यशवंतराव चव्हाण म्हणाले, कृपा करुन मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणू नका !

साल होतं १९५७. प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू येणार होते.

काही वर्षांपूर्वी प्रतापगडावर आलेल्या राज्यपाल महताब यांनी इथे महाराजांचा पुतळा असावा अशी सूचना केली होती. त्यानुसार यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब हिरे यांनी साताऱ्याच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारकसमितीची स्थापना केली होती.

३० नोव्हेंबर ही तारीख पक्की करण्यात आली.

खरे तर खूप महिन्यापूर्वीच हा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होणार होता मात्र तेव्हा निवडणुक आली आणि प्रचारासाठी महाराजांच्या नावाचा वापर केला अशी टीका होऊ नये म्हणून हा समारंभ पुढे ढकलण्यात आला. निवडणूक झाली, या निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसचा पराभव झाला. पण द्विभाषिक राज्य असल्यामुळे गुजरातमधील जागांच्या जोरावर कॉंग्रेसची परत सत्ता आली.

राज्यात संयुक्त महाराष्ट्र समितीचा जोर होता. मुंबईसह वेगळा महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीने त्यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई हे आंदोलन दडपशाहीने मोडून काढण्याचा प्रयत्न करत होते यामुळे कॉंग्रेसबद्दल राज्यात चिड होती.

यातच या प्रतापगडावरील पुतळा अनावरणाच्या समारंभासाठी नेहरू येणार म्हटल्यावर संयुक्त महाराष्ट्र समिती विरुद्ध कॉंग्रेस असा वाद पेटला.

समितीचे म्हणणे होते कि मोरारजी देसाईनी शिवरायांच्याबद्दल टीका केली होती, जवाहरलाल नेहरूंनी देखील पूर्वी एकेठिकाणी अफझलखानाच्या वधावरून चुकीची माहिती दिली होती. जी व्यक्ती वेगळ्या महाराष्ट्राचा विरोध करते तिच्या हस्ते स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होऊ देणार नाही अशी भूमिका संयुक्त महाराष्ट्र समितीच्या अनेक कार्यकर्त्यानी व्यक्त केली.

तर सातारा जिल्ह्यातील अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांनीदेखील नेहरूंच्या हस्तेच पुतळयाच अनावरण केल पाहिजे. कम्युनिस्ट नेते भाई डांगे म्हणाले,

“नेहरूंनी आपली चूक दुरुस्त केली आहे आणि मोरारजीभाईंच्या चुकीची शिक्षा त्यांना देण्यात येणे चुकीची आहे. शिवाय महाराष्ट्रासह भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा सहभाग होता म्हणून महाराजांच्या पुतळ्याच अनावरण करण्याचा त्यांना अधिकार आहे. महाराष्ट्र राज्य होऊ दिले नाही याबद्दल त्यांच्याबद्दल निदर्शने करण्यास हरकत नसावी पण त्यात अतिरेक नको.” 

३० नोव्हेंबर १९५७ रोजी नेहरूंचे आगमन झाले. वाईपासून प्रतापगडापर्यंत अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभ्या करण्यात आल्या होत्या.

मात्र याबरोबरच संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते देखील विरोधी घोषणा देत रांगेत उभे होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. नेहरुंना जाताना हे निदर्शक दिसले. त्यांनी सोबत असलेल्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना हे लोक कोणत्या घोषणा देत आहेत हे विचारले,

यशवंतरावांनी सांगितले कि हे लोक तुम्हाला शुभेच्छा देत आहेत, पण मुंबई आपल्यापासून हिरावून घेऊ नका असे म्हणत आहेत.

सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार न घडता प्रतापगडावरचा कार्यक्रम थाटात पार पडला. नेहरूंनी जमलेल्या लाखो नागरिकांपुढे महाराजांच्या कार्याबद्दल जोरदार भाषण केल आणि आपल्या बद्दल असलेले सर्व गैरसमज दूर केले.

निदर्शकांच नेतृत्व एसएम जोशी यांच्या कडे असल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले नाही. त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली याबद्दल खुद्द मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी कौतुक केल आणि आभार मानलं. मात्र विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी प्रतापगडावरील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला.

याबद्दल २३ ऑक्टोबरला विधानसभेत झालेल्या चर्चेत बोलताना आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाण हे स्वतःला प्रतिशिवाजी म्हणवून घेत आहेत अशी घणाघाती टीका केली.

त्याला उत्तर द्यायला यशवंतराव चव्हाण उभे राहिले. ते म्हणाले,

“प्रति शिवाजी म्हणवून घेण्याइतका मी मूर्ख किंवा अहंकारी नाही. ३०० वर्षे लोटल्यानंतरही ज्या थोर पुरुषाला मुजरा करण्यासाठी ३०-४० कोटी जनतेचे मुकुटमणी, भारताचे प्रतिनिधी पंडीत नेहरू ज्या वेळी येतात, त्यावेळी निषेध करून अडथळे आणण्याची जी गोष्ट आहे ती चांगली नाही, असे सर्व सामान्य माणसाला वाटले तर त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. “

यशवंतरावांनी कोणताही वाद चिघळवू दिला नाही, संयमाने विरोधकांना सामोरे गेले, त्यांच्याशी संवाद कायम ठेवला व कायदा सुव्यवस्थासुद्धा टिकवून ठेवली.

संदर्भ- यशवंतराव चव्हाण व्यक्तित्व व कर्तुत्व गोविंद तळवलकर

हे ही वाच भिडू.