फौंड्री कामगार ते मालक आणि फुटबॉलपटू ते आमदार असा चंद्रकांत जाधव यांचा प्रवास आज थांबलाय!

चंद्रकांत जाधव (अण्णा)…कोल्हापूर उत्तरचे आमदार….आज गेले.

पण आपल्या छोट्याश्याच कारकिर्दीत कोल्हापुरी जनेतच्या मनात घर करून गेले. दारात आलेल्या कोणत्याही माणसाला कधीच मोकळ्या हाताने परत पाठवले नाही जाधवांनी. मग ते तरुण मंडळ असो, सामाजिक संघटना असो की फुटबॉल संघ. कोणताही स्वार्थ न ठेवता सर्वांना मदत करणारा व्यक्ती असा त्यांचा नावलौकिक होता.

कोल्हापूर शहराचे सलग दहा वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना पंधरा दिवसात आजीचे माजी करणारे चंद्रकांत जाधव 2019 च्या विधानसभेचे आमदार. फौंड्री कामगार ते फौंड्री मालक आणि फुटबॉलपटू ते आमदार असा जाधव यांचा प्रवास त्यावेळी कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरला होता.

शतकी परंपरा लाभलेला कोल्हापूरचा फुटबॉल आणि इथले जगावेगळे फुटबॉलप्रेमी प्रसिध्द आहे. राजकारणातही फुटबॉलपटूंचा मोठा वावर राहिलेला आहे. अनेक फुटबॉलपटूंनी महापालिकेच्या महापौर व नगरसेवकपदांची धुरा सांभाळली आहे. फुटबॉलपटूंच्या या परंपरेत थेट विधानसभेत मजल मारली ती चंद्रकांत जाधव यांनी. 

जाधवांचा आवडता खेळ फुटबॉल. त्यामुळे आयटीयआयच्या राज्य फुटबॉल स्पर्धेतही खेळू लागले. आयटीआय राज्याच्या फुटबॉल स्पर्धेतला हुकमी एक्काही ठरले. त्यांच्या फुटबॉल खेळाची बालवाडीच असलेल्या पाटाकडील तालीम संघाकडून ते खेळू लागले. आणि तरुणाईतला एक दमदार फुटबॉल हिरो ठरले. त्यांच्या जाधव इंडस्ट्रीमध्ये ते ‘ऑल इन वन’ होतेच.

महापालिकेच्या निवडणुकीत ते थेट उतरले नाहीत. १९८५ मध्ये त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली. पण त्यांना ऐनवेळी बाजूला केले गेले. भाऊ संभाजी जाधव यांना त्यांनी तीन वेळा निवडून आणले.

भाजपच्या तिकिटावर पत्नी आणि भावालाही निवडून आणले. विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने आग्रह करून उमेदवारी दिली. आणि वीस दिवसांच्या कमी कालावधीतच थेट विजयालाच गवसणी घातली.

पुढे २०२० मध्ये कोरोना आल्यामुळे आमदार म्हणून तसा त्यांना कमी कलावधीच मिळाला. पण कोल्हापुरात हल्लीच एक घटना घडली होती, ज्यातून ते लोकप्रतिनिधी असणं कसं समर्पक ठरत होते ते दिसलं. 

तर कोल्हापूर शहरात एन्ट्री करताना जी स्वागत कमान लागते त्या कमानीवरचे होर्डिंग भाड्याने दिले होते. त्यावर ‘संजय घोडावत युनिव्हर्सिटी’ असा बोर्ड होता. कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि ती व्हायरल झाली, त्याला विरोध होऊ लागला.

पुढच्या दिवशी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन तो बोर्ड हटवला आणि दुसरा लावला. यावर आमदार जाधव यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन संबंधित होर्डिंग ठेकेदाराला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि त्या स्वागत कमानवरील होर्डिंग एक वर्षासाठी बुक केलं. त्यावर लिहले गेलं

‘राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’ ‘सहर्ष स्वागत’

कोणाचेही नुकसान करायचे नाही, स्टंटबाजी तर अजिबात नाही, समन्वयाने व सामंजस्याने प्रश्न सोडवायचा ही त्यांची भूमिका असायची. स्वतः एक नामवंत उद्योजक असल्यामुळे प्रत्येक काम दर्जेदार कसे होईल, त्यामध्ये पैसे कसे वाचतील याबाबत प्रशासनाला ते कायम सूचित करायचे.

त्यामुळंच संपूर्ण कोल्हापूरच्या मुखात एकच वाक्य आहे आज..

‘चांगला माणूस होता’

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.