देशद्रोही आहे म्हणून चार्ली चॅप्लीनला अमेरिकेतून बाहेर काढलं होतं.

चार्ली चॅप्लीन ! पूर्ण जगभराचा लाडका माणूस. आता पर्यंतचा सर्वात लोकप्रिय फिल्मस्टार.  स्वतःचं दुख्खः विसरून जगाला त्यान हसायला शिकवलं. आज तो असता तर १३० वर्षांचा झाला असता.

एवढ्या काळात अख्खं जग बदललं. टेक्नोलॉजी कितीतर पटीने बदलली, पण तरी आजही तो स्क्रीनवर फक्त दिसला तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी का होईना स्माईल येते. एकही शब्द न बोलता आपल्या सिनेमामधून प्रेक्षकांना त्यान फक्त आणि फक्त  आनंद दिला.

चार्लीचा द्वेष करणारा कोणी असू शकेल हे ही आपल्याला पटत नाही. पण एककाळ असाही आला होता जेव्हा अमेरिकेत चार्ली चॅप्लीन देशद्रोही आहे म्हणून त्याने देश सोडून जावा यासाठी आंदोलने करण्यात आली होती. 

साल होत १९४०. तेव्हा जगभरात दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं. जर्मनी विरुद्ध इंग्लंड हा खरा सामना होता पण पूर्ण जग या युद्धात ओढलं गेलं होत. अमेरिकासुद्धा यापासून दूर नव्हती. हुकुमशहा हिटलरच्या छळकथा अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेत पोहचत होत्या. हिटलरच्या विरुद्ध टोकाचा राग सर्वत्र पसरत चालला होता. याच वेळी चार्लीचा सिनेमा आला,

“द ग्रेट डिक्टेटर”

कायम मूकपट बनवत आलेल्या चार्लीचा हा पहिला पूर्ण लांबीचा बोलपट होता. यात त्याने हिटलरशी साधर्म्य असणाऱ्या हुकुमशहाचा रोल केला होता.

the great

पहिल्यांदाच या सिनेमामधून लोकांना हसवता हसवता राजकीय भाष्य केले. हुकुमशाही मधला फोलपणा त्याने पडद्यावर साकारला.  हुबेहूब हिटलरदिसणाऱ्या चार्लीने त्याची बिन पाण्याने हजामत केली होती. पण याच सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये त्याने केलेले गंभीर भाषण आजही जगभरात लोकशाहीवाद्यांसाठी एक आदर्श अॅन्थम मानलं जात.

असं म्हणतात या सिनेमाचे रशेस खुद्द हिटलरने ही पहिले होते आणि त्याच्या हातात असत तर त्याने तेव्हाच चार्लीला फासावर चढवल असत. पूर्ण जगभरात जिथ जाईल तिथ हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्याने अनेक रेकॉर्ड्स मोडले. अमेरिकेतली जनता तर चार्लीसाठी अगदी वेडी झाली होती. पण काही लोक असेही होते ज्यांना चार्लीने उगीचच राजकीय विषय हातात घेतला असं वाटत होत.

तोपर्यंत एकाही मोठ्या फिल्मस्टारने असा थेट पोलिटिकल कमेंट करणारा सिनेमा बनवला नव्हता. हिटलरचे भक्त तर चार्ली चॅप्लीनवर दात खाऊन होते. पण हे लोक अमेरिकेत नव्हते म्हणून तिथ काही विशेष विरोध झाला नाही.

हाच चार्लीचा शेवटचा सुपरहिट सिनेमा. पुढे चाळीसच्या दशकात बोलपटाचाचं बोल बाला होता. चार्लीने तर प्रतिज्ञा केली होती की बोलपटांमध्ये आपला ट्रम्प हे पात्र साकारायचे नाही. त्यामुळे त्याची सुप्रसिध्द मिशी, डोक्यावर हॅट, फाटके कपडे, हातात एक काठी असलेली मूर्ती रिटायर परत कधी मोठ्या पडद्यावर दिसले नाही.

हेच ते दिवस चार्लीवर अनेक अफेअरचे आरोप करण्यात आले, लग्नावरून त्याची इमेज खराब करण्यात आली.  त्याच्यामागे कोर्टकचेर्यांचे लटांबर सुरु झाले. काही मासिके त्याच्या मागे हात धुवून लागली होती.एका अभिनेत्रीने तर चार्लीने सिनेमात काम देतो म्हणून सांगून आपल्याला फसवले आणि त्याचं बाळ आपल्या पोटात असल्याचा दावा केला. ब्लड टेस्ट मध्ये चार्ली निर्दोष असल्याच सिद्ध होत असूनही त्याला त्याबाळाचं पालकत्व घ्यायला लावलं गेलं.

हे सगळ कमी की काय म्हणून त्याच्या मागे अमेरिकेतली गुप्तचर संघटना एफबीआय लागली. कारण काय होत तर त्यांना शंका होती की चार्ली चॅप्लीन कम्युनिस्ट आहे.

हे सगळ घडत होतं १९४६च्या दरम्यान. तोपर्यंत दुसर महायुद्ध संपल होत. हिटलर मुसोलिनी यांचा सर्व नाश करून अमेरिका रशिया इंग्लंड ही दोस्त राष्ट्रे जिंकली होती. पण जिंकूनही आता जगावर राज्य कोण करणार, जिंकलेल्या भागाची वाटणी कशी होणार यावरून अमेरिका आणि रशिया मध्ये स्पर्धा सुरु झाली होती. तो पर्यंत महासत्ता असणाऱ्या इंग्लंडचं या युद्धात कंबरडे मोडल्यामुळे ते यापासून दूर होते.

अमेरिका हा खुला भांडवलशाहीचा पुरस्कर्ता देश होता तर रशिया हा कम्युनिस्ट विचारसरणीचा देश होता. दोघांचीही विचारसरणी दोन टोकाच्या धृवावरची होती. देशभक्तीच्या नावावर विरोधी विचारसरणीला जराही सहानभूती असणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जाऊ लागलं. यातच चार्ली देखील होता. त्याचे आर्थिक समानतेच्या बाजूचे विचार, साम्यवादाकडे झुकणारे त्याचे स्टेटमेंट यामुळे  त्याच्या मागे एफबीआयच्या हेरांचा ससेमिरा सुरु झाला.

१९४७ साली  चार्ली चॅप्लीनचा नवीन सिनेमा आला. त्याचं नाव होतं Monsieur Verdoux. श्रीमंत स्त्रियांना फसवून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या आणि पुढे त्यांचा खून करणाऱ्या एका खऱ्याखुऱ्या फ्रेंच क्रूरकर्म्या चार्लीने पडद्यावर साकारले होते. ही एक ब्लॅक कॉमेडी होती. 

लोकांना यातला चार्ली विशेष आवडला नाही. उलट हा चार्लीचा पहिला फ्लॉप सिनेमा ठरला. यात चार्लीने भांडवलशाही विचारसरणीच्या शस्त्रास्त्रे खपवण्याच्या नादात जगभरात युद्धजन्य परिस्थिती बनवण्यावर टीका केली होती. लोकशाही वादी असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकन सरकारला हा सिनेमा आवडला नाही. 

हिटलरवर टीका केल्यावर चार्लीला डोक्यावर घेणारी अमेरिका स्वतःवरची अप्रत्यक्ष टीका देखील सहन करायला तयार नव्हती. जनतेमध्ये देखील चार्लीची लोकप्रियता ढासळू लागली होती. त्याच्या सिनेमाचे शो बंद पाडले जात होते. अमेरिकेत त्याकाळात कम्युनिस्ट ही एक शिवी बनवली होती. आणि एफबीआयच्या जे. हूवर या अधिकाऱ्याच्या कृपेने चार्लीला ही शिवी जोडली गेली. 

पण चार्ली आपल्या मतावर ठाम होता. त्याच्या मते हा सिनेमा त्याने आतापर्यंत बनवलेल्या सिनेमामधला सर्वोत्कृष्ट सिनेमा होता. त्याने आपल्यावरच्या सगळ्या आरोपांचे खंडण केलं. तो म्हणायचा 

मी साम्यवादी नाही, मी तर शांततावादी आहे.”

यानंतर लगेचच त्याने पुढच्या ‘लाइमलाईट’ या सिनेमाची तयारी सुरु केली. त्यात सुप्रसिध्द पण एका विस्मरणात गेलेल्या विदुषकाचा त्याने रोल केला होता. हा सिनेमा त्याच्याच आयुष्यावर आधारित होता. लाईमलाईटचं शुटींग तीन वर्ष चाललं. हा काळ चार्लीच्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता. तो जिथ जाईल तिथ त्याला कम्युनिस्ट, देशद्रोही म्हणून छळल जात होतं.

१८ सप्टेंबर १९५२ रोजी चार्ली आणि त्याच कुटुंब इंग्लंडला जाण्यासाठी आरएमएस क्वीन एलिजाबेथ या जहाजात चढले. चार्लीचा जन्म झाला त्या लंडनमध्ये लाईमलाईटचा प्रिमियर शो होणार होता. याच्या पुढच्याच दिवशी अमेरिकेच्या अटर्नी जनरलने चार्लीला परतायचे दरवाजे बंद केले. 

चार्ली चॅप्लीनने अमेरिकेत लोकप्रियता मिळवूनही आपल्या मातृभूमीचे म्हणजेच इंग्लंडचे नागरिकत्व सोडले नव्हते. त्याला अमेरिकेत प्रवेशासाठी परमिटची आवश्यकता होती जे की सरकारने रद्द केले . याचे तीव्र प्रतिसाद उमटले. एफबीआयचा दावा होता की त्यांच्याकडे चार्लीच्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत. पुढे अनेक वर्षांनी सिद्ध झाले की हे असे काही पुरावे नव्हतेच. त्याच्याविरुद्ध केस चालवता देखील येणार नव्हती म्हणूनच त्यांनी ही पळवाट शोधली होती.

हे सगळ घडलं तेव्हा चार्ली अजून जहाजातच होता. तो इंग्लंडच्या भूमीवर उतरला तेव्हा त्याचं अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं. चार्लीने चिडून एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं,

मलाही त्या दुःखी देशामध्ये पुन्हा प्रवेश करण्यात रस उरलेला नाही किंवा मला त्याचं फार वाईट वाटलं नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की त्या द्वेषपूर्ण असहिष्णू वातावरणातून मुक्त झालो हे माझ्यासाठी एकप्रकारे चांगलंचं झालं.”

चार्ली तिथून पुढे २० वर्षे कधीच अमेरिकेला गेला नाही. त्याने  स्वित्झर्लंडच्या लेक जिनिव्हामध्ये “मनोर डे बान” नावाची ३७ एकराची इस्टेट विकत घेतली आणि पुढचं संपूर्णआयुष्य आपल्या कुटुंबासमवेत तो तिथेच राहिला.

त्याने आपले अमेरिकेतली सगळी प्रॉपर्टी विकून टाकली. युरोपमध्ये राहून तो सिनेमा बनवू लागला. पण पहिल्यांदाच हॉलीवूडच्या सगळ्या सोयीनी सज्ज असलेले स्टुडीओ, तिथले तन्त्रज्ञ यांच्या शिवाय काम करणाऱ्या चार्लीला आपल्या मनाप्रमाणे सिनेमे बनवता आले नाहीत. त्याचे पुढचे सिनेमे विशेष चालले नाहीत.

सत्तरच्या दशकात त्याने सिनेमा बनवन, त्यात काम करण बंद करून टाकलं. तो पर्यंत त्याला तब्येतीने साथ द्यायचं देखील बंद केलं होतं. एव्हाना अमेरिकेतला त्याच्या बद्दलचा राग द्वेष देखील संपून गेला होता. जगातली सर्वात मोठी महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेचा माज आपल्या लाडक्या कलाकारासाठी उतरला होता.  त्याचे लाखो फॅन्स त्याला रोज पत्र पाठवत होते. त्यांना आपला चार्ली परत हवा होता.

अखेर १९७२ साली ऑस्करने दिलेला जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी चार्लीने अमेरिकेला येण्याच मान्य केलं.

ऐंशी वर्षाचा जख्ख म्हातारा झालेला चार्ली चॅप्लीन जेव्हा अवार्ड घेण्यासाठी स्टेजवर आला तेव्हा जो टाळ्यांचा गडगडाट झाला तो थांबलाच नाही. तब्बल बारा मिनिट लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते. हाही एक प्रकारचा रेकॉर्ड होता. चार्लीच्याही डोळ्यात अश्रू होते. शेवटी द्वेषावर प्रेमाचा विजय झाला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.