आजही म्हणतात, लगानमधला ‘कचरा’ भागवत चंद्रशेखरांच्या फिरकीवरुन सुचलाय…

लगान पिक्चर पाहिलाय का? त्यातला जितका भुवन लक्षात राहतो, त्याची मड्डम लक्षात राहते, तसाच कचराही लक्षात राहतो. त्याकाळच्या कुप्रथेनुसार त्याला अस्पृश्य दाखवलं होतं, त्याचं नावही कचरा असं ठेवलेलं. मात्र भुवनच्या आग्रहामुळं कचरा टीममध्ये येतो आणि आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लिश टीम नाचवतो.

पिक्चरमध्ये ही किमया दाखवलीय कचराच्या पोलिओ झालेल्या हाताची. लगान रिलीझ होऊन कित्येक वर्ष उलटली असली, तरी आजही लगानची स्टोरी खरंच घडलेली का असं विचारलं जातं. अशी कुठली मॅच झाल्याचा पुरावा इतिहासात मिळत नसला, तरी आपल्या दिव्यांगतेवर मात करत, त्यालाच आपली ताकद बनवणारा असामान्य खेळाडू भारताच्या मातीत घडलाय.      

ही कहाणी क्रिकेटविश्वातल्या त्याच असामान्य खेळाडूची.

हा खेळाडू म्हणजे बी. एस. चंद्रशेखर.

अगदी लहान वयात पोलिओ झाल्यामुळे त्यांचा एक हात काहीसा निकामी झाला. पण पुढे याच हाताचा वापर करून त्यांनी प्रख्यात गोलंदाज म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये नाव कमावलं.

बी. एस. चंद्रशेखर यांचं पूर्ण नाव भागवत सुब्रमण्य चंद्रशेखर.

१७ मे १९४५ ला म्हैसूरला त्यांचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचा उजवा हात पोलिओ मुळे निकामी झाला. पुढची तब्बल ५ वर्ष ते असेच जगत होते. वयाच्या १० व्या वर्षी त्यांच्या उजव्या हातात थोडी सुधारणा झाली. परंतु हात पूर्णपणे बरा झाला नाही. तो काहीसा अशक्तच राहिला.

वयाच्या १० व्या वर्षी ते कुटुंबासोबत बंगलोरला येऊन स्थायिक झाले. चंद्रशेखर मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळण्यात रमायचे. रबरी बॉलनं खेळण्याऐवजी लेदरबॉलनं खेळायला मिळावं, म्हणून त्यांनी स्थानिक क्रिकेट स्पर्धा खेळायला सुरुवात केली. त्या वेळेस भारतासाठी खेळण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला नव्हता.

सुरुवातीला ते फास्ट बॉलर होते. ऑस्ट्रेलियाचे महान लेग स्पिनर रीची बेनाॅ हे चंद्रशेखर यांचे आदर्श. त्यांचा प्रभाव म्हणून असेल, पण १९६३ दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की, फास्ट बॉलरपेक्षा आपण उत्तम लेग स्पिनर बनू शकतो. हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कारण लेग स्पिनर म्हणून त्यांची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली.

पोलिओ झालेल्या हाताचा गोलंदाजीत केला वापर

१९६४ साली इंग्लंड विरुध्दच्या सामन्यापासून चंद्रशेखर यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त १९. सपकन आत घुसणाऱ्या लेग स्पिनमुळे चंद्रशेखर अल्पावधीतच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य आधार बनले.

१९६० ते १९७० दरम्यान चंद्रशेखर, बिशन सिंग बेदी, इरापल्ली प्रसन्न, वेंकट राघवन हे भारतीय शिलेदार जागतिक क्रिकेटमधले उत्कृष्ट स्पिनर म्हणून ओळखले जात होते.

हे चौघं त्यावेळेस ‘स्पिन क्वाट्रेट’ म्हणून भारतीय क्रिकेट जगतात आणि चांडाळ चौकडी म्हणून प्रतिस्पर्धी फलंदाजांमध्ये लोकप्रिय होते.

कारण या चौघांसमोर त्यावेळेस इतर देशांतील भले भले फलंदाज बाद व्हायचे. इतका या चौघांचा दबदबा होता. जो उजवा हात पोलिओमुळे काहीसा अशक्त होता, त्याचाच वापर चंद्रशेखर यांनी गोलंदाजीत केला.

भारताने इंग्लंडवर पहिल्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला तो चंद्रशेखर यांच्यामुळे

एखाद्या टीमला त्यांच्या देशात जाऊन हरवणं, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. असाच एक क्षण भारतीय क्रिकेट संघाच्या वाट्याला आला. ज्याचं क्रेडिट चंद्रशेखर यांना दिलं पाहिजे. ते साल होतं १९७१. तीन वर्ष एका अपघातामुळे मैदानाबाहेर राहिलेले चंद्रशेखर १९७१ साली भारतीय संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना झाले. इंग्लंड संघ त्यांच्याच होम ग्राउंडला खेळत असल्याने फॉर्मात होता.

परंतु त्यांचा सगळा फॉर्म चंद्रशेखर यांनी उतरवला. फक्त ३८ रन्स देत त्यांनी ६ विकेट काढल्या. यामुळे इंग्लंडची टीम १०१ धावांमध्ये गारद झाली. भारतीय क्रिकेट संघाने प्रथमच इंग्लंडला त्यांच्याच ग्राऊंडवर हरवून ऐतिहासिक विजय नोंदवला. पुढे १९७३ साली भारतीय क्रिकेट संघाने चंद्रशेखर यांच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला भारतात हरवलं.

ऑस्ट्रेलियाने दिलेली अनोखी भेट

पोलिओमुळे उजव्या हातात शक्ती कमी आणि त्यात बॅटिंगचा फारसा अनुभव नसल्यानं चंद्रशेखर बॅटिंगला आले की लवकर बाद व्हायचे.

एकदा १९७७-७८ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने त्यांना एक अशी बॅट भेट म्हणून दिली, ज्या बॅटमध्ये एक छिद्र होते. याचं कारण असं की, या दौऱ्यावर ते लागोपाठ ४ वेळा शून्यावर बाद झाले. पण गोलंदाजीमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. म्हणून ऑस्ट्रेलिया संघातर्फे ही अनोखी भेट त्यांना देण्यात आली.

आपल्या करियरमध्ये त्यांनी १९७६ साली न्यूझीलंड बरोबर एकमेव वनडे सामना खेळला. १९७९ साली इंग्लंडविरुद्ध अखेरची टेस्ट मॅच खेळून ते रिटायर झाले. त्यांनी २४२ विकेट घेतल्या.

कधी त्यांच्याही मनात विचार आला असेल, की आपलं दिव्यांगत्व आपल्या प्रगतीमधला अडथळा ठरेल, काहीसा धोकादायक आणि प्रचंड शारीरिक श्रमाचा हा खेळ आपण खेळू नये, पण त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही आणि नशिबानं हवी तशी फिरकी घेतलीच, ज्या फिरकीनं पोलिओला क्लीनबोल्ड केलं आणि चंद्रशेखर यांना अजरामर.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.