चरण्या पारधीच्या नावावर २०० च्या वर गुन्ह हायती.

मैं भी शराफ़त से जीता मगर, मुझको शरीफ़ों से लगता था डर…!

सबको पता था मैं कमज़ोर हूँ, मैं इसलिए आज कुछ और हूँ….!

नायक नहीं खलनायक हूँ … जुलमी बडा दुःखदायक  हूँ  मै….

सुभाष घई यांच्या खलनायक या चित्रपटातील हे गाणं. व त्यातील वेदना आमच्या तासगावच्या चरण्या महादू पवार उर्फ (चरण्या पारधी) याच्याशी  अगदी मिळत्या जुळत्या वाटल्या. चरण्या तासगाव तालुक्यातील अगदी नामांकित नाव. तुमच्या आमच्यातला माणूस म्हणून नाय तर. गुन्हेगार म्हणून सर्वांच्या परिचयाचा.

चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या हातावर तुझा बाप चोर आहे आस काढलेल्या गोंदनाप्रमाण. चरण्याच्या कुटुंबाच्या कपाळी चोर आणि गुन्हेगाराचीच पट्टी मुंडावळ्या बांधल्यागत मातीत जाउपर्यंत पाठ सोडत न्हाय. आता पोलिसांसह काही प्रतिष्ठित मंडळींना वाटलं ह्यो आता गुन्हेगारावर लिहून त्यांचं उदात्तीकरण कराय लागलाय. ती कायमचीच चोर हायती, कधी सुधारणार नाहीत. पण कुणी जन्मजात चोर नसतो. सभोवतालची परिस्थिती, व समाज त्याला तस वागायला भाग पाडतो.

चरण्या पारधी…!

या नावाच गूढ माझ्या मनात अनेक दिवस घोळत हुत.

त्यो कसा आसल, त्याच घर, त्याची बायका, पोर, राहणीमान, रोजचा दिनक्रम, चोऱ्या, गुन्हेगार म्हणून त्याचा कायम पाठलाग करणारी त्याची ओळख. बातमीदार म्हणून पोलीस स्टेशनला चरण्याच्या कुणीतरी चोरी केली, कुणालातरी पोलिसांनी उचललाय, दाखल व्हाय लागलय. आणि आमच्या पोरान चुरी किली नाही म्हणून दिवसभर पोलीस स्टेशनच्या आवारात घुटमळणारा चरण्या, त्याच्या बायका, शेम्बुड गाळणारी नाक, पायात पायतांन नसणारी, कंबरला चड्डी नसणारी, हातात कायतरी खात न्हायतर, पोलीस स्टेशनमधी निडरपने घुसणारी बारकी पोर. बायका डोसक्याला गड्यागत टापर बांधून उभ्या.

तारीख असल्याव कोर्टासमोर घोळक्यान बसणाऱ्या, बोलत बोलत त्यांच्यातच भांडणाची जुपी व्हायची. कुठल्या वेगळ्याच भाषेत बायकात बायका शिव्यांच्या लाखोल्या एकमेकांना व्हायच्या. बघणाऱ्याला काय कळतंय. मार म्हणाल तर रक्त आल्याशिवाय भांडण थांबत न्हाय. आणि त्याहूनही लोड झालं तर कापड काढून, उघड होत होणारी त्यांची ती भांडण. लांबूनच चरण्या बद्दल ऐकलेलं व पाहिलेलं. बराच दिवस मनात घोळत हुत भेटाव कधीतरी, त्याच जगणं, विश्व काय हाय, बघावं एकदा..!

निवास बापू धोत्रे या आमच्या मित्रांनी चरण्याला भेटवायची जबाबदारी घेतली. आणि गाठली इंदिरानगर झोपडपट्टी.  तिथं त्याचा पोरगा राहात हुता. चरण्या कुठाय विचारताच वरच्या घरात आसल म्हणून सांगितलं. वन विभागाच्या कार्यालयाजवळ चरण्याच्या तीन पत्र्याची पाल. नेटान वार सुटलं तर उडून जाणारी.

गाडी थांबली. विचारलं चरण्या कुठाय? तर बाहेर कुठतरी गेलाय समजलं. कोणतर येगळ आलय. म्हणून तवर गाडीच्या दिशेने पाच सात बायका, पोर तर इंदिरानगर झोपडपट्टीतन मोटरसायकलीवरून जीवडी बसत्याल तीवडी मांनस आली. आणि गराडा घातला. निवास बापूंन सांगितल ह्यो तलाठी हाय सातबारयाव तुमची नाव घालायची हायती बोलवा चरण्याला. तवर फोना, फोनी झाली.

आणि 15 मिनिटात गाडीवरून दोघांच्या मधी बसल्याला चरण्या कायतरी पांढऱ्या पोत्यातन घिऊन आला. पोत पोरांच्याकड दिल आणि आमच्याकडं आला. वळख, पाळख झाली. या की बसूया म्हणला. दारात आसल्याली लोकांडी खाट यांचं वज व्हाऊन पार वाकून गिलती. त्यावर लुंगीचा फाटका धडूता टाकला व बसायला सांगितलं. खाटव मी आणि चरण्या दोघांच्या भोवती कुड घातल्यागत त्याचा सारा गोतावळा. अगदी जलीकुट्टी खेळात पोरांनी घोळका करून बैल धरावा तशी माझी अवस्था…!

चरण महादू पवार वय 65, शिक्षण दुसरी. 

चरण्या मूळचा आमनापूरचा. मात्र पारध्यासनी कोण लय दिवस ठीऊन घेतय वी ओ. ज्यांन त्यानं चोरीचा आळ घ्यायचा आणि गावातन ताणून लावायचं. चरण्याला 7 बायका त्यात 2 मेलेल्या, 8 पोर, 13 पोरी आणि नातू व नाती 60, एवढं भल मोठं कुटुंब. कुटुंब नियोजनाचा काय विषयच येत न्हवता. जगायचं म्हणला तर मंगला बनसोडेच्या तमाशात त्याच्या 8 नाती व 2 नातू नाचायला जातात. सात महिनं काम असत आणि त्याच्या जीवावर ह्यांनी बसून खायाच. उरलेल्या वेळात भीक मागायची, बारीक सारीक चोरी करायची. जगायसाठी आणि तारखा खेळायसाठी.

चरण्याच्या अंगावर आजपर्यंत 200 पेक्षा जास्त गुन्ह हायती. यात हरभरयांचा ढाळा उपासला, द्राक्ष चोरली पासून सोन्याच दुकान फोडलं इथपर्यंत. केलेलं व न केलेलं अनेक गुन्ह आजपर्यंत त्याच्या माथी मारलेल.

चरण्या म्हणतो पोलिसांना कुठं चोरी झाल्याव कोण घावना की त्यांनी सरळ रात्री, बेरात्री आमची वस्ती धरायची. झोपेतून उठवून घावल ती पोरगं धरायच. गाडीत घालून पोलीस स्टेशनला नेत त्याच्यावर न केलेले गुन्हे घालून मोकळं व्हायचं. कोण विचारायचं त्यासनी, किती विरोध करायचा, अडाणी मानस, ज्याला करता येईल तेवढा अत्याचार आमच्याव करायचा. वकील, पोलीसाला मागील तेवडा पैसा द्यावा लागतोय. आमी चोरी किली तर बेशक आम्हांवर कारवाया करा काय वाटणार न्हाय आमाला त्याच, मग न केल्याल आमच्या माथी का? त्याचा सवाल?

13 ऑगस्ट 2017 ला उदगाव शिरोळ येथे निकम मळ्यात धाडसी दरोडा पडला. अरुणा बाबुराव निकम यांचा खून झाला. सात लाखांची लूट झाली. या गुन्ह्यातील टोळीत असल्याचं सांगत जाबाज उपकारया पवार वय 22 याला कोल्हापूर पोलिसांनी उचललं. तवापासून त्याला ना जामीन, ना काय प्रकार आस सांगत लोकमत पेपरला पहिल्या पानावर आलेली त्यावेळची बातमी त्यानं दाखवली.

सगळेच पोलीस व अधिकारीही वाईट नसतात हे सांगायलाही चरण्या सांगायला विसरला न्हाय.

दिगंबर प्रधान नावाचा डीवायएसपी तासगावला असताना त्यो आमाला खूप समजवायचा. चोऱ्या करू नका, चांगलं रहा, पोरांना शाळा शिकवा, चांगली, चांगली मानस आमच्या  पालावर आणून चांगलं सांगायचा. तेचा बी आमच्याव विश्वास हुता. आणि आंमचाबी त्याच्याव. कधी आमी पोटासाठी केलेल्या चोऱ्या सायेब न विचारता आमी त्यासनी सांगायचं.

येगदा कुठल्यातरी चोरीच्या तपासाला सायेब दहा बारा पोलीस व कुत्री घिऊन आमच्या पालाव आलं. कुत्र हुंगत घरात शिरलं. काय घावना कुत्र परत भायर आलं . चरण्या प्रधान सायबाला म्हणला सायब कुत्र चोराच्या हातात असल्यावर चोर धरणार कस?  सायबान हात जोडल हित भेटलास वर भेटू नको आस सांगत निघून गेला.

तत्कालीन एक नामांकित एसपी म्हणला चरण्या तुमी कसल्या चोऱ्या करताय लगा. खरी चोर तर आमच्यातल्या खाकी वर्दीत हायती. चरण्याला कायद्याची तोंडपाठ माहिती. 2 वर्षांपूर्वी कुणीतरी रेशनिंगच्या दुकानात चोरी किली आणि त्याच खापर फुटलं याच्याव.!

तवापासन रेशन बंद, तासगावात आमी एवढ्या दिवस हाय पण राहती जागा आमच्या नावावर न्हाय. लाईट, पाणी, घर यासारख्या सुविधा न्हाईत. घरकुलांच्या घरात फक्त चरण्याचं नाव बाकीच्यांनी कुठं राहायचं. आमी मेल्याव आमाला डोंगरात कुठंतरी न्हेऊन पुराव लागतंय कोण जागा देत न्हाय. “आमाला आय कुठाय” सांगा तुम्ही या त्याच्या शब्दांच्या मारयांन गलबलून आलं.

आमी चोऱ्या केल्या मान्य पण त्या का केल्या कधी तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी त्याचा विचार केला का?  पोटाची आग भागवायलाच चोऱ्या केल्या.  चोऱ्यावर माडी बांधली नसती का? मग , या पत्र्याच्या खोपटात राहायला आमाला काय हाऊस हाय का? कुणी कुत्र्याला दगुड मारला तर परत ते तिथं जात नाही आमी तर माणूस हाय.!  कुणाला अपमानित जीन जगायला आवडत. वन विभागाच्या अधिकाऱ्याला विचारा त्याच्या शेजारी हाय आमचा ताप कधी त्याला हाय का?

सगळीकड पारध्याना जागा, घर, कसायला जमिनी मिळाल्यात. त्यांनी चोऱ्या, माऱ्या आसल सोडलय. पोर शाळा शिकत्यात. आमाला आमची तासगावची नगरपालिका या सुविधा कधी देणार? नकोय आमालाबी आसल जगणं. चरण्याची मुंब्रादेवी ही कुलस्वामीनी जानेवारी महिन्यात त्याची जत्रा असती. तिला हाल्याची जत्रा म्हणतात. आमची देवी लय कडक हाय छातीवरच बसत्या म्हणला. देवीला रेड्याचा बळी दिला जातो. उंच कुठंतरी टेकडावर ही यात्रा असती.  सारी पय, पावन येत्यात. मांस संपोपर्यंत तीन तीन दिवस जत्रा चालती. ही यात्रा मजी एखादया मोठ्या गुन्ह्याची योजना किंवा केलेल्या गुन्ह्याच सेलिब्रेशन असा ब्रिटिशांचा भ्रम आज पोलिसांपर्यंत तोच आहे.

जगण्याची फेसाटी झालेल्या या लोकांना शिक्षणाच महत्व पटू लागलंय. बारकी बारकी पोरही आता शाळला जात्यात. हृतिक संजय पवार ह्यो आता 10 वी ला हाय आणि शिकून त्याला पोलीस बनायचं हाय.

त्याच्या पालात शिरलु एका बारक्या पोरीला शाळेला जायची घाय झालती. फुटक्या आरशात बघून ती केस विंचरत हुती. 4 भांडी, दगडाची चूल, चुलीत ढीगभर राख, धुराण काळ झाल्याल पत्र, झोपाय फाटकी तुटकी कोपऱ्यात पडलेली बोतकार, आड्याला तुटक्या भाकरीच्या बुट्टीत चपातीचा एक तुकडा व 4 मिरच्या हुत्या. पालाच्या बाहेर आलो. साडीची दुरी करून त्यावर फाटकी तुटकी कापड वाळत हुती. पाणी घालून एक चांगल वाढायला लागलेलं झाड मला दारात दिसलं. देशी गाईची वर्षांची छानशी पाडी दारात हुती आणि उसाच वाड त्याला बारकी पोर खाऊ घालत हुती.

संविधान, स्वतंत्र भारत, इज्जतींन जगन याचा काडीचाही संबंध जगण्यात न्हवता. निसर्ग हीच त्यांची संस्कृती, साहित्यिक, सांस्कृतिक काहीच अंग त्याला न्हाय. कुटुंब न्हाय हे विश्वची माझे घर आणि निसर्गाचाच कायदा त्याला लागू. माणसांवरही ते एका मर्यादेच्या पलीकडे प्रेम करत नाहीत. एखाद्यानं खुन केला तर त्याचा बदला खुनान घेऊन परत सर्व विसरून ते नव्याने जगायला सुरवात करतात. नवरसात समृद्ध जीवन जगतात. नदीच पाणी समृद्ध असत तर धरणाचं पाणी अडवून समृद्धी आणता येते.

अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतला फकिरा दरोडा घालायला सावकाराच्या घरात जातो. सावकार घाबरतो घरातल सगळं घिऊन जावा पण अब्रू घिऊ नका म्हणतो. यावर फकिरा म्हणतो आब्रू लुटून पोट भरता येत नाहीत. हे पोटासाठी हाय, तुमची आब्रू तुमच्याजवळच ठेवा. चरण्याचही याहून वेगळं काय हाय? माणूस म्हणून कधी आम्ही तेच्याकड बघितलच न्हाय. त्याला आपल्यात घेतलं न्हाय, पारधी, चोर म्हणून त्याच नजरेतून बघतोय. त्याला काही काम नाय दिल्यास त्यानं जगायचं कस. तो तर पोटासाठी गुन्हेगार झालाय आणि आमी सातवा वेतन व 60 ते 70 हजार पगार  असून शे पाचशे रुपयासाठी भ्रष्ट कामे करून दिवसा ढवळ्या दरोडे घालतोय.

आणि राहिला विषय चरण्याचा तर माझ्या अंगावर गुन्हेगारीची झुल घालून किती जण जगली या त्याच्या प्रश्नाच उत्तर कोण देणार??

विनायक कदम. 9665656723

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.