लालू म्हणत असतील, आधीच २७ वर्षांचा कारावास हाय त्यात अजून भर ती किती!

सध्या वेब सिरीज तुफान चालताना आपण बघतोय. प्रत्येकामध्ये या वेब सीरिजचं वेड लावण्यामागे सुद्धा एखाद्या वेब सिरीजचाच हात असतो. अशात एक वेब सिरीज आली होती जिने सगळ्यांना वेड लावलं होतं. प्रत्येकाच्या स्टोरीजवर एकदा ना एकदा त्या सिरीजचा बॅकग्राउंड मुसिक येऊनच गेलं होतं. ती सिरीज म्हणजे स्कॅम १९९२. हर्षद मेहता या भारतीय उद्योजकाने शेअर मार्केटमध्ये केलेल्या घोटाळ्यावर ही सिरीज आहे.

आता हा घोटाळा देखील रिअल लाईफ वाला होता. मात्र तरीही असा  एखादा घोटाळा ज्याच्यावर सिरीज नाही बनली पण नेहमी बातम्यांमध्ये, माध्यमांमध्ये त्याची मोठी चर्चा होत असते, असं विचारलं तर एकाच घोटाळ्याचं नाव सगळ्यांच्या ओठांवर येतं, ते म्हणजे ‘चारा घोटाळा’. शिवाय कोणत्या व्यक्तीने या घोटाळ्याला इतकं कुप्रसिद्ध केलंय तर ते ‘लालू प्रसाद यादव’.

आता हा घोटाळा आणि लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते यामुळे कारण या घोटाळ्यातील पाचव्या केसचा निकाल लागलाय. आणि या निकालाने लालूंच्या अडचणीत भर पडलीये. काय झालंय हे बघूच पण आधी हा घोटाळा समजून घेऊ…

काय आहे चारा घोटाळा?

चारा घोटाळा हा स्वतंत्र भारतातील बिहार राज्यातील सर्वात मोठा भ्रष्टाचार घोटाळा होता. १९९० ते १९९५ या काळात जनावरांना चारा देण्याच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून ९५० कोटी रुपये फसवणूक करून काढण्यात आले होते. १९९६ मध्ये या घोटाळ्यावरून पडदा निघाला. लालू यादव हे त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री होते. तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक नाव समोर येऊ लागले. 

पशुसंवर्धन विभागातील या घोटाळ्यात बैल, म्हैस, गाय, गाय, शेळी, मेंढ्या या जनावरांची वाहतूक करून त्यांच्यासाठीचा चारा बनावट पद्धतीने पळवून नेण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये बेकायदेशीररित्या काढण्यात आले. ज्या वाहनांमधून जनावरे आणि त्यांचा चारा वाहतूक केल्याचा तपशील सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदवला गेला ती वाहने तपासणीत बनावट असल्याचं आढळून आलं. त्या वाहनांचे क्रमांक स्कूटर, मोपेड, मोटारसायकलचे निघाले.

अनेकांची नावं यात समोर आली मात्र सगळ्यात मोठं आणि धक्कादायक नाव समोर आलं ते तेव्हाचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचं. या घोटाळ्यात लालूंवर ताशेरे ओढले होते, ज्यामुळे लालू यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

तेव्हाच्या बिहारच्या मुख्य लेखापरीक्षकाने वेळोवेळी ही माहिती राज्य सरकारला पाठवली होती, पण मुख्यमंत्री असतानाही लालू यादव यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याच आरोपाच्या बाजूने सीबीआयने न्यायालयात कागदपत्रे सादर केली. अनेक वर्षे ते स्वत: राज्याचे अर्थमंत्रीही होते, त्यांच्या मंजुरीवरच बनावट बिलांची मूळ रक्कम मंजूर झाली होती.

चारा घोटाळ्यात एकूण पाच प्रकरणांचा समावेश आहे.

पहिले प्रकरण ‘चाईबासा कोषागारा’तून ३७.७ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याचं आहे. या प्रकरणात लालू यादव यांच्यासह ४४ आरोपी होते. लालू प्रसाद यांना पहिल्या चारा घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झाली होती आणि २५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. दुसरे प्रकरण ‘देवघर सरकारी कोषागारा’चं आहे. यामध्ये ८४.५३ लाख रुपये अवैधरित्या काढण्यात आले. या प्रकरणी लालूंसह ३८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लालूंना साडेतीन वर्षांची शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते.

तिसरे प्रकरण ‘चाईबासा कोषागारा’तील ३३.६७ कोटी रुपयांचे आहे. यामध्ये लालूंसह ५६ आरोपी होते. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने लालूंना दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा आणि १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चौथे प्रकरण ‘दुमका कोषागारा’शी संबंधित आहे. यामध्ये ३.१३ कोटी रुपयांची बेकायदेशीर रक्कम काढण्यात आली. यात लालूप्रसाद यादव यांना दोन वेगवेगळ्या कलमांत दोषी ठरवून ७-७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

आता निकाल लागलेलं प्रकरण हे पाचवं आहे. आधीच्या चारही प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना झालेल्या शिक्षेची एकूण बेरीज साडेसत्तावीस झाली आहे. आता त्यात पाचव्या सगळ्यात मोठ्या आणि शेवटच्या शिक्षेची भर पडणार आहे.

पाचवं प्रकरण म्हणजे ‘डोरंडा प्रकरण’. हे प्रकरण रांचीमधील डोरंडा ट्रेझरीमधून १३९ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याशी संबंधित आहे. आज १५ फेब्रुवारीला या पाचव्या प्रकरणावर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने खटला चालवला. ज्यात लालूंसोबतच या प्रकरणातील अन्य ९८ आरोपींवर निकाल आला आहे. 

लालू यादव यांच्यासह ७५ आरोपींना दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश एसके शशी यांनी पुराव्याअभावी या प्रकरणात ६ महिलांसह २४ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तर न्यायालयाने ३४ आरोपींना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून लालूप्रसाद यादव यांच्यासह ४१ आरोपींच्या शिक्षेचा निर्णय २१ फेब्रुवारीला येणार आहे.

या प्रकरणात सुरुवातीला एकूण १७० जण आरोपी होते, त्यापैकी ५५ आरोपींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर ७ आरोपी सरकारी साक्षीदार झाले असून ६ आरोपी अजूनही कायद्याच्या कचाट्यातून बाहेर आहेत. 

सध्या लालू यादव जामिनावर बाहेर आहेत. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती सध्या चांगली नाही. ही बाब लक्षात घेऊन सीबीआय न्यायालय त्यांना काहीसा दिलासा देऊ शकते, असं मानलं जातंय. मात्र, यापूर्वीची प्रकरणं पाहीले तर लालूंना सीबीआय न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाहीये.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.