निर्दयी चंगेज खानने अनेक देश उध्वस्त करून ४ करोड लोकांचा जीव घेतला..

जगभरात अनेक हुकूमशहा झाले, हिरो झाले. प्रत्येकाला लोकांनी त्यांच्या गुणदोषांसहित टीका कौतुक वैगरे केलं. राज्य वाढवण्याच्या हेतूने केलेल्या बेफाट कत्तली किंवा धर्मविस्ताराच्या नावाने केलेली हत्याकांडं हे तितकंच वाईट त्या त्या काळानुसार ठरवलं गेलं. असाच एक सम्राट होता ज्याने सगळ्या जगात आपला दरारा निर्माण केला होता. अगदी जगावर राज्य गाजवण्याची महत्वकांक्षा घेऊनच तो आला होता. तर जाणून घेऊया या सम्राटाबद्दल.

मंगोल सम्राट चंगेज खान. हे नाव बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. अगदी निर्दयीपणे लोकांची पर्वा न करता सतत हल्ले करून मंगोल साम्राज्याचा विस्तार चंगेज खानाने वाढवला. ११६२ मध्ये चंगेज खानचा जन्म झाला. १३ व्य शतकात मंगोल साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या चंगेज खानला अशा व्यक्तीच्या रूपात ओळखलं गेलं कि ज्याचं तलवारीचं टोक अगदी आशियावर राज्य करत होतं.

लहानपणापासूनच अगदी बदल्याच्या भावनेने चंगेज खान पेटून उठला होता. ज्यावेळी सूडाच्या भावनेने तो पेटून उठला होता तेव्हा ज्या ज्या प्रदेशातून चंगेज खानची फौज गेली त्या जागेने विनाशाचं रूप पाहिलं. चंगेज खानचं मूळ नाव होतं तेमुजीन. वडील येसुजेई हे टोळीचे प्रमुख होते. येसुजेई यांनी विरोधी टोळीतल्या मुलीला पळवून आणून तिच्याशी विवाह केला होता. पण काही दिवसातच येसुजेईची हत्या करण्यात आली.

या घटनेमुळे १२ वर्षाच्या चंगेज खानचं लग्न केलं गेलं आणि त्याला टोळीचा प्रमुख करण्यात आलं. पण विरोधी टोळीने चंगेज खानच्या बायकोचं अपहरण केलं. यामुळे चंगेज खानने लढाईचे मनोरे बांधले. सुरवातीला त्याचा सख्खा भाऊ जमूकासुद्धा त्याच्या विरोधात गेला. पण चंगेज खानने त्याला पराभूत केलं. यात विरोधी गटात त्याच्या वडिलांची हत्या करणारे तातार केराइट आणि स्वतः ओंग खान सामील होता. १२०३ मध्ये चंगेज खानने ओंग खानविरुद्ध युद्ध पुकारलं.

१२०६ मध्ये विरोधी गटाचा पाडाव चंगेज खानने केला. चंगेज खानची ताकद बघून मंगोलमधल्या तमाम टोळ्यांच्या प्रमुखाने त्याच वर्चस्व मान्य करून त्याला अपराजित घोषित केलं आणि सार्वभौम शासक म्हणून घोषित केलं. यानंतर चंगेज खानने चीनवर राज्य मिळवण्याचं ठरवलं. चीन, उझबेकिस्तान, समरकंद, रुस, अफगाणिस्थान, इराण,इराक बल्गेरिया, हंगेरी अशा सगळ्या प्रदेशांवर चंगेज खानने हुकूमत गाजवली. इतकं मोठं साम्राज्य अजूनही कोणी जिंकू शकलं नव्हतं.

चंगेज खान हा युद्ध अगदी हुशारीने लढत असे. विशेषतः तो घोडयाना ट्रेन करून ठेवायचा. जर युद्धात एखाद्या सैनिकाचा घोडा निकामी झाला तर तो लगेच तिथे दुसरा ताकदीचा घोडा पाठवत असे.

त्यामुळे तो अनेक युद्ध जिंकू शकला.युद्धामध्ये सगळयात जास्त महत्व चंगेज खान घोडयाना देत असे. युद्धात भलेही चंगेज खानचं सैन्य कमी असायचं पण युद्धनीतीचा जोरावर तो युद्ध जिंकायचाच.

४ करोड लोकांच्या हत्येला जबाबदार म्हणून चंगेज खानला ठरवलं गेलं होतं. त्याने ज्या ज्या ठिकाणी युद्ध केलं तिथे त्याने मानवी प्रजाती समूळ नष्ट करायचा पणच घेतला होता. उझबेकिस्तानमध्ये १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात चंगेज खानने फक्त ५० हजार लोक जिवंत ठेवले होते इतका तो क्रूरही होता. चीनची भिंत पार करून चंगेज खानने तिथेही आपलं वर्चस्व मिळवलं.

भारतात येता येता चंगेज खान माघारी फिरला. जलालुद्दीन हा चंगेज खानचा विरोधी होता. चंगेज खानच्या कचाट्यातून वाचण्यासाठी जलालुद्दीनने दिल्लीचे सुलतान इल्तुतमिश यांच्याकडे मदत मागितली. पण चंगेज खानच्या भीतीने सुलतानाने हि मदत नाकारली. सिंधू नदी पार करून आलेला चंगेज खान इथून मागे फिरला कारण भारतात असलेली गर्मी, वाहतुकीच्या मार्गात असलेल्या असंख्य अडचणी यामुळे तो पुण्य आपल्या प्रदेशात गेला.

१८ ऑगस्ट १२२७ मध्ये चंगेज खानचं निधन झालं. एक हुकूमशहा, क्रूर राजा म्हणून तो जगभरात प्रसिद्ध झाला पण मंगोल साम्राज्यामध्ये तो एक कुशल राजा म्हणून प्रसिद्ध झाला. ४ करोड लोकांच्या हत्येचा जबाबदार म्हणून सुद्धा चंगेज खान इतिहासात नोंदवला गेला.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.