राज्यपालपद नाकारून महाराज म्हणाले, छत्रपती इतरांना नोकरी देतात. स्वतः करत नाहीत !

भोसले घराण्याच्या दोन शाखा. एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई राणी या कोल्हापूर गादीची स्थापना केली. औरंगजेबाशी लढा देण्याचा पराक्रम करणाऱ्या ताराराणी यांनी नानासाहेब पेशव्यासारख्या स्वकियांशी दोन हात करून कोल्हापूरची गादी राखली.

करवीरच्या या छत्रपती घराण्याला कर्तृत्वान राजकर्त्यांची परंपरा होती. याच घराण्यात राजर्षी शाहू महाराजांसारखे महापुरुष होऊन गेले. ब्रिटिश सत्ते विरुद्ध उठाव करणारे चिमासाहेब महाराज, शाहू महाराजांचे कार्य पुढे नेणारे राजाराम महाराज असे दूरदृष्टीचे सत्ताधीश या संस्थानात होऊन गेले.

अनेक पुरोगामी निर्णय घेऊन कोल्हापूरला काळाच्या पुढे नेण्यात या राजांचा मोठा वाटा होता.

या घराण्याची स्वाभिमानाची परंपरा जपणारे राज्यकर्ते म्हणजे छत्रपती शहाजी महाराज (दुसरे)

छ. शाहू महाराजांचे हे नातू. कोल्हापूरच्या राजकन्या आणि देवासच्या महाराणी राधाबाईसाहेब ऊर्फ अक्कासाहेब यांचे पुत्र. त्यांचं मूळ नाव विक्रमसिंह पवार. मात्र त्यांचा जन्म, बालपण आणि शिक्षण हे कोल्हापुरातच झाले. विद्यापीठातून पदवीधर होण्याचा मान मिळवणारे ते भारतातील पहिले मराठा संस्थानिक. विक्रमसिंह महाराजांनी देवास संस्थानात काही काळ कारभार केल्यानंतर लष्करी अधिकारी म्हणून दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला.

त्यांचे मामा म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज यांना पुत्र नसल्यामुळे  कोल्हापूरच्या गादीवर सातारच्या अल्पवयीन शिवाजीराजे यांना बसवण्यात आले होते मात्र त्यांचा लवकरच मृत्यू झाला.

अखेर देवासच्या विक्रमसिंह महाराजांनाच कोल्हापूर संस्थानाची जबाबदारी देण्यात आली.

१९४७ साली त्यांचा दत्तकविधी झाला आणि ते कोल्हापूरचे छत्रपती (छत्रपती शहाजीराजे) झाले.

शहाजी महाराजांच्या काळातच कोल्हापूर संस्थान हे स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले.  १ फेब्रुवारी १९४९ रोजी सामीलनाम्यावर सह्या झाल्या. मुंबई राज्यातर्फे बा.गं. खेर यांनी कोल्हापूरचा कारभार आपल्या हाती घेतला. तेव्हापासून कोल्हापूर हा महाराष्ट्रात एक जिल्हा झाला.

शहाजी महाराजांना कोल्हापूरचा कारभार सांभाळायची फारशी वेळच आली नाही. ते उत्तम लष्करी अधिकारी होते. भारत सरकारने त्यांना ‘मेजर जनरल’ किताब देऊन गौरवले होते. फुटबॉल, टेनिस हे त्यांचे आवडते खेळ. महाविद्यालयीन जीवनात ते  राजाराम कॉलेजच्या फुटबॉल टीमचे कॅप्टनदेखील होते.

कोल्हापुरात फुटबॉल रुजवण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे.

शिकार हाही त्यांच्या आवडीचा प्रांत. अनेक वाघांची शिकार त्यांनी केली होती. या सगळ्या आठवणी कोल्हापूरच्या संस्थानाचा इतिहास त्यांनी आपल्या राजवाड्यात म्युजियम स्थापन करून जपला. न्यू पॅलेस मधील प्राणी संग्रहालय, करवीर रियासत हा ऐतिहासिक ग्रंथ हे त्यांच्यामुळेच साकार झाले.

शहाजी महाराजांच्यावेळी दत्तक विधानावरून काही वाद झाले मात्र एकूण जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता अफाट होती.

कोल्हापूरच्या या राजाने लोकशाहीचा सन्मानच केला. नेहरूंच्या काळापासूनच वेगवेगळ्या संस्थानातील लोकप्रिय राजांना राजकारणात आणले होते मात्र छ.शहाजी राजे कटाक्षाने यापासून दूर राहिले.

कोल्हापूरचे माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांनी या बद्दलची एक आठवण आपल्या पुस्तकात लिहली आहे.

शहाजी महाराज व मोरारजी देसाई यांचे मैत्रीचे संबंध होते. एकदा मोरारजी देसाई कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा ते सर्किट हाऊस वर न उतरता थेट छत्रपतींच्या राजवाड्यावर राहायला आले. दोघांच्या गप्पा गोष्टी रंगल्या. उदयसिंहराव गायकवाड सांगतात,

जेव्हा  मोरारजी भाई परत जाण्यास निघाले तेव्हा शहाजी महाराज त्यांना सोडण्यासाठी बाहेर आले. जाता जाता मोरारजी भाई त्यांना म्हणाले,

“माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाही. तुम्ही राज्यपाल व्हावं अशी माझी इच्छा आहे.”

त्या दोघांचं यापूर्वी या विषयावर बोलणं झालं असावं. शहाजी महाराज नुसताच हसले आणि म्हणाले,

“छत्रपती इतरांना नोकऱ्या देतात. ते स्वतः नोकरी करत नसतात.”

त्यावर मोरारजी भाई हसले आणि गाडीत बसून निघून गेले. राज्यपाल म्हणजे एखाद्या राज्याचे सर्वोच्च स्थान. थेट राजकारणाशी संबन्ध नसलेले हे घटनात्मक पद मिळावे म्हणून अनेकजण प्रचंड मेहनत घेत असतात. मात्र छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी दाराशी आलेले हे पद नाकारणारे शहाजी महाराजांसारखे व्यक्ती विरळच.

हे हि वाच भिडू.

 

1 Comment
  1. jay chavan says

    अप्रतिम लेखन,
    अनेक दिवस आपले लेख वाचत आहे , खुप अभ्यास पुर्न आणि अचुक माहिति लोकांपर्यंत पोहोचवत आहात.
    असेच कार्य चालु राहुद्यात खुप खुप शुभेच्छा 👏.

Leave A Reply

Your email address will not be published.