चन्नी म्हणतायेत, “पंतप्रधानांसाठी मी काय शेतकऱ्यांवर गोळी नाही मारू शकत”

काल दुपारनंतर एक ब्रेकिंग समोर आली कि, पंजाबच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी रोखला. आणि नुसता रोखला नाही तर पंतप्रधानांना परत विमानतळ गाठायला भाग पाडलं. आता मोदींच्या पंतप्रधानपदाच्या ७-८ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच असं घडलंय म्हटल्यावर वाद तर होणारचं  होता….

पंतप्रधान आपल्या सुरक्षेचा चांगला बंदोबस्त केला नाही, म्हणून चांगलेच भडकले होते. त्यांनी आपला राग भटिंडा विमानतळावर असलेल्या अधिकाऱ्यांजवळ व्यक्त केला. तिथं जाऊन त्यांनी टोमणा मारला कि,

 तुमच्या मुख्यमंत्र्यांचे मी जिवंत पोहोचलो यासाठी आभार सांगा असं म्हणत टोमणा मारला.

आता राजकारण्यांमध्ये वाद पेटायला, समोरच्याची चुकी काढायला काही कारण लागतंय होत. तर या घटनेमुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंजाब सरकारमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाबच्या काँग्रेस सरकारवर टीका करत म्हंटले कि,

“मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांनी पंतप्रधानांच्या सभेत अडथळे आणण्यासाठीच हे मुद्दाम घडवून आणलंय. पंतप्रधानांच्या प्रवासाचा मार्ग क्लिअर असल्याचं आश्वासन देऊन सुद्धा आंदोलकांना पंतप्रधानांच्या मार्गावर प्रवेश देण्यात आला. आणि एवढं सगळं झाल्यावर मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी फोनवर येण्यास नकार दिला. त्यामुळं सरकारनं मुद्दाम हा डावपेच खेळलाय.”

तर काँग्रेसची मंडळी म्हणतायेत कि, पंतप्रधानांची रॅली कॅन्सल होण्याचं कारण नरेंद्र मोदी यांची सुरक्षा व्यवस्थेतील चूक नसून वेगळेच आहे. पंतप्रधानांच्या सभेमध्ये त्यांच्या विरुद्ध असलेल्या असंतोषामुळे कित्येक खुर्च्या रिकाम्या होत्या. सभेमध्ये होणारी नामुष्की टाळण्यासाठी सुरक्षेचे कारण पुढे करून हि रॅली रद्द करण्यात आलीये.   

तर केंद्रीय गृह मंत्रालय म्हणतंय,  पंतप्रधानांचं टाईमटेबल आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवली होती. त्यामुळं पंजाब सरकारला तशी सुरक्षा व्यवस्था करणं आणि ट्राफिक कंट्रोल करणं भाग होत. पण तसं काहीच घडलं नाही. त्यामुळं पंजाब सरकारने हे मुद्दाम घडवून आणल्याचं दिसतंय. तरी गृह मंत्रालय या गंभीर त्रुटीची दखल घेणार आहे. 

आता या आरोप प्रत्यारोपवर काल संध्याकाळ पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी काहीच बोलले नाही. पण आता त्यांनी आपला मुद्दा क्लियर केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत चरणजीत चन्नी म्हणाले की, 

पंतप्रधानांवर कोणताही हल्ला झालेला नाही. त्यांच्या सुरक्षेत कुठली चूक सुद्धा झाली नाही, त्यामुळे एकाही अधिकाऱ्यावर कारवाई करता येत नाही. आणि महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांसाठी मी शांततापूर्ण आंदोलकांवर लाठीमार करू शकत नाही कि त्यांच्यावर गोळी मारू शकत नाही.

चन्नी पुढे म्हणाले कि, पंतप्रधानांचा संपूर्ण कार्यक्रम हवाईमार्गे होता पण अचानक त्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी तो रस्त्यावरून हलवला. आणि ऐनवेळी काही आंदोलक मार्गावर आले आणि त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली लावून रास्ता रोको केला. पण असं असतानाही सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे त्यांना वाटत असेल, तर आम्ही त्याची चौकशी करू.

आता मुख्यमंत्री यांच्यावर सुरक्षेबरोबर असेही आरोप झाले कि, नियमानुसार मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विमानतळावर रिसिव्ह करणं भाग होत. एवढंच नाही तर त्यांनी फिरोजपूरच्या सभेला सुद्धा दांडी मारली. 

मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर झालेल्या या आरोपाबद्दल सुद्धा स्पष्टीकरण दिल कि,

 पंतप्रधानांचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे. मला स्वतः त्यांना रिसिव्ह करून त्यांच्या सोबत जायचं होत. फिरोजपूरला जाऊन सभेला हजर राहायचं होतं. पण काल माझ्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली, त्यानंतर आमचे प्रधान सचिव आणि पीए कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे माझी जबाबदारी समजून मी तिथे गेलो नाही.

आणि एवढचं नाही याबाबत मी मंत्रिमंडळाशी चर्चा सुद्धा केली. मी येऊ कि नको असं पंतप्रधान कार्यालयाला विचारलं. तिथून मला लेखी विनंती मिळाली की,  तुम्ही व्हीसीमध्ये जॉईन करू शकता. त्यामुळे मी अर्थमंत्री मनप्रीत बादल यांना तिथे पाठवले. फिरोजपूरमध्ये पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मी उपमुख्यमंत्री आणि फिरोजपूरच्या आमदारांची ड्युटी लावली. त्यामुळे हे आरोप खोटे आहेत, असंही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.

एवढं सगळं बोलून झाल्यावर मुख्यमंत्री चन्नी दुःखद शब्दात म्हणाले की, शांततापूर्ण आंदोलकांना पंतप्रधानांच्या सुरक्षेशी जोडू नयेत. यामध्ये राजकारण होता कामा नये. पंतप्रधानांच्या सुरक्षेला किंवा प्रतिष्ठेला धोका असल्यासारखे काहीही नाही. रस्त्याने जायचे आधीच ठरलेले नव्हते. पण तरी पंतप्रधानांना परत जावे लागले याचे आम्हाला दु:ख आहे.

आता चरणजित चन्नी यांनी एवढं मोठं स्पष्टीकरण देऊन आपल्यावर केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत. पण केंद्राची नाराजी अजून किती काळ टाकतेय आणि पुढे कोणतं राजकीय नाट्य पाहायला मिळतं हे पाहणं इन्टरेस्टिंग ठरणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.