पोलिओ झालेल्या हाताचा वापर करून त्यांनी जगाला फिरकीच्या तालावर नाचवलं..

क्रिकेटच्या दुनियेत अनेक असे खेळाडू झाले आहेत, ज्यांनी चमकदार कामगिरी करून क्रिकेटच्या विश्वात स्वतःचं नाव कोरलं आहे. हे खेळाडू जरी रिटायर झाले तरी क्रिकेटच्या इतिहासात त्यांचं नाव ठळक शब्दांमध्ये लिहिलं जातं.

ही कहाणी क्रिकेटविश्वातल्या अशाच एका खेळाडूची.

हा खेळाडू म्हणजे बी. एस. चंद्रशेखर.

अगदी लहान वयात पोलिओ झाल्यामुळे त्यांचा एक हात काहीसा निकामी झाला. पण पुढे याच हाताचा वापर करून त्यांनी प्रख्यात गोलंदाज म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये नाव कमावलं.

आज जी माणसं शारीरिक व्याधींमुळे नाउमेद होतात, त्यांच्यासाठी बी. एस. चंद्रशेखर यांची कहाणी प्रेरणादायक आहे.

बी. एस. चंद्रशेखर यांचं पूर्ण नाव भागवत सुब्रमण्य चंद्रशेखर.

१७ मार्च १९४५ रोजी मैसूर येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचा उजवा हात पोलिओ मुळे निकामी झाला. पुढची तब्बल ५ वर्ष ते असेच जगत होते. वयाच्या १० व्या वर्षी त्यांच्या उजव्या हातात थोडी सुधारणा झाली. परंतु हात पूर्णपणे बरा झाला नाही. तेव्हा कोणाला कल्पना पण नसावी, की अशक्त झालेला हा उजवा हात पुढे त्यांना गोलंदाजीमध्ये उपयोगी पडणार आहे.

वयाच्या १० व्या वर्षी ते कुटुंबासोबत बंगलोरला येऊन स्थायिक झाले. आपण जसे लहानपणी गल्ली क्रिकेट खेळण्यात चॅम्पियन असतो तसंच चंद्रशेखर मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळायचे. रबरी बॉलने खेळण्या ऐवजी लेदरच्या बॉलने खेळायला मिळेल, म्हणून त्यांनी स्थानिक क्रिकेट स्पर्धा खेळायला सुरुवात केली. त्या वेळेस भारतासाठी खेळण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला नव्हता.

आणि भारतीय क्रिकेट संघात झाली निवड…

जेव्हा हा लेख वाचायला सुरुवात केली असेल, तेव्हा खूप जणांच्या डोक्यात आपल्या हाताचा वापर करून बॉल स्पिन करणारा ‘लगान’ मधला कचरा आठवला असेल. अर्थात ते एका सिनेमातलं पात्र आहे. पण इथे खऱ्या आयुष्यात चंद्रशेखर यांनी पोलिओ झालेल्या याच हाताचा वापर करून भारतीय क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली.

सुरुवातीला ते फास्ट बॉलर होते. ऑस्ट्रेलियाचे महान लेग स्पिनर रीची बेनाॅ हे चंद्रशेखर यांचे आदर्श होते. त्यांचा प्रभाव म्हणा.. १९६३ दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की, फास्ट बॉलर पेक्षा आपण उत्तम लेग स्पिनर बनू शकतो. हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. पुढे एक लेग स्पिनर म्हणून त्यांची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली.

पोलिओ झालेल्या हाताचा गोलंदाजीत केला वापर

१९६४ साली इंग्लंड विरुध्दच्या सामन्यापासून चंद्रशेखर यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं वय होतं १९. कुशल अशा लेग स्पिन गोलंदाजीमुळे चंद्रशेखर अल्पावधीत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य आधार झाले.

१९६० ते १९७० दरम्यान चंद्रशेखर, बिशन सिंग बेदी, प्रसन्न, वेंकट राघवन हे भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट स्पिनर गोलंदाज होते.

हे चौघं त्यावेळेस ‘स्पिन क्वाट्रेट’ म्हणून क्रिकेट जगतात लोकप्रिय होते.

या चौघांसमोर त्यावेळेस इतर देशांतील भले भले फलंदाज बाद व्हायचे. इतका या चौघांचा दबदबा होता. जो उजवा हात पोलिओमुळे काहीसा अशक्त होता, त्याचाच वापर चंद्रशेखर यांनी गोलंदाजीत केला.

भारताने इंग्लंडवर पहिल्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला तो चंद्रशेखर यांच्यामुळे

एखाद्या टीमला त्यांच्या देशात जाऊन हरवणं, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. असाच एक क्षण भारतीय क्रिकेट संघाच्या वाट्याला आला. ज्याचं क्रेडिट चंद्रशेखर यांना दिलं पाहिजे. ते साल होतं १९७१. तीन वर्ष एका अपघातामुळे मैदानाबाहेर राहिलेले चंद्रशेखर १९७१ साली भारतीय संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना झाले. इंग्लंड संघ त्यांच्याच होम ग्राउंडला खेळत असल्याने फॉर्मात होता.

परंतु त्यांचा सगळा फॉर्म चंद्रशेखर यांनी उतरवला. केवळ ३८ धावा देत त्यांनी ६ विकेट पटकावले. यामुळे इंग्लंडची टीम १०१ धावांमध्ये गारद झाली. यामुळे भारतीय क्रिकेट संघाने प्रथमच इंग्लंडला त्यांच्याच ग्राऊंडवर हरवून हा ऐतिहासिक विजय नोंदवला. पुढे १९७३ साली भारतीय क्रिकेट संघाने चंद्रशेखर यांच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला भारतात हरवले.

ऑस्ट्रेलियाने दिलेली अनोखी भेट

खूपदा असं असतं की, तळाच्या फलंदाजांना बॅटिंग एवढी करता येत नाही. हे फलंदाज बॉलर्स असल्याने बॅटिंग करताना त्यांची भंबेरी उडते. आता हे चित्र पालटलं असलं तरी पूर्वी असं नव्हतं. पोलिओ मुळे उजव्या हातात शक्ती कमी, आणि त्यात बॅटिंगचं इतकं ज्ञान नाही यामुळे चंद्रशेखर बॅटिंगला आले की लवकर बाद व्हायचे.

चंद्रशेखर एकदा १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने त्यांना एक अशी बॅट भेट म्हणून दिली, ज्या बॅटमध्ये एक छिद्र होते. याचं कारण असं की, या दौऱ्यावर ते लागोपाठ ४ वेळा शून्यावर बाद झाले. पण गोलंदाजीमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. म्हणून ऑस्ट्रेलिया संघातर्फे ही अनोखी भेट त्यांना देण्यात आली.

तर अशी होती भागवत चंद्रशेखर यांची कहाणी. संपूर्ण करियरमध्ये त्यांनी १९७६ साली न्यूझीलंड बरोबर एकमेव वनडे सामना खेळला. १९७९ साली इंग्लंडविरुद्ध अखेरची टेस्ट मॅच खेळून ते रिटायर झाले. त्यांनी संपूर्ण करियरमध्ये एकूण २४२ विकेट घेतल्या. स्वतःच्या शारीरिक व्यंगाचा स्वतःच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी वापर कसा करायचा, हे भागवत चंद्रशेखर यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.