थोरल्या शाहू छत्रपतींच्या भीतीने मुंबईभोवती बांधण्यात आलं होतं ‘मराठा डीच’

इसवी सन 1739. मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यावर प्रचंड मोठा विजय मिळवला. वसईच्या ठाण्याचे महत्व काय कमी होते? झालं. इंग्रजांचे पार धाबे दणाणले. आधीच ‘लँडशार्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजी आंग्रे यांची दहशत पश्चिम किनाऱ्यावर होतीच.

थोरल्या शाहू छत्रपतींनी कान्होजी आंग्रेसोबत इसवी सन 1713 मध्ये जो करार केला, त्यातील एक महत्वाचे कलम म्हणजे

‘फिरंग्यास धुळीस मिळवणे.’

याच उद्देशाने कान्होजींच्या हालचाली सुरू होत्या. सन 1720 मध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या आरमारी युद्धात गव्हर्नर बुन ला आंग्र्यांच्या विरोधात पराभवाचे तोंड पहावे लागले. परत मुंबईसुद्धा कान्होजींच्या तडाख्यात येऊ नये म्हणून इसवी सन 1715 ते 1720 च्या काळात चर्चगेटच्या भोवती तटबंदी-डागडुजीचे काम गव्हर्नर बुनने करून घेतले.

त्यातच, मराठ्यांच्या घोड्याच्या टापा आता मुंबईच्या अगदी जवळ येऊन पोहोचल्या. काहीतरी करायला पाहीजे ही जाणीव आता प्रत्येकाला झाली.

इंग्रजांनी मुंबईला आधीच संरक्षणात्मक कोटांची उभारणी केली होती. थोरल्या महाराजसाहेबांच्या काळात सुरतेची दोनदा ‘बदसुरत’ झाल्याचे किस्से अजूनही ताजे होते. मुंबईसारख्या सात बेटांच्या सुरक्षित जागी इंग्रजांनी आपली वखार स्थापन केली आणि मुंबई हेच आपल्या आर्थिक व लष्करी ठाण्याचे प्रमुख केंद्र बनवले. सारे जग मुंबईशी व्यापाराच्या माध्यमातून जोडले गेले आणि मुंबई अमाप श्रीमंतीच्या वाटेकडे चालू लागली.

पण, मराठे तर आता अगदी मुंबईच्या तोंडावर उभे होते. परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय, मुंबईची सुद्धा सुरत होते की काय अशी भीती सर्वांना वाटू लागली. इंग्रजांनी संरक्षणात्मक उपाय योजण्यास सुरुवात केली. मुंबईतल्या साऱ्या व्यापाऱ्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता इंग्रजांना याकामी सर्वतोपरी मदत केली. याच लोकसहभागातून निर्माण झाले प्रचंड मोठे खंदक..

कदाचित, मुंबईच्या इतिहासात ‘पब्लिक-प्रायव्हेट’ पार्टनरशिपमध्ये पूर्ण झालेलं हे पहिलेच काम असावे.

खंदकाच्या अलिकडल्या बाजूस इंग्रज आणि प्रमुख व्यापाऱ्यांची घरे, त्यांच्या पेठा तर पलीकडल्या बाजूस स्थानिक लोकांच्या वस्त्या.. मध्ये काहीसं मोकळं मैदान ठेवण्यात आलं. यदाकदाचित मराठ्यांचे ‘भीमथडी तट्टे’ मुंबईच्या दरवाज्यावर येऊन पोहोचलीच, तर खंदकावर बसलेल्या तोफा आणि बंदुका त्यांचा समाचार त्या मोकळ्या मैदानावर घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली.

पण, या खंदकाचा वापर कधीच झाला नाही. मराठ्यांच्या भीतीने उभारलेल्या तटबंदीयुक्त व्यापारी शहराला सर्वच बाजूने तटबंदी उभारण्यात आली आणि लांबलचक खंदक खोदण्यात आला.

पुढे मराठा साम्राज्याला उतरती कळा लागल्यावर इंग्रजांसमोर कुणीच प्रबळ शत्रू उरला नाही. मुंबईचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आणि शत्रूची भीती न उरल्याने इंग्रजांनी मराठ्यांच्या भीतीने उभारलेल्या फोर्ट आणि चर्चगेटच्या बाजूने असणारी सर्व तटबंदी पाडून टाकली. तसेच, खंदकसुद्धा बुजवून टाकण्यात आले.

सध्याच्या दक्षिण मुंबईच्या महात्मा गांधी रस्ता आणि दादाभाई नौरोजी रस्त्याच्या मध्ये हा ‘मराठा डीच’ होता. अगदी याच काळात आणखी एका प्रसिद्ध व्यापारी शहरामध्ये मराठ्यांच्या भीतीने खंदक खोदण्यात आला. त्या ‘मराठा डीच’ चा वापर आजही सर्वसामान्य लोक करताना दिसून येतात. त्याची चरितकहाणी पुन्हा कधीतरी.

WhatsApp Image 2021 03 04 at 10.50.14 AM

फोटो – सन 1864 मध्ये काढण्यात आलेला खंदकाचा फोटो. पुढे हे मराठा डीच, चर्चगेट आणि फोर्टच्या आजूबाजूची तटबंदी सन 1864 ते 1870 च्या दरम्यान नष्ट करण्यात आले.
  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.