अशी ही कहाणी जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची..

तो जेव्हापासून येथे येऊन गेला आहे, तेव्हापासून आम्ही सगळेच भीतीच्या छायेखाली सतत वावरत आहोत. असे वाटत आहे की तो पुन्हा येईल आणि तसाच अग्निप्रलय पुन्हा घडेल. तो शहराजवळ आल्याच्या नवनवीन अफवा रोज फुटत आहेत आणि भीतीने लोक सैरावैरा पळत आहेत. जे लोक तेव्हा शहर सोडून गेले, ते अजून आले नाहीत.

वीरजी व्होरा, हाजी कासम आणि इतर व्यापारी अजूनही आजारीच आहेत. सर्वशक्तिमान बादशहाने आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण तोच स्वतः हादरून गेला आहे. सध्यातरी इथे शांतता आहे, पण तीही भीषण वाटत आहे. ‘तो’ पुन्हा येऊ नये म्हणून आम्ही सगळेच देवाकडे प्रार्थना करत आहोत.
आपले विनम्र,

सर जॉर्ज ऑक्सिंडेन, सुरत

२६ नोव्हेंबर १६६४. (शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीच्या ११ महिन्यांनी लिहिलेलं पत्र)

४ जानेवारीची ती शांत सकाळ.

कोणीतरी मोगल सरदार सैन्यानिशी सुरतेजवळ ‘गणादेवी’ येथे येऊन थांबला असल्याची गोष्ट सुरतेच्या सुभेदारास समजली. त्या वेळी सुरतचा सुभेदार इनायतखान होता. त्याला शिवाजी महाराजांकरवी निरोप मिळाला की आपण बादशहाचे सरदार असून महाबतखानच्या आदेशावरून उत्तरेतील बंड मोडण्यास निघालो आहोत.

इनायातखानाने यावर उत्तर पाठवले,

“येथील लोक हा प्रचंड फौजफाटा पाहून घाबरतील. तरी आपण शहरातून न जाता बाहेरील मार्गाने जावे.”

पण डच आणि इंग्रज वखारवाल्यांनी ५ जानेवारीच्या सकाळी पक्की खबर आणली होती की ‘शिवाजीराजे’ आपल्या बारा हजार सैन्यासह सुरतवर चाल करून येत आहेत. शहरात एकच पळापळ सुरू झाली. व्यापार्‍यांनी दुकाने बंद करून घर गाठले, शहराच्या सीमेवर राहणार्‍यांनी तर शहर सोडून भीतीने पोबारा केला. परदेशी व्यापारी आणि वखारवाले इंग्रज, पोर्तुगीज, डच यांनी बाहेर विकायला ठेवलेला माल पुन्हा गोदामात आणून त्याला टाळी ठोकली.

इंग्रजांनी तर संध्याकाळी सोडायची जहाजे सकाळीच माल भरून इंग्लंडला पाठवून दिली.

एव्हाना शिवाजी महाराज उधनाजवळ पोहोचले होते. म्हणजे सुरतपासून फक्त १ मैलावर. इकडे शहरात इनायातखानाने लोकांना धीर द्यायचे आणि संरक्षण द्यायचे सोडले आणि स्वताच किल्ल्यात जाऊन लपला.

त्याच्यापाठोपाठ इतर अधिकारी, व्यापारी, शहरातील बडी प्रस्थही आश्रयासाठी किल्ल्यात जाऊन बसले. इनायातखानाच्या या भित्र्या धोरणाने मराठ्यांना जणू मोकळे रानच मिळाले. ६ जानेवारीला मराठा सैन्य सुरत शहरात दाखल झाले. शहराच्या बाजूला एक मंडप उभा केला गेला.

महाराजांनी इनायातखानास निरोप धाडला,

“वीरजी व्होरा, मोहनदास झवेरी, शांतीदास झवेरी, हरी वैश्य, सैद बेग, हाजी कासम या व्यापार्‍यांनी ताबडतोब येऊन खंडणीची बोलणी करावीत आणि ठरलेली खंडणी द्यावी. खंडणी मिळताच आम्ही निघून जाऊ. अन्यथा आमचे सैन्य शहराला आग लावेल. तुमच्यावर तलवार चालवेल.”

परंतु या निरोपला मोगली अधिकार्‍यांकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे चिडलेल्या शिवरायांनी बहिर्जी नाईकांच्या नकाशाप्रमाणे ठरलेल्या ठिकाणांवर हल्ले करून लूट मिळवायची ठरवली.

यात उल्लेख आलेला वीरजी व्होरा..

फॅक्टरी रेकॉर्ड्सप्रमाणे त्याकाळात जगातील सर्वात श्रीमंत असामी.

तेव्हाचा इलॉन मस्क किंवा बिल गेट्स किंवा अंबानी म्हणा हवं तर. याची वैयक्तिक संपत्ती त्याकाळात ‘८० लाख’ एवढी होती, तर व्यापारी उलाढाल काही कोटींमध्ये होती. मराठा साम्राज्याची तत्कालीन उलाढाल १५-२० लाखांच्या आसपास होती. यावरून वीरजी व्होराच्या प्रचंड संपत्तीचा अंदाज लावता येतो.

भारतात आग्रा, सुरत, भडोच, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रासमधून जाण्यार्‍या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ वीरजी व्होरा एकटा भरत असे. सुमारे ७ देशांमध्ये याच्या व्यापारी शाखा होत्या. केवळ मोगलच नव्हे तर इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, हबशी, अफगाणी, इराणी व्यापाऱ्यांना व्होरा कर्ज देई.

ईस्ट इंडिया कंपनीच्या कागदपत्रात वीरजीकडून व्यापारासाठी तब्बल १० लाख घेतल्याची नोंद आहे. संपूर्ण भारत ४ वर्ष वापरू शकेल इतकी चांदी याच्या गोदामात होती, असे वीरजी व्होरा बद्दल बोलले जाई.

शिवरायांनी वीरजी व्होरा आणि अन्य ४ व्यापार्यांनी खंडणी दिली तर सुरत वर हल्ला करणार नाही अशी ग्वाही दिली होती. परंतु वीरजीने ही मागणी मग्रुरीने धूडकावली आणि याचे परिणाम त्यासोबत सर्वच व्यापाऱ्यांना भोगावे लागले.

७ जानेवारी रोजी हाजी कासमचे घर लुटण्यात आले. मोहनदास झवेरी हा गरीब लोकांना दानधर्म वगैरे करून मदत करत असे, अशी बातमी हेरांमार्फत शिवाजी महाराजांच्या कानावर आली. महाराजांनी त्याच्या घराला कोणताही उपसर्ग पोहोचू दिला नाही.

८ जानेवारीला वीरजी व्होराचे घर मराठ्यांच्या फौजेने खणून काढले.

या सर्व घडामोडीत इनायतखानाने एक वकील शिवरायांसोबत तहाची बोलणी करण्यासाठी पाठवला. पण त्याने दगाफटका करून शिवाजी महाराजांच्या अंगावर प्राणघातक हल्ला करायचा प्रयत्न केला. महाराजांच्या अंगरक्षकांनी खंजीर धरलेला हात वरच्या वर उडवला पण तो शिवाजी महाराजांच्या अंगावर कोसळल्यामुळे त्याचे रक्त महाराजांच्या अंगरख्यास लागले.

‘शिवाजी महाराजांवर हल्ला केला’ अशी अफवा वाऱ्यासारखी छावणीत पसरली.

सगळ्या ओलिसांना आणि मोगलांना मारण्याचे आदेश सरदारांमार्फत देण्यात आले. तिथे असलेल्या लोकांवर शेकडो तलवारी उगारल्या गेल्या. तेवढ्यात महाराज उठून उभे राहिले आणि त्यांनी हे सगळं थांबवण्याचे आदेश दिले. या धामधुमीत २४ हात आणि ४ मुंडकी उडाली. अँथोनी स्मिथच्याही गळ्याजवळ आलेली तलवार थोडक्यात थांबली, म्हणून तोही बचावला.

पण या भेकड हल्यामुळे मराठ्यांनी अवघ्या सुरत शहराला आगीच्या लोळात लोटून दिले. ‘ट्रॉय’ चित्रपटात दाखवलेल्या जळत्या शहरासारखी सुरतेची अवस्था झाली. मराठ्यांनी बार लावून सरकारी इमारती उडवून दिल्या. अवघ्या सुरतेची ‘बदसुरत’ झाली.

त्या दिवशी सोने, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे ३०० ते ५०० हशम हातात प्रत्येकी २ पोती घेऊन शामियान्यात दाखल झाले होते. वीरजी व्होराच्या घरातून सुमारे ६००० किलो सोने, २८ पोती भरून मोती, हिरे आणि माणके, सुमारे ५० लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज प्राप्त झाला होता.

सुरतेच्या लुटीमध्ये सर्वात मोठे नुकसान वीरजी व्होराचेच झाले. यातून सावरायला काही वर्ष गेली तोच शिवरायांनी सुरतेवर दुसर्यांदा हल्ला केला. यातून मग वीरजी सावरला नाही आणि अंथरुणाला खिळला.

जगातील सर्वात शक्तिशाली मुघल साम्राज्याला कर्ज देणारा हा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे धुळीस मिळाला आणि याच धक्क्यात १६७० साली मृत्यू पावला.

या पैशातून शिवरायांना वर्षभर पगारी सैन्य ठेवणं, ते दुपटीने वाढवणं शक्य होणार होतं. गडकोट दुरुस्ती, नवीन कोट उभारणी, आरमाराची बांधणी, दारूगोळा, हत्यारे यासाठी लागणारा पैसा उपलब्ध होणार होता. स्वराज्यासाठी सुमारे अडीच कोट रोख रक्कम आणि सोने, चांदी इतर वस्तू असा मौल्यवान ऐवज मिळाला होता.

  •  केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.