मुंबईची सीएसटी बांधण्यासाठी ब्रिटिश आर्किटेक्टने तब्बल १६ लाख रुपये मानधन घेतल होतं !!

व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरांच्या बोली भाषेत सांगायचं झालं तर पूर्वीचं व्हीटी, आत्ताच सीएसटीएम.

मुंबईचं मुख्य रेल्वे स्टेशन. खऱ्या अर्थाने पाहिले तर गेट वे ऑफ मुंबई. इथूनच लाखो करोडो लोक मुंबईत येतात पोटापाण्याला लागतात. कायम गडबडीत दिसणारी सीएसटी कधी कधी अतिरेक्यांच्या हल्ल्याने रक्तबंबाळ होते पण म्हणून ती थांबत नाही.

आज सीएसटीचा १३२वा वाढदिवस. चला त्या निम्मित्ताने जाणून घेऊया तिचा प्रवास.

त्याची खरी सुरवात १८५० साली होते. झालं काय इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे जुलमी राज्य केल. पण, राज्य करून जाता जाता ते अनेक अशा गोष्टी देऊन गेले ज्या आजही भारतच्या विकासात महत्वाचे कार्य करत आहेत. त्यातील एक गोष्ट म्हणजे रेल्वे होय. भारतात इंग्रजांच्या राजवटीत पहिले ट्रेन धावली ती १८५० साली.

ट्रेनचा पहिला प्रवास बोरी बंदर ते ठाणे दरम्यान ३४ किलोमीटरचा होता. सुरुवातीला केवळ मालवाहतुकीसाठी या रेल्वे मार्गाचा वापर केल्या जायचा. त्याकाळी सुद्धा जागतिक व्यापाराच्या दृष्टीने मुंबई हे भारतातील सर्वात महत्वाचे शहर. तर हे जे बोरीबंदर स्टेशन होते न तेच आजचे सीएसटी.

पुढे कालांतराने इंग्रजांनी रेल्वेतून प्रवासी वाहतुकीस सुरुवात केली. पण तेव्हा इंग्रजांनी केलेली प्रत्येक गोष्ट आपल्या लोकांना जुलमी वाटायची. त्यामुळे सुरुवातीला रेल्वेने प्रवास करायला लोक घाबरत असत, तेव्हा इंग्रजांचे सैनिक लोकांना उचलून उचलून रेल्वे मध्ये बसवत असत.

पण हळूहळू विश्वास होऊन रेल्वे एक प्रवासाचे साधन असल्याचे लोकांच्या लक्षात आल. पुढे रेल्वे दळणवळणाचे प्रमुख साधन बनले आणि रेल्वेचा विकास होऊ लागला.

मग इंग्रजांनी भारतात पहिली रेल्वे जिथून धावली त्या बोरी बंदर रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी करून त्याचे नूतनीकरण करायचं ठरवलं.

ब्रिटिश आर्किटेक्ट एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स यांनी पुनर्बांधणीचे काम केले होते. स्थानकाचे काम १८७८ मध्ये सुरु झाले जे पूर्ण होण्यास दहा वर्षांचा कालावधी लागला होता. १६,३५,५६२ रुपये ऑफिससाठी तर १०,४०,२४८ रुपये स्थानकासाठी असा एकूण २६,७५,८१० रुपये खर्च नूतनीकरण करण्यसाठी आला होता. आर्किटेक्ट एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्सला तब्बल सोळा लाखांचं मानधन देण्यात आलं होतं.

Victoriaterminus1903

मे १८८८ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. २० जून १८८८ रोजी त्याचे उद्धाटन होऊन त्याला तत्कालीन राणी व्हिक्टोरिया यांचे नाव देऊन “व्हिक्टोरिया टर्मिनस” असे नामकरण करण्यात आले.

ब्रिटिश आर्किटेक्ट एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स यांनी डिझाईन केलेले हे बांधकाम गोथिक पुनरुज्जीवन बांधकामाचे भारतातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य इमारतीच्या घुमटावर एका हातात मशाल धरलेल्या स्त्रीची मूर्ती आहे जिला स्टेच्यु ऑफ प्रोग्रेस म्हणून ओळखलं जायचं.

या शिवाय ठिकठिकाणी विविध मुर्त्या उभारल्या होत्या ज्यात क्वीन व्हिक्टोरियाचाही समावेश होता.

हे बांधकाम भारतीय परंपरागत वास्तुकला, ब्रिटीश शहरांच्या व्यापारी भागांचे उदाहरण दाखवणारे मिश्रित बांधकाम आहे. ब्रिटीश ड्राफ्टमन अलेक्स हेगन याने वाॅटर कलरने सुंदर कलाकृती रेखाटली होती.

व्हिकटोरिया राणीच्या पदभार समारंभाच्या स्मृतिप्रीत्यर्थ २० जून रोजी स्टेशनच उदघाटन करण्यात आलं.

स्थानकाची अंतिम डिझाईन हि लंडन मधील सेंट पँक्रास रेल्वे स्थानकाशी मिळती-जुळती होती. टर्मिनस सुरु झाले तेव्हा प्लॅटफॉर्मची संख्या ९ होती. पुढे हार्बर लाईन, मेन लाईन यांचा विस्तार होऊन प्लॅटफॉर्मची संख्या १३ वर गेली.

पुढे कालांतराने देश स्वतंत्र झाला. भारतावर राज्य केलेल्या जुलूम केलेल्या इंग्रजी सत्तेच प्रतिक असलेल्या विक्टोरिया राणीचे आणि इतरांचे पुतळे नव्या सरकारने व्हीटी स्टेशनवरून राणीच्या बागेत हलवले. काही वर्षांनी ते गायब देखील झाले. काही जण म्हणतात की चोरांनी ती विकले. आता त्या मुर्त्या कुठे आहेत ठाऊक नाही.

आज ही व्हीटी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखली जाते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.