एक अपमान झाला आणि इंदिरा गांधींनी थेट चरणसिंग यांची पंतप्रधान पदाची खुर्ची खेचली

१९७७ साली आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला होता. मतदार राजाने जनता पक्षाच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं. पण निवडणुकीपूर्वी गैरकाँग्रेस वादाच्या नावाखाली एकत्र आलेल्या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेनंतर मात्र पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच सुरु झाली.

मोरारजी देसाई आणि चरणसिंग दोघेही दिग्गज नेते. त्यामुळे दोघांचीही नजर पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर होती. पण कसंबसं जयप्रकाश नारायण यांच्या मध्यस्थीने मोरारजी देसाई भारताचे चौथे पंतप्रधान झाले तर चरणसिंग यांना उपपंतप्रधान आणि गृहमंत्री पदावर समाधान मानावे लागले.

मात्र अंतर्गत राजकारणात जनता पक्षात लवकरच फुटीचे वातावरण तयार झाले. आपापसातल्या भांडण चव्हाट्यावर येवू लागली.

त्याच काळात मोरारजी देसाई यांचा मुलगा कांतीभाई देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पंतप्रधान कार्यालयात बसून कांतिभाई देसाई सरकार चालवतात, त्यांचे अनेक उद्योगपतींशी संबंध असून त्यांना फायदा मिळवून देण्यासाठी ते काम करतात अशा प्रकारचे आरोप कांतिभाई देसाई यांच्यावर झाले.

या आरोपांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी चरणसिंगांनी मोरारजी पत्र लिहून केली. सहाजिकच त्यामुळे सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अविश्वासाची स्थिती होती.

यानंतर मोरारजी देसाई यांनी चरणसिंग आणि त्यांच्यासोबत आपले अजून एक विरोधक राजनारायण यांना पत्र लिहून राजीनामा देण्यास सांगितलं.

पंतप्रधान मोरारजी देसाई आणि गृहमंत्री चरणसिंग यांच्यातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले होते.

यानंतर दोघांनीही मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. वर्षभरातच देशातील वातावरण बदलू लागलं. या बदलत्या वातावरणाचा पुरेपूर फायदा काँग्रेसने उचलला.

विरोधी फुटीला हवा देऊन सरकार पाडण्याचा इरादा घेऊन संजय गांधी राजनारायण यांना भेटले.

या भेटीत संजय गांधी यांनी राजनारायण यांना सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. सोबतच सरकार बनविण्यासाठी आणि पंतप्रधान पदासाठी काँग्रेस पक्ष चरणसिंग यांना पाठींबा देईल असा शब्द त्यांनी राजनारायण यांना दिला.

यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरु झालं आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला. त्याच वेळी चरणसिंग आणि राजनारायण यांच्या समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली, मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले.

परिणामी राजीनामा देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्यावर देखील दबाव वाढला आणि शेवटी अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी त्यांनी राजीनामा दिला.

यानंतर काँग्रेसच्या १५० खासदारांच्या पाठींब्याने चरणसिंग यांचे बहुमत तयार झाले. त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला, आणि

२८ जुलै १९७९ रोजी देशाचे ५ वे पंतप्रधान म्हणून शपथबद्ध झाले.

पण गोष्ट इथंच संपत नाही, तर इथून सुरु होते.

पंतप्रधान होऊन २१ दिवसाचं झाले होते. एक दिवशी इंदिरा गांधी यांना चरणसिंग भेटायला येणार आहेत असा निरोप आला. सायंकाळी सहाची वेळ होती. हंगामी असले, तरी ते पंतप्रधान होते. त्यामुळे इंदिरा गांधी तयार होऊन बाहेरच्या फाटकावर त्यांच्या स्वागतासाठी आधीच जाऊन उभ्या राहिल्या.

चरणसिंग यांच्या गाड्यांचा ताफा आला, परंतु स्वागतासाठी उभ्या राहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या जवळ तो थांबला नाही. त्याच वेगाने तो ताफा पुढे निघून गेला. 

नेमकी हीच गोष्ट त्यांच्या मनाला विलक्षण लागली, त्यांच्या मनात अपमानाची भावना घर करून गेली आणि तत्क्षणी त्यांनी चरणसिंग यांचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय केला.

चरणसिंग दुसर्‍या दिवशी लोकसभेत बहुमत सिध्द करण्यासाठी निघाले मात्र ते संसदेपर्यंत पोहोचण्याच्या आतच इंदिरा गांधींनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला. आपण चरणसिंग यांना सरकार तयार करण्यासाठी पाठिंबा दिला होता. सभागृहात विश्वास सिद्ध करण्यासाठी किंवा सरकार चालवण्यासाठी तो दिला नव्हता, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

त्यानंतर सरकार स्थापनेच्या २२ व्या दिवशी म्हणजे

२० ऑगस्ट १९७९ रोजी बहुमत सिद्ध न करताच चरणसिंग यांनी आपला राजीनामा सादर केला आणि पंतप्रधानांचे सरकार पडले. 

चरणसिंग हे संसदेला सामोरे न जाऊ शकलेले देशाच्या आजतागायतच्या इतिहासातील पहिले आणि एकमेव पंतप्रधान ठरले.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.