या कारणामुळे कोल्हापूरच्या छत्रपतींची इटलीमध्ये समाधी आहे..

इटली मध्ये फ्लॉरेन्स नावाचे एक सुंदर शहर आहे. जगभरातील प्रवासी या शहरात येत असतात. इथली उद्याने,ऐतिहासिक वारसास्थळे पाहत असतात. तिथले फोटो काढत असतात. या सगळ्या वास्तूंमध्ये एक जुने स्मारक आहे.

आकर्षक मेघडंबरी असलेले हे संगमरवराचे समाधीस्थळ इटलीच्या राजाचे किंवा तिथल्या राजकुमाराचे नाही.

हे समाधीस्थळ आहे कोल्हापूरच्या छत्रपतींचे.

करवीर संस्थानचे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचं हे स्मारक.

ते तिथे का उभारण्यात आले याच्यामागे देखील एक कथा आहे.

एकोणिसाव्या शतकात करवीर संस्थांमधील गडकऱ्यांच्या उठावानंतर कंपनी सरकारने मेजर ग्रॅहमची पोलिटिकल एजंट म्हणून कोल्हापूर दरबारात नेमणूक केली. पुढे १८५७ साली युवराज चिमासाहेब महाराज यांनी केलेले बंड मोडून काढल्यावर ब्रिटिशांनी कोल्हापूरच्या राजकारभारातील आपली पकड मजबूत केली. त्याकाळच्या छत्रपती बाबासाहेब महाराजांवर इतकी बंधने आणली की ते कारभारात नाममात्र राज्यकर्ते उरले.

तिसरे शिवाजी उर्फ छत्रपती बाबासाहेब महाराजांच्या मृत्यूवेळी कोणी वारस नव्हता. या कारणामुळे सरदार पाटणकर घराण्यातील नागोजीराव उर्फ राजाराम  महाराज याना दत्तक घेऊन गादीवर बसवण्यात आले.

२९ ऑक्टोबर १८६६ रोजी पुण्यात मोठा दरबार भरवून छत्रपती राजाराम महाराजांचा राज्यरोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर बार्टल फ्रेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

छत्रपती राजाराम महाराज तेव्हा अल्पवयीन असल्यामुळे तत्कालीन ब्रिटिश रेसिडेंट कर्नल जी. एस. ए. ऍंडरसन यांच्या सूचनेवरून कॅ. एडवर्ड वेस्ट यांची असिस्टंट रेसिडेंट म्हणून नेमणूक करण्यात आली. छत्रपतींच्या शिक्षणाची जबाबदारी देखील त्यांच्याकडेच होती.

महाराजांच्या शिक्षणासाठी जमशेटजी नौरोजी उनवाला या पदवीधर पारसी गृहस्थांची नियुक्ती केली गेली होती.

गादीवर येण्यापूर्वीच छत्रपतींचे इंग्रजी भाषेचे काही शिक्षण झालेले होते. दोन मार्गदर्शक शिक्षकांमुळे त्यांनी आधुनिक पद्धतीच्या इंग्लिश शिक्षणात भरपूर प्रगती केली. इंग्रजी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या कार्यक्रमात ते सहभागी होत असतं. ब्रिटिश रीती परंपरा यात त्यांना प्रचंड रस होता. बिलिअर्डज्, क्रिकेट, शिकार अशा खेळांमध्ये देखील ते पारंगत झाले होते.

मुंबईमध्ये ड्यूक ऑफ एडिनबर्ग याच्या स्वागतावेळी झालेल्या कार्यक्रमात सफाईदार इंग्रजी मध्ये भाषण करून त्यांनी अनेकांना चकित करून सोडलं होतं.

स्वतः प्रमाणेच आपल्या प्रजाजनांना देखील आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी कोल्हापुरात शाळा सुरु केल्या.

त्यांच्या काळात १८६९ साली राजवाड्याशेजारी हायस्कूलची स्थापना करण्यात आली. याच हायस्कुलचे पुढे रूपांतर सुप्रसिद्ध अशा राजाराम कॉलेजमध्ये झाले. मॅट्रिक परीक्षेत जे दोन विद्यार्थी पहिले येत त्यांना खुद्द राजाराम महाराज आपल्या हाताने शिष्यवृत्ती देत असत.

छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापुरात शैक्षणिक चळवळीचा पाया घातला त्याचा कळस त्यांचाच वारसा चालवणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी चढवला.

राजाराम महाराज जुन्या रूढी परंपरामध्ये अडकणारे नव्हते. त्याकाळी भारतात परदेश गमन निषिद्ध मानले जात होते. राजाराम महाराजांनी हि प्रथा खंडित केली.

१८७० साली छत्रपती राजाराम महाराज आपले दोन्ही शिक्षक आणि अन्य ११ जण यांच्या सोबतीने इंग्लंडकडे बोटीने रवाना झाले. त्यांच्या या युरोप दौऱ्यात अनेक देशांना भेटी दिल्या, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड सारख्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीना भेट दिली. ऐतिहासिक ठिकाणे, म्युजियम यांची पाहणी केली.

इतकंच नाही तर राजाराम महाराजांनी लंडनमधील पार्लमेंटमध्ये जाऊन लोकशाहीचे कामकाज पाहिले.

संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याची राणी विक्टोरिया हिची महाराजांशी खास भेट झाली. ब्रिटन मधील अनेक मान्यवर कोल्हापूरच्या छत्रपतींना भेटण्यासाठी आले होते. प्रिन्स ऑफ वेल्स, ग्लॅडस्टन, डिजरेली अशा महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला. कित्येक विद्वानांच्याशी त्यांनी चर्चा केली.  याच दौऱ्यावेळी महाराजांनी रोजनिशी लिहिण्यास सुरवात केली होती. या सर्व घटना त्यांच्या डायरी मधून समजतात. 

पाश्चात्य देशांमधील खुले विचार, तिथली आधुनिकता यामुळे राजाराम महाराज प्रभावित झाले होते. स्त्रियांनी देखील शिक्षण घेतले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. याचेच पहिले पाऊल म्हणून त्यांनी राजघराण्यातील स्त्रियांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी एका शिक्षिकेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला.

भारतातील राजेरजवाडयांपैकी इंग्लंड-युरोपचा गादीवर असतांना दौरा करणारे पहिले सत्ताधीश म्हणजे छत्रपति राजाराम असा उल्लेख कॅ.वेस्ट यांनी केला आहे.

इंग्लंडचंही पाच महिन्याचा दौरा संपवून १ नोव्हेम्बरला महाराज परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत जागोजागी थांबून स्थलदर्शनाचा आनंद लुटत त्यांचा हा प्रवास सुरु होता. याप्रवासा वेळी बेल्जियमच्या राजाशीही त्यांची भेट झाली. म्युनिकच्या भेटीदरम्यान त्यांना थंडीचा त्रास सुरु झाला.

ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुक येथे असताना राजाराम महाराजांची प्रकृती खालावली. तिथे त्यांना संधिवाताचा त्रास होऊ लागला. पायी चालणे देखील अत्यंत कठीण होऊन बसले.

त्यांच्या आजाराचे निश्चित निदान अखेरपर्यंत झाले नाही. छत्रपतींनी बरोबर नेलेला मुस्लिम हकीम याचे उपाय लागू झाले नाहीत.

इटलीची तत्कालीन राजधानी फ्लोरेन्स येथे पोहचल्यावर तिथल्या एका इंग्लिश डॉक्टरकडून त्यांची तपासणी झाली. मात्र त्यांच्याही उपचाराला प्रतिसाद न देता ३० नोवेंबर १८७० च्या मध्यरात्री छत्रपतींचे अचानक निधन झाले. त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी कोल्हापूरला तातडीने तार पाठवून कळवण्यात आली.

छत्रपतींच्या निधनानंतर त्यांचे अंतिम संस्कार करण्याची वेळ आली तेव्हा नवे संकट उभे राहिले. इटलीसारख्या कर्मठ ख्रिश्चन देशाच्या प्रशासनाने महाराजांचे दहन करण्यास परवानगी दिली नाही. तिथल्या चर्चच्या पोपला दहन करणे हा प्रकार रानटी वाटत होता. हा प्रश्न लंडन पर्यंत पोहचला. व्हिकटोरीया राणीच्या इटलीमधील वकिलांनी मध्यस्ती केली.

फ्लॉरेन्समधील ब्रिटिशांच्या दबावामुळे छत्रपतींच्या हिंदू रितीरिवाजा प्रमाणे अग्निसंस्कार करण्यास परवानगी मिळाली.

राजाराम महाराजांच्या अंत्ययात्रेसाठी विशेष असा एक भव्य रथ फुलांनी सजवून तयार करण्यात आला. त्यांच्या अंतिम यात्रेला फ्लोरेन्स शहरातील नागरिक, इटलीच्या मंत्रिमंडळातील सदस्य, ब्रिटिश अधिकारी सामील झाले होते.

मोठ्या राजकीय सन्मानाने राजघराण्यातील परंपरेनुसार राजाराम महाराजांचे पार्थिव त्या रथात ठेवण्यात आले. राजकीय इतमामात फ्लोरेन्स शहरा बाहेर नदीच्या संगमावर महाराजांचा अंतिम संस्कार पार पडला.

संपूर्ण इटली मध्ये झालेला हा पहिला अग्नीसंस्कार.

राजाराम महाराजांचा अस्थिकलश फ्लॉरेन्सच्या महापौराने कोल्हापूर वासियांच्या हवाली केला. भारतात गंगा नदीत त्यांचे विधिवत् विसर्जन करण्यात आले.

महाराजांच्या अकाली निधनानंतर त्यांचे दहन झाले त्या ठिकाणी फ्लॉरेन्समध्ये १७ जून १८७४ सुंदर स्मारक उभारण्यात आले. याचे डिझाईन मेजर चार्ल्स मँट या सुप्रसिद्ध आर्किटेक्चरने बनवले तर चार्ल्स फुलेर या शिल्पकाराने महाराजांच्या लंडन मध्ये काढलेल्या फोटोवरून त्यांचा पुतळा बनवला. हे सुंदर स्मारक बांधण्यासाठी ब्रिटिश सरकारने १५० पौंडाची मदत केली.

जवळपास ४०० एकर मोठा बगीचा असलेल्या या जागेत (Cascine Park- Florance ) राजाराम महाराजांचे स्मृतिस्थळ उभे आहे. येथे इटालीयन, इंग्लिश, हिंदी आणि पंजाबी अशा चार भाषेत स्मृतीफलक लावण्यात आला.

images 5

हे स्मृतिस्थळ Monumento all’Indiano म्हणून ओळखले जाते तर राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाच्या १०० वर्ष पूर्तीनिमित्त त्यांची आठवण म्हणून समाधी स्थळाजवळच एक मोठा पूल बांधण्यात आला. या पुलाचे नाव ‘इंडियानो ब्रिज’ असे ठेवले गेले.

संदर्भ-सतीश शिवाजीराव कदम

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Kunal Meshram says

    Useful information

Leave A Reply

Your email address will not be published.