एका आमदाराने घाईला आणल्यामुळे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात आलीय..

काँग्रेसची घरची भांडण काय संपायची नाव घेत नाहीत.  पंजाब काँग्रेसमधली भांडणं चव्हाटयावर आल्यानंतर आता गेल्या कित्येक दिवसांपासून छत्तीसगड काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि टी.एस.सिंहदेव यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुरु झालेला हा वाद इतका पेटलाय कि, थेट दिल्ली हायकमांडला या वादात लक्ष घालावं लागतंय. नेत्यांच्या, आमदारांच्या दिल्लीवाऱ्या सुरु झाल्यात, एकामागून एक अशी बैठकीची सत्र  सुरु आहेत.

एकेकाळी बघेल आणि सिंहदेव यांची घट्ट मैत्री होती

आता हा वाद खरा सुरु झाला तो २०१८ पासूनचं राज्यात जेव्हा काँग्रेस सत्तेवर आलं, तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी  भूपेश बघेल आणि टी.एस.सिंहदेव यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. त्यामुळे मोठे वादही निर्माण झाले होते.

दरम्यान काँग्रेस हायकमांडने  भूपेश बघेल यांची मुख्यमंत्री निवड केली. तर आरोग्य खात टी.एस.सिंहदेव यांना देण्यात आलं. सोबतच अडीच वर्षांनी नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार असं आश्वासन दिलं गेलं.

आता बघेल यांचा अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपत आलाय, मात्र अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा फॉर्मुला त्यांनी स्पष्टपणे नाकारलाय. यावरूनच छत्तीसगडमध्ये वाद पेटलाय. सिंहदेव यांनी बघेल यांना खुर्चीवरुन खाली आणण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावलीये.

अलीकडेच, बघेल गट आणि सिंहदेव गटातील मतभेद जास्तचं टोकाला गेलेत, जेव्हा काँग्रेसचे आमदार बृहस्पती सिंह यांनी आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्यावर आरोप केला की, त्यांना बघेल यांची हत्या करून मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे.

अश्या परिस्थितीत जाणून घेऊ कि, हे टी. एस. सिंहदेव आहेत तरी कोण ज्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपासून  हायकमांडला देखील हादरवूं सोडलंय. 

तर टी. एस. सिंहदेव म्हणजेच त्रिभुनेश्वर शरण सिंह देव. स्वातंत्र्या आधीच्या सुरगुजाच्या राजघराण्याशी संबंधित असलेले टीएस सिंह देव हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासू लोकांपैकी एक मानले जातात.

छत्तीसगडमध्ये ‘टीएस बाबा’ म्हणून फेमस आहेत.

त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झालं तर हिंदू विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठातून त्यांनी बीए पूर्ण केलाय. तसेच, भोपाळ विद्यापीठातील हमीदिया महाविद्यालयातून त्यांनी हिंदी विषयात एमए पदवी घेतलीये.

२००८ पासून ते सतत राज्यातल्या अंबिकापूर मतदारसंघातून निवडून आलेत. आपल्या २००८ च्या निवडणुकीत त्यांनी १ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यांनतर २०१३ मध्ये त्यांनी भाजपच्या अनुराग सिंह देव यांचा १३ हजार मतांनी निवडणुकीत  पराभूत झाला. गेल्या २०१८ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी १,००,४३९ मतांनी आपल्या विजयाची हॅट्रिक मारली. 

तस पाहायचं झालं तर टी.एस.सिंह देव यांचं युपी कनेक्शनही आहे, त्यांचा जन्म हा उत्तर प्रदेशातल्या  प्रयागराजचा. १९८३ साली अंबिकापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. टीएस सिंह देव यांनी १० वर्षे या पदावर काम केलं.

छत्तीसगडमधील सर्वात श्रीमंत उमेदवार

२०१८ च्या डेटानुसार, राजघराण्यातील टीएस सिंह देव अर्थात टीएस बाबा यांच्याकडे सुमारे ५६१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय त्याच्या नावावर सुमारे ११ लाख रुपयांचे कर्ज आहे. 

दरम्यान, बघेल आणि सिंह देव यांच्यातला वाद थंड करण्यासाठी सर्व बड्या नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत.  वादात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांची वेगवेगळी भेट घेतली. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या बंगल्यावर या दोन्ही बैठका झाल्या. असं म्हंटल जातंय कि, राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर वेणुगोपाल यांना आता बघेल आणि सिंहदेव यांच्यातील मतभेद संपवण्यासाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलीये.

आता या दोघांच्या ताकदीबद्दल बोलायचं झालं तर, भूपेश बघेल यांचं पारडं टीएस सिंहदेवपेक्षा भारी आहे. पण सुरगुजा परिसरात टी.एस.सिंगदेव यांचे वर्चस्व खूप आहे. आणि ते त्यांच्या सॉफ्ट प्रतिमेमुळे देखील लोकप्रिय आहे.

सिंहदेव यांच्या म्हणण्यानुसार, २०१८ च्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होत असताना ५० पेक्षा जास्त आमदार सिंहदेव यांच्यासोबत होते. मात्र, आता त्यातल्या काही आमदारांनी पलटी मारलीये.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.