आत्माराम बापूंना तिकिट मिळावे म्हणून चव्हाण साहेब थेट सरदार पटेलांच्या घराबाहेर जाऊन बसले

१९३४-३५ ह्या काळात महाराष्ट्रात समाजवादी पक्षाची बैठक तयार झाली होती.

राष्ट्रीय पातळीवर जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव ,अरुणा असफअल्ली, एस.एम.जोशी, अच्युतराव पटवर्धन, ना.ग.गोरे हे समाजवादी विचार निश्चित केलेले नेते समाजवादी पक्षाची मुठ बांधत होते.

काँग्रेसअंतर्गत ह्या समाजवादी पक्षाच्या स्थापनेत यशवंतराव चव्हाण सुद्धा सहभागी होते. पण पुढे जाऊन काँग्रेस व समाजवादी या वैचारिक द्वंद्वात यशवंतराव सापडल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टींचा विचार करून शेवटी काँग्रेसमध्येच राहण्याचा निश्चय पक्का केला.

सातारा जिल्हा हे यशवंतराव चव्हाण यांचे कार्यक्षेत्र होते.

क्रांतीवीर आत्माराम बापू पाटील, ह.रा.महाजनी, लक्ष्मणशास्त्री जोशी, दामुअण्णा एकबोटे, किसन वीर, काशिनाथ देशमुख, राघूअण्णा लिमये, बाबुराव गोखले,दादासाहेब आळतेकर, दिनकरराव निकम इंदुलीकर, भाऊसाहेब सोमण, अशी कितीतरी मंडळी त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यात जोडली गेली होती. सातारा जिल्हा राजकीयदृष्ट्या जागृत झालेला होता.

एका बाजूला कॉंग्रेसच्या कार्याने चांगलाच जोर पकडला होता.

त्याच वेळी म्हणजे १९३७ साली, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार म्हणून कोणाची निवड करायची यावरून सातारा जिल्ह्यात एक संघर्षाचा प्रसंग निर्माण झाला. जिल्ह्यातील प्रमुख आणि मान्यवर नेत्यांचा आग्रह असा होता की उमेदवार हा शिकलेला व शक्यतो वकील असावा. पण तरुण कार्यकर्त्यांचे असे मत होते की, उमेदवार हा तरूण व १९३० च्या चळवळीतून तयार झालेला असावा.

आणि तरुण कार्यकर्त्यांनी आत्माराम पाटील या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला व त्यातून मतभेदाची ठिणगी उडाली.

प्रमुख नेते सांगूनही आत्माराम पाटील यांना उमेदवार म्हणून स्वीकारायला तयार नव्हते, एवढेच काय तर आत्माराम पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून प्रमुख नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यातून संघर्ष निर्माण झाला होता.

आत्माराम पाटील यांच्या उमेदवारी बाबत काँग्रेस श्रेष्ठीपर्यंत वाद नेण्याचा निर्णय तरुण कार्यकर्त्यांनी केला. आणि ह्याची जबाबदारी स्वीकारली यशवंतराव चव्हाण ह्यांनी. यशवंतराव चव्हाण यांची कामगिरी अवघड होती, कारण पक्षश्रेष्ठींशी त्या वेळी कोणतीही जवळीक नव्हती. पण कार्यकर्त्यांच्या जिद्दीमुळे यशवंतरावांनी ही जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. स्थानिक पातळीवर सगळीकडे निराशाच मिळत होती.

त्यामुळे एक दिवशी यशवंतराव चव्हाण पुण्याला देव व जेधे यांच्या भेटीसाठी गेले. चर्चा केली, कार्यकर्त्यांची इच्छा सांगितली. त्यामध्ये जेधे काहिसे अनुकूल दिसले पण निर्णय कुणीच दिला नाही. अपयश घेऊन यशवंतराव चव्हाण परत साताऱ्याला आले.

पण कार्यकर्ते शांत बसण्यास तयार नव्हते. यशवंतरावांनी मुंबईमध्ये जावं आणि निर्णय करून घ्यावा असा त्यांनी आग्रह केला. सर्व कार्यकर्त्यांनी मिळुन पैसे काढून मुंबईला जाण्यासाठी यशवंतरावांना दिले.

यशवंतराव चव्हाण मुंबईला आले. त्यावेळी सरदार पटेल हे मुंबईला आपल्या मुलाकडे राहत होते. यशवंतराव थेट त्यांच्या घरी गेले. त्यांना भेटीसाठी चिठ्ठी पाठवली. बराच वेळ झाला पण काही हालचाल होत नव्हती. भेटीचे लक्षण दिसत नव्हते. म्हणून यशवंतराव यांनी घरासमोरच बैठक मारली.

बऱ्याच वेळानंतर सरदार पटेलांनी त्यांना आत बोलावून घेतले.

कोण?, कुठले? व का आलात? ह्या सर्व प्रश्नांची विचारपूस सरदार पटेल यांनी केली. मोठ्या हिंमतीने यशवंतराव यांनी उत्तर दिली. सीनियर बी.ए च्या वर्गातला मी एक विद्यार्थी आहे व तसेच तळागाळातला मी कार्यकर्ता आहे हे यशंतरावांनी सरदार पटेलांना सांगितले. सरदार पटेलांनी यशवंतरावांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं. पण स्वतःच्या मनाचा थांगपत्ता ही त्यांनी यशवंतरावांना लागू दिला नाही.

यशवंतराव सातार्‍याला परतले. त्यांनी कार्यकर्त्यांना सर्व हकीकत सांगितली. कोणालाच काही सुचत नव्हते.

आणि आश्चर्य असे की,

चार दिवसानंतरच उमेदवारांची यादी जाहीर झाली त्यामध्ये आत्माराम बापू पाटील यांचा समावेश झाला होता.

साऱ्यांनी यशवंतरावांचे अभिनंदन केले. पहिल्या टप्पा त्यांनी यशस्वीरीत्या पार केला होता. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समोर कामाचा व अडचणींचा भला मोठा डोंगर उभा राहिला. तरुण कार्यकर्त्यांजवळ पैसा नव्हता, साधनं न्हवती. निवडणुकीचा पहिलाच अनुभव यशवंतराव चव्हाण घेत होते. प्रचार प्रमुखांपैकी यशवंतराव चव्हाण एक प्रमुख होते.

संपूर्ण जिल्हाभर त्यांनी सभा आणि भाषणे घ्यायचे ठरवले. सर्वजण कामाला लागले, तहान-भूक विसरून सर्व जिद्दीने काम करत होते.

हळूहळू युवा कार्यकर्त्यांचा जम बसू लागला होता. निवडणूक झाली आणि नशीब असं बलवत्तर की सातारा जिल्ह्यातून जे उमेदवार निवडणूक लढवित होते त्या सर्वांपेक्षा आत्माराम बापू पाटील यांना सर्वात जास्त मते मिळाली. महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं मिळवणाऱ्यांपैकी ते एक विजयी उमेदवार ठरले. तरुण कार्यकर्त्यांनी विजय मिळवला.

निवडणुका संपल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांनी संघर्ष सावरून घेतला आणि तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी आपला आशीर्वाद दिला.

– कपिल जाधव

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.