पंतप्रधान शेतकऱ्यांना म्हणाले, ” पोस्टकार्डवरून सुटू शकणाऱ्या प्रश्नासाठी दिल्लीला का आलात?”

गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनातल्या शेतकर्यांना एका नेत्याचा इतिहास जरूर आठवत असणार, आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांच्या समस्यांची जाण असणारा नेता म्हणजेच चौधरी चरण सिंह. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘किसान दिन’ म्हणूनही साजरा केला जातो!

ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव पंतप्रधान चौधरी चरण सिंग !

महात्मा गांधी म्हणायचे कि, मुंबई-दिल्ली सारख्या शहरात खरा भारत राहत नाही तर खरा भारत हा  गावांमध्ये राहतो. पण भारताची सत्ता अशा लोकांच्या हातात आली, जी लोकं या मोठ्या -मोठ्या  शहरात राहतात.”

असे परखड आणि प्रामाणिक विचार मानणारे चरण सिंग. त्यांचा जन्म एका साधारण शेतकरी कुटुंबातला त्यामुळे कृषीप्रधान भारताचे वास्तव ते जाणून होते, आई-वडील शेतकरी त्यामुळे एक अल्पभूधारक शेतकरी निसर्गाच्या आणि शासनाच्या अशा दोन्हीही संकटात कसा सापडतो याचे वास्तव त्यांनी जवळून पाहिले होते.

दिल्लीत चाललेल्या शेतकरी आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने चरण सिंग यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे कारण शेतकऱ्यांच्या शेतमालाला MSP म्हणजेच योग्य भाव मिळावा यासाठी देखील ते प्रयत्नशील होते.

फक्त शेतकऱ्यांचा नेता म्हणवून चालत नाही त्यासाठी असे धडाकेबाज निर्णयही घ्यावे लागतात.  

१९३८ मध्ये त्यांनी विधानसभेत प्रथमच कृषी उत्पन्न बाजार विधेयक सादर केले जे भारतातील बर्‍याच राज्यांनी मंजूरही केलं, ग्रामीण भागातील कर्जदारांना दिलासादायक असलेले विभागीय कर्जमुक्ती विधेयक 1939 तयार करण्यासाठी आणि त्याला अंतिम रूपरेषा देण्यामध्ये चरण सिंह यांची भूमिका महत्वाची होती.

तसेच 1952 मध्ये ते महसूल व कृषिमंत्री म्हणून कार्यरत होते तेंव्हा कार्यकाळात त्यांनी सर्वप्रथम जमिनदारी उन्मूलन बिल-1952 हे विधेयक आणले होते. हे विधेयक आणताच अनेक तलाठ्यांनी अधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले होते. मात्र चरण सिंग यांनी ते राजीनामे स्वीकारून नव्याने पदभरती देखील केली होती.  जमीन धारणा कायदा 1960 तयार करण्यामध्येही त्यांचा  महत्त्वपूर्ण सहभाग होता.

साधे राहणी आणि उच्च विचार हे तत्व राजकारण्यांसाठी फक्त दाखवण्यापुरतेच असते परंतु चौधरी चरण सिंग यांच्या विचारात आणि राहणीमानात विरोधाभास मुळीच नव्हता. पंतप्रधान असतांनाही ते स्वतःला एक सामान्य शेतकरी आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणूनच संबोधयाचे.

शेतकऱ्यांच्या बाबतीत ते किती बारकाईने विचार करायचे त्या बाबतीतला एक किस्सा आठवतो,

हा प्रसंग आहे १९७७ चा, जेंव्हा चौधरी चरण सिंग हे देशाचे गृहमंत्री होते.

तेंव्हा उत्तर प्रदेशातील त्यांच्या भागातील काही शेतकरी, त्यांच्या गावाच्या पाण्याची समस्या घेऊन चरणसिंग यांच्या भेटीला दिल्लीला आले, हि अपेक्षा मनाशी बाळगून कि आपल्या राज्यातला नेता दिल्लीत गृहमंत्री आहे तर आपलं काम पूर्ण होईल.

चरणसिंग आणि त्या शेतकऱ्यांची भेट झाली. तेंव्हा चरणसिंग यांनी त्यांना विचारपूस केली, कुठून आले वेगैरे. आणि त्यानंतर पहिला प्रश्न विचारला की, “तुम्हा लोकांचा दिल्लीला यायचा आणि जायचा किती खर्च होत असेल ?” तेंव्हा शेकतकऱ्यांनी उत्तर दिले कि एकूण 120रुपये खर्च होतो. हे ऐकून चरणसिंह त्यांना रागावले, “जर हेच काम पाच पैशांच्या पोस्टकार्ड ने होऊ शकते तर तुम्हाला 120 रुपये खर्च करून दिल्लीला येण्याची काय गरज होती? ”

कोणता नेता आलेल्या शेतकऱ्यांच्या तिकिटाचा विचार करीत असेल का बरं ? पण चरणसिंग असेच होते, अगदी साधे आणि काटकसर स्वभावाचे. याच स्वभावामुळे ते असामान्य ठरत होते.

पुढे जाऊन त्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच परंतु त्यांना याचा देखील प्रत्यय आला की चरण सिंग शेतकऱ्यांचा किती विचार करतात ते.

त्यांचा अजून एक विशेष स्वभाव गुण जो सर्व राजकीय क्षेत्रात चर्चेचा ठरायचा. तो म्हणजे, त्यांना क्रिकेट हा खेळ अज्जीबात आवडत नसे, त्यांना क्रिकेट खेळणे आणि पाहणे म्हणजे निरर्थक वाटायचे. आणि हे ते जाहीरपणे बोलून देखील दाखवायचे.

एकदा ते भाषणात ते बोलले कि,  “रेडिओ वर क्रिकेटचे कॉमेंट्री प्रसारण बंद केले पाहिजे. या क्रिकेट खेळामुळे लोकं 5-5 दिवस बिनकामी आणि बेकार बनतात. देशातील लोकांच्या वर्किंग कॅपिसिटी वरती हा खेळ वाईट परिणाम करतो” असे त्यांचे मत होते.

चरण सिंग यांनी १९६७ मध्ये नेहरूंशी होणाऱ्या मतभेदामुळे कॉंग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय क्रांती दल हा त्यांचा राजकीय पक्ष स्थापन केला.

ज्या काळात जेंव्हा इंदिरा सरकार पाडणे अशक्यप्राय गोष्ट होती, अशा काळात चौधरी चरण सिंह सत्तेत आले.

आणि त्यांनी मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जनता सरकारमध्ये उपपंतप्रधान गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून पदनीयुक्त झाले. आणि २८ जुलै १९७९ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 1979 मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र इंदिरा सरकारने बहुमत सिद्ध होण्याआधीच पाठिंबा काढून घेतला आणि 1980 जानेवारी पर्यंत चरण सिंग काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहिले.

शेतकऱ्यांचा कैवारी समजल्या जाणाऱ्या या नेत्याचे दुःखद निधन 29 में 1987 मध्ये झाले. त्यांच्या मागे त्यांचे कुटुंबीय त्यांचा राजकीय वारसा  यशस्वीपणे चालवत आहेत.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.