महात्मा गांधीजींमुळे ‘चारमिनार बिडी’ फेमस झाली होती.
गांधीजी म्हणजे मूर्तिमंत सत्याचे प्रतीक. आयुष्यभर ते सत्याच्या मार्गावर चालले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीसुद्धा त्यांनी सत्याग्रह चळवळीचा मार्ग निवडला.
दारू सिगरेट बिडी तंबाखू अशा व्यसनांना त्यांनी प्रचंड विरोध केला. त्यांच्यामुळेच आजही गुजरातमध्ये दारू बंदी आहे. पण इतकं असूनही भारतात बिडी उद्योग वाढण्याच श्रेय त्यांना देण्यात येते.
साधारण सतराव्या शतकात भारतात तंबाखूचे आगमन झाले.
अठराव्या शतकात मुघल राजवटीमधले मोठंमोठे नवाब सरदार यांचे शाही शौक म्हणून हुक्का वगैरे आले आणि तंबाखू खाण्याची क्रेझ निर्माण झाली.
पण हुक्का हे श्रीमंतांचे चोचले होते. चिलीम वगैरेच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांची सोय झाली. पण सर्वसामान्यांना ते अजूनही परवडत नव्हते किंवा कामाच्या ठिकाणी ते घेऊन जाता येत नव्हते.
१८१८ साली इंग्रजांच भारतात राज्य सुरू झालं.
तंबाखूची सवय त्यांना देखील होती. पण ते आणि त्यांनी त्यांची सिगरेट इकडे आणली.
त्यांचे अधिकारी पाईप ओढायचे, याच काळात सिगरेटचं आगमन झाल होतं. खिशात मावणारे सिगरेट पाकीट यांनी क्रांतीच घडवली. तंबाखू हे पैसे मिळवून देणारे पीक ठरू लागले.पण भारतात अनेकांना सिगरेट परवडत नव्हते.
पण याला ऑप्शन शोधून काढण्यात आला.”बिडी”
अस म्हणतात की दक्षिण गुजरातमधल्या कामगारांनी मिळेल त्या थोड्याशा ओलसर पानात तंबाखू वळून ठेवायला सोपी म्हणून विडी तयार केली.
पानावरून विडा आणि त्यामुळे विड्यावरून ‘विडी’ किंवा बिडी हे नाव पडले.
आंबा, केवडा, केळी, पळस यांचा वापर करून लोक घरोघरी स्वतःची बिडी वळून ठेवू लागले. बिजनेसच डोकं असणाऱ्या गुजरात्यांनी यातही धंदा शोधून काढला.
घरात आवश्यकतेपेक्षा अधिकची बनवलेली बिडी एखाद्या थाळीत घालून बाहेर विकली जाऊ लागली. गुजरातमधून मुंबईला हे फॅड आलं. पानाच्या ठेल्यावर बिडी विक्रीला ठेवू लागले.
दुष्काळ व ब्रिटिशांचे निर्बंध यामुळे भारतातला कापडउद्योग अक्षरशः डबघाईला आला. अनेक कामगार, कारागीर देशोधडीला लागले.
या सगळ्यांना सहारा दिला बिडी उद्योगाने.
साधारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात अनेक बिडीचे कारखाने उभे राहिले. याच दरम्यान स्वदेशीची आंदोलने सुरू झाली.
गांधीजींनी छेडलेल्या सत्याग्रह आंदोलनात अख्खा देश सहभागी झाला. परदेशी कपड्यांची होळी केली गेली, सरकारी शाळा बंद पाडून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
हातात मीठ उचलून सविनय कायदेभंग करणाऱ्या गांधीजींनी भारत वासीयांना स्वदेशीची हाक दिली होती.
इंग्रजी पोशाखाबरोबर परदेशी महागडे फाउंटन पेन, घड्याळे इतर वस्तूंवर देखील बहिष्कार टाकला होता. याच कचाट्यात सिगरेट देखील अडकली.
अनेक देशभक्त लोक सिगरेट सोडून बिडी पिऊ लागले.
याचा फायदा उठवला चार मिनार बिडीने. हैदराबादच्या वझीर सुलतान यांनी १९१६ साली तंबाखू उद्योग सुरू केला होता. त्यांच्या मुलाने म्हणजे मोहम्मद सुलतान यांनी १९३० साली वजीर सुलतान टोबॅको न(VST) नावाची कंपनी सुरू केली.
हा सुलतान ग्रुप चारमिनार, टोटल, चार्म, एडिशन, गोल्ड आशा ब्रँड खाली बिडी विकत होता. पण पाकिटावर हैदराबादच्या चारमिनारच चित्रं असणारा चारमिनार प्रचंड फेमस झाला.
जगातला सर्वात श्रीमंत समजला जाणारा हैद्राबादचा निजाम सुद्धा हीच बिडी ओढायचा.
त्याच्या प्रोत्साहनामुळे चारमिनार तेलंगणा, मराठवाड्यात फेमस झालीच पण याच काळात वेगाने वाढलेल्या स्वदेशी आंदोलनाने चारमिनारला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवल.
आज आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल पण एकेकाळी सुपरस्टार भिडू जॅकी श्रॉफ चार मिनार बिडीची जाहिरात करत होता. तेव्हा बिडी पिणे म्हणजे मर्दानगीची ओळख समजली जायची.
त्यांची जाहिरातच होती की,
“आप जैसे मर्द को पुरा संतोष देना चारमिनारका ही दम है.”
आज बिडीच्या उद्योगाला घरघर लागली आहे.
अनेक ठिकाणचे कारखाने बंद पडले पण आजही काही जणांच चारमिनार बिडी शिवाय पानही हलत नाही.
हे ही वाच भिडू.
- कोलंबस होता म्हणून तू आज मावा, गायछाप खावू शकतोस भावा!
- एका जंगलात भारतातली पहिली स्मार्ट ट्रेड सिटी उभा राहिली तेच आजच जयसिंगपूर
- जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू !