इंग्लंडचा पाऊस धावून आला अन् भारतीय बॉलरने एकाच फलंदाजाला ३ मिनिटांत दोनदा आऊट केलं
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ खेळली जात आहे. आणि या प्रथम चॅम्पियनशीप चा फायनल सामना काल इंग्लंड येथे सुरु झाला. भारत विरुध्द न्यूझीलंड असा हा सामना खेळला जात आहे. पण सामना सुरु होण्याच्या आदल्या दिवशीच इंग्लंडमध्ये पाऊस सुरु झाला व सामन्यावर पावसाचे संकट उभे राहिले. पहिल्यांदाच खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप मध्ये पावसाचे सावट पाहून सर्व क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. काल व आज या दोनही दिवसात खेळल्या गेलेल्या खेळात पावसाने व्यत्यय आणला आहे.
जर असाच हा पाऊस चालु राहिला तर ह्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला एक ठोस असा विजेता मिळणार नाही सामना ड्रॉ होण्याची शक्यता जास्त आहे.
ह्या आधीपण अश्या बऱ्याच सामन्यात पावसाने व्यत्यय आणुन सामने रद्द केले आहेत. बरेच अटीतटीचे राहिलेले सामने देखील पावसामुळे रद्द केले गेले आहेत . पण एकेकाळी ह्याच पावसामुळे एका भारतीय गोलंदाजांने इंग्लंड येथे खेळल्या गेलेल्या प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यात एकाच फलंदाजाला तीन मिनिटांत दोनदा आऊट केले होते.
तर झाल अस होत की, १९४६ साली भारत देश जेव्हा स्वातंत्र्याची तयारी करत होता तेव्हाच भारतीय क्रिकेट संघ हा इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला होता.
ह्या दौऱ्यात २९ प्रथमश्रेणी क्रिकेट सामने आणि इंग्लंड विरूद्ध भारत असे ३ टेस्ट सामने खेळले जाणार होते. वेस्ट इंडिजच्या १९३९ च्या दौऱ्यानंतर भारत हा पहिलाच संघ होता जो इंग्लंड दौऱ्यावर जाणार होता.
पतौडीचे नवाब इफ्तिखार अली खान यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपल्या १६ सदस्यांना घेऊन इंग्लंड दौऱ्यावर आला होता. पतौडी हे असे खेळाडू होते जे १९३० मध्ये इंग्लंड कडून सुद्धा खेळलेले होते.
सर्वप्रथम २९ प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळले जाणार होते. मे ते सप्टेंबर या कालावधीत हा भव्य दौरा खेळला जाणार होता. ह्याच दौऱ्यात ८ जुन १९४६ रोजी भारत विरुध्द ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लब असा एक प्रथमश्रेणी सामना कार्डिफ येथे खेळला गेला होता. ह्या सामन्यात पावसाने बराच धुमाकूळ घातला होता. पावसामुळे सामन्याचा बराच वेळ वाया गेला होता.
तर ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लबचा शेवटचा फलंदाज पिटर जज हा फलंदाजी करत होता. पिटर जज हा पाहिल्या डावातला ११ वा खेळाडू होता. आणि भारताचा ऑल राऊंडर खेळाडू चंदू सरवटे हा गोलंदाजी करत होता.
चंदु सरवटेनी पिटर जज ह्या शेवटच्या खेळाडूला आऊट केले आणि ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लबवर फॉलो ऑनची पाळी आली. पण आधीच पावसामुळे या सामन्यातील भरपुर वेळ वाया गेला होता. त्यामुळे उरलेल्या वेळात प्रेक्षकांना जास्तीत जास्त खेळ पाहता यावा म्हणून दोन्ही टीमच्या कर्णधारांनी क्रिकेटचे नियम बाजुला ठेवत वेळ वाचविण्याचे धोरण आखले.
आखलेल्या धोरणानुसार फॉलो ऑन पडल्यानंतर कोणीही मैदान सोडले नाही. १० मिनिटाचा आराम करून परत खेळ सुरु झाला. शेवट आऊट झालेला पिटर जज ह्यानेच फलंदाजीला सुरुवात केली. म्हणजे खेळ जिथे थांबला तिथुनच पुन्हा सुरु करण्यात आला. भारताने गोलंदाजी सुद्धा चंदु सरवटे याच्याकडेच दिली. पाहिल्या डावात चंदूनेच पिटर जजची विकेट घेतली होती. आणि दुसऱ्याही डावात चंदु सरवटेनीच परत त्याला अवघ्या तीन मिनिटांच्या कालावधीत आऊट करून परत धाडले.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झाल होत. आणि याच पुर्ण श्रेय जात ते फक्त पावसाला.
- कपिल जाधव
हे ही वाच भिडू.
- नवाब पतौडीच्या चुकीमुळे डाकुंनी टिम इंडियाचं अपहरण केलं होतं.
- मॅचच्या दरम्यान पाऊस मदतीला आला आणि पाकिस्तानने १९९२चा वर्ल्ड कप जिंकला.
- हे आहेत गणिताचे दोन मास्तर एकाच नाव डकवर्थ आणि दूसऱ्याचं लुईस