निसर्गाचा कोप होण्यापूर्वी हजारो वर्षे कोकणातलं हे गाव भारतातलं सर्वात मोठं बंदर होतं.

मान्सून आला की कोकणाबद्दलच्या बातम्या चर्चेत येतात, मध्यंतरीही बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला होता. निसर्गावर गेली अनेक वर्षे आपण करीत असलेल्या अतिक्रमणाचा फटका आता बसतोय.

असच काहीसं कोकणातल्या अलिबाग जवळच्या चौल बंदरासोबत झालं होतं.

दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन काळापासून चौल हे भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदर होतं. महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले चौल हे तिमुल्ल, सेमुल्ल, चेमुल्ल, चिमोलो, सैमूर, सिबोर, चेऊल अशा विविध नावांनी प्राचीन भारतीय वाङ्मयात प्रसिद्ध आहे.

मुंबईजवळील कान्हेरी बौद्धलेणीसमूहातील इ. स. १३० या काळातील शिलालेखात येथील सोनाराने कान्हेरी येथे बौद्धभिक्षूंकरिता विहार व पाणपोईसाठी देणगी दिल्याचे उल्लेख सापडतात.

मौर्यकाळापासून हे शहर समृद्ध असल्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली होती.

पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी या ग्रीक प्रवासवर्णनात प्राचीन कलिया च्या (सध्याचे मुंबईजवळील कल्याण) दक्षिणेस चौल येथे स्थानिक बाजारपेठ असल्याचे नमूद केले आहे.

तसेच अरबी व युरोपियन प्रवाशांनीही चौलचा उल्लेख भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दोन मोठ्या बंदरांपैकी एक असा केला आहे.

२००२ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजतर्फे विश्वास गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली चौल येथे उत्खनन केले गेले.

या उत्खननात चौल येथे प्राचीन वसाहतीचे व प्राचीन बंदराचे अवशेष खाडीलगत, तसेच नदीकाठी असलेल्या दोन किमी.च्या परिसरात आढळले.

प्राचीन बंदराचे अवशेष, ‘जेटी’ची भिंत, सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, रिंगवेल (नळीची विहीर), सातवाहनकालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ ‘अ‍ॅम्फेरा अस बरंच काही या उत्खननात सापडलं.

चौल येथील उत्खननात आढळलेले वैशिष्ट्यपूर्ण मणी व मृदा भांड्याचे साधर्म्य पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील – किल्वा, मंडा, शंगा व क्वाना इत्यादी प्राचीन बंदरांत उपलब्ध झालेल्या – अवशेषांशी असल्याचे दिसून आले.

रोम पासून चीन पर्यंत चौलचा व्यापार चालायचा.

इ. स. ८ वे ते १८ वे शतक या काळात भारताचा पूर्व आफ्रिका, तसेच प्राचीन मेसोपोटेमिया, पर्शिया, आशियातील चीन, जपान, कोरिया या देशांशी समुद्रमार्गे असलेला व्यापार व त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांची ये-जा, तसेच सांस्कृतिक संबंध अधोरेखित होतात

चौल येथील उत्खननातील पुराव्यांच्या आधारे प्राचीन व्यापारी बंदराला जी गुण-वैशिष्ट्यांची जोड लागते ती सर्व चौल येथील बंदरात होती, असे निश्चितपणे सांगता आले.

त्याचप्रमाणे येथील वसाहतीचे अवशेष कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर सुमारे दोन किमी. अंतरापर्यंत विखुरलेले दिसून आले; यावरून या बंदराने सुमारे दोन हजार वर्षे आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली, असे निष्कर्ष उत्खनकांनी काढले आहेत.

सुती व रेशमी कापड विणणे, लाकडाच्या सुबक पेट्या, पलंग वगैरे बनविणे इ. कलांत वाकबगार कारागीर येथे होते. त्यामुळे व्यापाराची खूप भरभराट झाली होती.

याच काळात चौल येथील सुप्रसिद्ध रामेश्वर मंदिर उभारण्यात आले.

rameshwar temple chaul 1

सातवाहन कालानंतरही चौलचे महत्व अबाधित होते. इथे मुस्लिम सत्ताधीशांनी देखील येथील राजकोट किल्ला, हमामखाना, कलावंतिनीचा वाडा अशा वास्तू उभारल्या. या व अशा अनेक इमारतींवरूनही चौलचे तत्कालीन शाही वैभव दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील येथे आरमाराचे एक ठाणे वसविले होते. अनेक मराठेशाहीच्या सरदारांनी इथल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आढळतात.

पोर्तुगीजांनी देखील येथे आपलं वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र पुढे काही वर्षात चौलचे महत्व कमी होत गेले.

याला दोन प्रमुख कारणे होती. यातलं पहिलं कारण म्हणजे चौलची बदलत चाललेली भौगोलिक परिस्थिती. वारंवार येणारी वादळे, निसर्गात होत असलेले मोठे बदल याचा परिणाम चौलवर झाला होता.

अशातच कुंडलिका नदीच्या उजवीकडील भागात गाळ साचल्याने कालांतराने मोठे जहाज चौल बंदरात येण्यास असमर्थ झाले. याच्या परिणामी नदीचे पात्र बंदरापासून १ किमी. अंतरावर गेले व हे बंदर इतिहासजमा झाले.

चौलवर निसर्गाची अवकृपा झालीच होती

मात्र त्याच बरोबर इंग्रजांनी मुंबई या बंदराचं केलेलं निर्माण हे देखील चौलचे महत्व घटण्यास कारणीभूत ठरले. मुंबई प्रचंड वेगाने भरभराटीला येणारे शहर होते. चौलचे अनेक कारागीर मुंबईला स्थलांतरित झाले.

कारणे काहीही असोत मात्र जगाच्या नकाशावरील हे बंदर इतिहासाच्या उदरात गडप झाले.

आज निसर्ग सानिध्यात लपलेलं एक छोटं कोकणी गाव एवढीच त्याची ओळख उरलेली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.