IBM मध्ये काम करणारा इंजिनियर शेतकऱ्यांचा मसीहा बनायचं म्हणून भारतात परत आला..

उत्तर प्रदेश, हरियाणाचा जाटलँड म्हणजे संपन्न प्रदेश. हिरव्यागार सुपीक प्रदेशाच राजकारण शेतीच्या भोवती फिरतं. आपल्या शेतासाठी थेट औरंगजेब बादशाहला नडणारी रांगडी माणसं या भागात राहतात. तिथल्या गावगाड्यात मात्र आजही बारा बलुतेदारांचा मुखिया म्हणून चौधरींना प्रचंड मान आहे.

आपल्या कडे जसा गावचा पाटील तसा तिकडे चौधरी. परंपरागत जमीनदारी चालत आलेली आणि सोबतच गावच्या राजकारणाचं नेतृत्व देखील. 

याच रांगड्या राजकारणातून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहचलेला नेता म्हणजे चौधरी चरणसिंग 

चरणसिंह यांचा जन्म पश्चिम उत्तरप्रदेशातील एका खेड्यात संपन्न जाट शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या घरात परंपरागत खाप पंचायतीचे चौधरीपण आले होते. एकेकाळी १८५७ च्या उठावात पराक्रम गाजवलेलं हे कुटुंब.

चरणसिंह लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. त्यांनी १९२५ मध्ये कलाशास्त्र मध्ये एमए केले आणि १९२६ मध्ये आग्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली व गाझियाबाद येथे दिवाणी वकील म्हणून काम सुरू केला.

स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीचा हा काळ. उत्तरप्रदेश तर गांधीजींच्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले होते. चौधरी चरणसिंग देखील या लढ्यात उतरले. नेहरू,गोविंद वल्लभ पंत, लाल बहादूर शास्त्री या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आले. खेड्यात वाढले असल्यामुळे ग्रामीण अर्थकारणाची त्यांना जण होती. उत्तरप्रदेशच्या शेतकऱ्यांचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं.

पहिली कृषिमाफी, कृषीउत्पन्न बाजार समिती वगैरे त्यांच्याच संकल्पना. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहरूंसोबत वाद झाल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडले. मात्र राजकीय वजन कमी झालं नाही. उत्तरप्रदेशचे ते दोन वेळा मुख्यमंत्री बनले.

आणीबाणी नंतर इंदिरा गांधींचे सरकार पडले तेव्हा जनता दलाचं सरकार आलं. मोरारजी देसाई यांच्यावर बाकीच्यांनी आक्षेप घेतल्यावर त्यांना हटवून चरणसिंग याना पंतप्रधान करण्यात आलं. 

चरणसिंग यांना पंतप्रधान पदाचा फार मोठा कार्यकाळ मिळाला नाही. मात्र त्यांनी आपल्या पदाचा आपल्या घरच्यांना कधी फायदा उठवू दिला नाही. अगदी त्यांच्या जावयाने पंतप्रधानपदाच्या नावाचा वापर करून स्कुटर घेतली तरी त्यांनी ती स्कुटर परत करायला लावली.

दुर्दैवाने चरणसिंग यांना लवकरच आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. इंदिरा गांधींनी जबरदस्त कमबॅक करत जनता दलाला धूळ चाखायला लावली.

ऐंशीच्या दशकात राजीव गांधींचा राजकारणात उदय झाला होता. कॉम्प्युटरची भाषा बोलणारे राजीव गांधी देशाला एक विसाव्या शतकाकडे नेण्याचं स्वप्न दाखवत होते. इंदिरा जींच्या मृत्यूनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत त्यांनी विरोधकांना अक्षरशः संपवून टाकलं.

मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग हे दिग्गज नेते वृद्धापकाळाने जर्जर झाले होते. भाजपसारख्या पक्षाचे तर फक्त दोनच खासदार निवडून आले होते. राजीव गांधींच्या धोरणांना उत्तर देण्यासाठी विरोधकांना तसाच तरुण तेज तर्रार नेता हवा होता.

तेवढ्यासाठी चौधरी चरणसिंग यांच्या थोरल्या मुलाला अमेरिकेवरून भारतात बोलवण्यात आलं.

नाव चौधरी अजित सिंग

चौधरींच्या घरात जन्माला आलेले अजित सिंग शालेय जीवनापासून प्रचंड हुशार होते. त्यांनी भारतातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या आयआयटी खरगपूर येथे कंप्यूटर इंजिनियरिंगचा शिक्षण घेतलं होतं. तिथून पूढे अमेरिकेच्या इलिनॉय विद्यापीठातून एमएस पूर्ण केलं.

साठच्या दशकात आयबीएम सारख्या मोठ्या कॉम्युटर कंपनीमध्ये काम करणारे ते पहिले भारतीय ठरले होते. वडिलांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देखील राजकारणापासून कित्येक कोस दूर आपली नोकरी सांभाळणारे अजित सिंह आपल्या विश्वात खुश होते.

पण जेव्हा चरणसिंह यांची आजारपणामुळे तब्येत खालावली तेव्हा त्यांचा चौधरीपणाचा वारसा चालवण्यासाठी अजित सिंह अमेरिकेतून भारतात परत आले.

जाटांनी घोषणा केली किसानोंका नया मसीहा अमरिकासे आया है. 

तेव्हा चरणसिंग यांचा लोक दल नावाचा पक्ष होता. या पक्षातून अजित सिंह यांची राज्यसभेवर निवड झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर लोक दलाचे प्रमुखपद देखील त्यांच्याकडे आले. इरसाल शेतकरी जाटांचा नवा नेता कंप्युटरच ज्ञान असणारा इंग्लिश मध्ये बोलून राजीव गांधींना निरुत्तर करू शकणार असा बुद्धिमान होता.

पुढे १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या परंपरागत बागपत लोकसभा मतदासंघातून मोठा विजय मिळवला. बोफोर्सप्रकरणात अडचणीत आलेल्या राजीव गांधींना त्या निवडणुकीत पराभूत होऊन पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यांचे सगळे विरोधक एकत्र आले आणि त्यांनी जनता दलाची स्थापना केली.  एकेकाळी राजीव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असणाऱ्या व्ही.पी.सिंग यांना पंतप्रधानपद मिळालं.

या जनता दलाचे सरचिटणीस म्हणून अजित सिंग यांची नेमणूक करण्यात आली. व्हीपी सिंग यांच्या मंत्रिमंडळात वाणिज्य व उद्योग खाते त्यांच्याकडे सोपवण्यात आले.

जनता प्रयोगाचे भविष्य भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात आलं.

पण फुटीचा शाप असलेल्या जनता प्रयोगाचे सरकार फार काळ टिकले नाही. व्ही.पी.सिंग जाऊन चन्द्रशेखर पंतप्रधान बनले मात्र तरीही अवघ्या दोन वर्षात जनता दल सत्तेतून पाय उतार झाला. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. काँग्रेसचे नरसिंह राव पंतप्रधान बनले.

फुटलेला जनता दल, गलितग्रात झालेले नेते,राम मंदिराच्या मुद्द्यातून उगम पावत असलेला भारतीय जनता पक्ष या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित सिंह यांनी नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांना  प्रक्रिया मंत्री करण्यात आलं.

बदलती राजकीय समीकरणे, अनेक वर्षे अमेरिकेत घालवल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क यामुळे जाट शेतकऱ्यांचा सर्वोच्च नेतेपद मिळालेल्या अजित सिंग यांना वडिलांचा वारसा मात्र समर्थपणे चालवता आला नाही. त्यांनी वेळोवेळी आपली  भूमिका बदलत केंद्रात मंत्रिपद मिळवलं.

एकदा तर त्यांनी आपला पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन केला. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री देखील झाले. मनमोहन सिंग यांच्या काळात विमान वाहतूक मंत्री झाले. पण या साऱ्या  पदांचा वापर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करण्यात त्यांना यश आले नाही.

उत्तर प्रदेश वरील त्यांची पकड सुटली, जाटांच्यातील त्यांचं वर्चस्व कमी झालं. शेतकरी प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची संधी त्यांनी वारंवार गमावली. 

याचाच परिणाम २०१४ सालच्या मोदी लाटेत तर त्यांचा घरच्या बागपत मतदारसंघातून पराभव झाला. माजी पोलीस महानिरीक्षक सत्यपाल सिंग यांनी त्यांचा पराभव केला होता. पुढे त्यांचे चिरंजीव जयंत सिंग राजकारणात आले. राहुल गांधींसोबत आघाडी करून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत चमत्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता मात्र त्यात देखील त्यांना यश आले नाही.

पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्यपाल सिंग यांनी जयंत सिंग यांचा पराभव केला.

अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दल या पक्षाचं जाटांच्यावरील पकड कमी झाल्याचं हे द्योतक होतं. गेल्या काही महिन्यापासून दिल्लीच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात देखील त्यांचा सहभाग दिसला नाही. जयंत सिंग पंचायती निवडणुकांच्या तयारी पासून पक्षाला मजबूत करताना दिसत होते.

जर शेतकऱ्यांचा एखादा नेता पंतप्रधान होण्याच्या जवळ जाऊ शकत होता तो म्हणजे अजित सिंह. जाटांच्या या शेवटच्या लोकनेत्याच आज दुर्दैवाने कोरोना मुळे निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.