीफ यांचा बड्डे सेलिब्रेट करायला पाकिस्तानला गेले होते.

एकच पंतप्रधान होऊन गेला ज्याने नवाज शरीफ ला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं,

ते होते चंद्रशेखर 

युपीच्या गरीब कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर म्हणजे मोकळं ढाकळ व्यक्तिमत्व. इरसाल शेतकरीगडी. औपचारिकता राजशिष्टाचार असल्या गोष्टीत ते कधीच पडले नाहीत. आपल्याला पटेल तस वागणं आणि समोरचा चुकीचा वागत असेल तर त्याला तिथल्या तिथे समजावून सांगणं हा फटकळपणा पंतप्रधान झाल्यावर ही त्यांनी टिकवून धरला होता आणि याचाच फटका नवाज शरीफ यांना सुद्धा बसला होता.

झालं असं होतं पंतप्रधान बनल्यावर काहीच दिवसातच त्यांना सार्क परिषदे साठी मालदीवला जावं लागलं. दक्षिण आशियातले सगळे देश येणार म्हटल्यावर पाकिस्तान पण त्यात होता. मियाँ नवाज पण होते. या सार्क परिषदेमध्ये चंद्रशेखर यांनी हिंदीमध्ये जोरदार भाषण केलं. 

पाकिस्तान आपला सख्खा शत्रू, त्यामुळे शरीफ यांचं चन्द्रशेखर यांच्या भाषणा कडे लक्ष होतच. चन्द्रशेखर यांच भाषण झाल्यावर त्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यात शरीफ पण होते. त्यांना देखील हे भाषण खूप आवडलं, त्यांनी शेजारी बसलेल्या आपल्या सेक्रेटरीला म्हणाले,

” काश तुम भी मेरे लिए इतना अच्छी तक़रीर लिखते.”

यावर त्यांचा सेक्रेटरी रियाज़ खोखड़ याने त्यांना सांगितलं कि चन्द्रशेखर हे कोणी लिहून दिलेलं नाही तर कोणताही कागद न घेता उत्स्फूर्तपणे भाषण करत होते. हे ऐकल्यावर मिया नवाज वरमले. पण त्यांना चन्द्रशेखर यांच्यावर कुरघोडी करायचीच होती.

त्याकाळात काश्मीरमधली अशांतता भडकायला सुरवात झाली होती. तिथला मुद्दा ऐरणीवर आला होता. नवाज शरीफ यांनी आपल्या भाषणात काश्मीरचा प्रश्न काढला आणि पाकिस्तानचे काश्मीरचे नाते, अधिकार वगैरेचा उल्लेख केला .

पुढे जेव्हा भाषणे वगैरे झाल्यावर दोन्ही पंतप्रधान संमेलनात एकमेकाला भेटले. तेव्हा शरीफ यांनी त्यांना भाईजान म्हणत घोळात घेण्यास सुरवात केली. त्यावेळच्या अनौपचारिक गप्पांमध्ये पुन्हा काश्मीरचा विषय निघाला. तेव्हा चन्द्रशेखर त्यांना म्हणले,

“जर तुम्हाला काश्मीर हवाय तर घेऊन टाका. “

मियाँ नवाज खुश झाले. हा धोतर शर्ट घालणारा गावंढळ पंतप्रधान आपल्या घोळात आलाय असच त्यांना वाटू लागलं. पण चन्द्रशेखर यांनी पुढच्या एका वाक्यात त्यांचा फुगा फोडून टाकला. ते म्हणाले,

“काश्मीर हवा असेल तर घ्या पण त्यानंतर भारत हा सेक्युलर देश राहणार नाही, काश्मीर सोबत भारतात इतरत्र राहणारे १५ कोटी मुसलमान देखील तुमच्या देशात येतील. त्यांना पोसण्याची ऐपत आहे का तुमची ?”

मियाँ नवाजच्या लक्षात आलं हा गावचा गडी आपल्याला झेपणारा नाही. पुन्हा काश्मीरचा विषय त्याने बोलताना काढला नाही.

असाच एक प्रसंग त्यांचे तत्कालीन प्रधान सचिव एसके मिश्रा यांनी एकेठिकाणी सांगितला आहे. 

झालं असं होतं की काश्मीर मधल्या गुलमर्ग येथून अतिरेक्यांनी काही स्वीडिश इंजिनियर्सचं अपहरण केलं होतं. तेव्हा स्वीडनचे राजदूत एसके मिश्रा यांच्याकडे आले व त्यांनी भारत सरकारने यात मदत करावी अशी मागणी केली.

चन्द्रशेखर यांना हे कळालं, त्यांनी लगेच हॉटलाईनवरून नवाज शरीफ यांना फोन केला. सिर्फ यांनी त्यांना फोनवर खैरीयत वगैरे विचारली तर चंद्रशेखर त्यांना थेट म्हणाले,

“भाईजान, आप क्या बदमाशी कर रहे हैं?’

नवाज़ शरीफ़ला तर काही कळेना काय झालंय. त्यांनी ‘मैंने क्या गुस्ताख़ी कर दी?’ असं विचारलं. चंद्रशेखर यांनी त्यांना तुम्ही निरपराध  स्वीडिश इंजिनियरांचं अपहरण केले असल्याचा आरोप केला. नवाज़ शरीफ़ यावर साजूक यावा आणत म्हणाले ,

‘मैंने भी इसके बारे में सुना है. ये आतंकवादियों का काम है. हमारा इससे कोई लेना देना नहीं.’

आता मात्र चंद्रशेखर यांनी बोलण्यात जास्त वेळ न घालवता त्यांना थेट सांगितलं,

‘भाईजान, दुनिया को दिखाने के लिए आप जो कुछ कहें लेकिन हम और आप दोनों जानते हैं कि असलियत क्या है. हमें मानवीय पक्ष की अनदेखी नहीं करनी चाहिए.’

मियाँ नवाजच्याच गोड भाषेत त्याला भारताचे पंतप्रधान धमकी देत होते. या धमकीचा घ्यायचा तो योग्य समज नवाज शरीफ यांनी घेतला आणि अगदी काही दिवसात त्या स्वीडिश इंजिनियर्सची सुटका अतिरेक्यांनी केली. हि सुटका कशी झाली याबद्दल कधी पेपर मध्ये छापून आलं नाही ना या बद्दल स्वीडनच्या राजदूतांना काही सांगण्यात आलं.

पुढे काही दिवसांनी एसके मिश्रा पाकिस्तानच्या हाय कमिशनर यांना भेटले तेव्हा त्यांनी हा किस्सा ऐकल्यावर हसत हसत हा योगायोग झाला असेल असं सांगितलं. पण त्यांनाही माहित होतं हा काही योगायोग नव्हता. भारताच्या पंतप्रधानांनी शरीफ याना बरोबर धडा शिकवला होता.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.