दिवाळीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असणारा दिल्लीचा हा बझार मराठ्यांमुळे निर्माण झाला..

दिलोंपे राज करनेवाली दिल्ली. या दिल्लीवर अनेकांनी राज्य केले, अनेकांनी हल्ले केले, अनेकांनी लुटलं.  देशोदेशीवरून घुसखोर दिल्ली लुटायला यायचे. अनेक वेळा दिल्ली राखेतून पुन्हा उभी राहिली. महाभारतातल्या कौरवपांडवांच्या युद्धापासून ते मुघल सुलतानांच्या पर्यंत अनेक राज्यकर्ते या दिल्लीने पाहिले.

मुघलांनी खऱ्या अर्थाने दिल्लीवर राज्य केलं. तिला ऐश्वर्य मिळवून दिल. या मुघलांच्या दिल्लीत त्यांचा मुख्य राजवाडा होता लाल किल्ल्यात. याच लाल किल्ल्यात बसून औरंगजेबापासून पुढे अनेक बादशाहानी हिंदुस्तानच्या बऱ्या वाईटाचे निर्णय घेतले. शिवरायांच्या मराठा साम्राज्याला संपवण्याचं स्वप्न बघितलं.

पण याच दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये बसून एका मराठा वीराने संपूर्ण भारतावर राज्य केलं. त्यांचं नाव महादजी शिंदे

सतराव शतक. भारतात मुघल सत्ता मोडकळीस आली होती. इतर छोट्या मोठ्या शाह्या संपुष्टात आल्या होत्या. तेव्हा सर्वात ताकदवान सत्ता होती मराठेशाही.

पानिपतात आलेल्या पराभवाच्या राखेतून मराठ्यांनी आपल स्थान पुन्हा बनवलं होतं. पुण्यात धूर्त नाना फडणवीस अल्पवयीन सवाई माधवराव पेशव्याला मांडीवर बसवून राज्यकारभार पहात होता. तर होळकर, गायकवाड,नागपूरकर भोसले असे अनेक पराक्रमी सरदार देशभरात फिरून मराठ्यांचा दरारा निर्माण करत होते.

यात सगळ्यात आघाडीवर होते महादजी शिंदे.

शिंद्यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कण्हेरेखेड या गावचे. राणोजी व जयाप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहिमांतून महादजी शिंदेंना शिपाईगिरीचे शिक्षण मिळाले. महादजी शिंदेनी प्रथम तळेगाव-उंबरीच्या निजामावरील लढाईत पराक्रम करून नाव मिळविले. औरंगाबाद (१७५१), साखरखेडले , पंजाब  इ. मोहिमांतही त्यांनी भाग घेतला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत (१७६१) एका पठाणाने केलेल्या आघातामुळे ते लंगडा झाले.

पेशव्यांनी महादजी शिंदेंना सरदारकी दिली आणि पानिपतचे अपयश धुऊन काढण्यासाठी दिल्लीकडे रवाना केले. 

तिथे महादजी शिंदेनी नजीबखानाचा रोहिलखंड प्रांत लुटून ताब्यात घेतला आणि शाह आलम बादशहास इंग्रजांच्या तावडीतून सोडवून दिल्लीच्या तख्तावर बसविले. त्यामुळे पेशव्यांस उत्तरेत मराठयांचा जम बसविण्यास महादजी शिंदेंचा पराक्रम कारणीभूत ठरला. 

राजस्थानात उदेपूरच्या (उदयपूर) तंट्यात महादजी शिंदेनी साठ लाख खंडणी व प्रांत मिळविला आणि आपला सुभेदार तिथे नेमला.

इंग्रजांच्या कवायती सेनेची शिस्त पाहून त्यांनी डि. बॉइन या फ्रेंच सेनाधिकाऱ्यास आपल्या पदरी ठेवले आणि शिस्तबद्ध फौज तयार केली. त्यांच्या पदरी तीस हजार कवायती पायदळ, पाचशे तोफा व तीस हजार घोडदळ एवढे सुसज्ज सैन्य होते. ते मुख्यत्वे ग्वाल्हेर येथे असे, व राजधानी उज्जैन येथे होती.

त्यात मराठ्यांसोबतच मुसलमान, राजपूत व युरोपीय यांचा भरणा जास्त होता. त्यांनी तोफा ओतण्याचा कारखाना आग्र्यात काढून हत्यारे तयार करण्यास उत्तेजन दिले. दिल्लीच्या बादशाहीवरील मराठ्यांचे जे वर्चस्व कमी झाले होते, या कवायती फौजेच्या जोरावर ते पुन्हा प्रस्थापित केले आणि त्यासाठी दिल्लीतील मुसलमान सरदारांच्या १७८४ मधील भांडणाचा फायदा घेऊन बादशहास ताब्यात घेतले.

महादजी शिंदे मथुरेतून देशाचा कारभार पाहू लागले.

महादजी शिंदेंना बादशहाकडून पेशव्यांस ‘वकील-इ-मुतालिक’ (मुख्य कारभारी) ही पदवी मिळविली. स्वतःस नायबगिरी मिळवून बादशहास ६५,००० नेमणूक करून त्यांनी सर्व अधिकार आपल्या हाती घेतले. शिवाय बादशहाकडून गोवधबंदीचे फर्मान काढविले.

महादजीच्या वाढत्या सत्तेस शह देण्यासाठी मुसलमान सरदार व काही राजपूत राजे यांनी त्याविरुद्ध बंडाळी माजविली. महादजींना थोडीशी माघार घ्यावी लागली. दिल्लीच्या लाल किल्ल्यात गुलाम कादरने  मुघल बादशाह शाह आलमचे डोळे काढून त्याच्या जनानखान्याची बेअब्रू केली, तेव्हा महादजी शिंदेनी शीख-जाट यांना मदतीस घेऊन गुलाम कादर व त्याचे सहकारी मुस्लीम सरदार आणि उदेपूर, जोधपूर, जयपूर आदी राजपूत राजे यांचा पराभव केला. मराठ्यांनी दिल्ली पुन्हा हस्तगत केली आणि राजस्थानवर आपले वर्चस्व स्थापिले. हतबल शाह आलम यास पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविले आणि गुलाम कादरखान व बेग यांस देहान्त शासन केले.

त्यानंतर पातशाही कारभार महादजीने आपल्या हाती घेतला. अशाप्रकारे महादजींनी आपल्या पराक्रमाने व कर्तृत्वाने सतलजापासून तुंगभद्रेपर्यंत मराठी साम्राज्याच्या सीमा भिडविल्या आणि उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेचा दरारा निर्माण केला.

महादजी शिंदेच्या मुळे दिल्लीत मराठा भीमथडी तट्टांचा मोठा वावर सुरु झाला. स्वतः महादजी लालकिल्यातून कारभार हाकत होते. त्यांनी या काळात दिल्लीमध्ये अनेक सुधारणा केल्या. काही मंदिरे उभारली.

शहाजहानने उभारलेल्या चांदणी चौकाजवळ त्यांनी चावडी भरवण्यास सुरवात केली. सर्वसामान्यांच्या प्रश्नाचे ते निवारण केले जाई. दिल्लीतील हिंदी भाषिक जनता देखील या भागाला चावडी म्हणूनच ओळखू लागली.

पुढे इथे बाजार भरू लागला. साधारण १८४०च्या दरम्यान नाचगाण्याचे कार्यक्रम देखील होऊ लागले. पुढे इथली वस्ती तवायफांच्या नृत्यासाठी मशहूर झाली. अजूनही चांदणी चौकात खरेदी करायला येणाऱ्यांमधील शौकीन लोकांची पावले चावडी बझार कडे वळतात.

आजही इतक्या वर्षात चावडी बझार मधली तांब्याची भांड्याची दुकाने  प्रचंड फेमस आहेत. दिवाळी व इतर सणासुदीला इथे प्रचंड गर्दी असते. दिल्लीचा हा सुप्रसिद्ध बाजार मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष उभा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.