इंदिरा गांधींनीही मोदींप्रमाणे भारतात चित्ते आणायचा प्रयत्न केला होता, पण….

उद्या १७ सप्टेंबर. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बड्डे. त्यांना बड्डे गिफ्ट म्हणून भारतात ८ खास पाहुणे येणार आहेत. हे खास पाहुणे म्हणजे आफ्रिकन चित्ते. याच चित्त्यांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या सकाळी उदघाटन होणार आहे. भारतात नामशेष झालेला चित्ता तब्बल ७० वर्षानंतर भारतात परत येतोय.

नामिबिया देशातून आफ्रिकन प्रजातीचे ५ नर आणि ३ मादी असे ८ चित्ते आणले जातायेत पण जंगली चित्यांची वाहतूक एका खंडातून दुसऱ्या खंडात केली जाणारी हि पहिलीच घटना. भारतात येणाऱ्या चित्त्यांसाठी नवीन घर असेल मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्क !

तर ७० वर्षानंतर चित्ते भारतात आणले जातायेत तर त्याची व्यवस्था देखील खास असणारे.

ऍक्शन प्लॅन फॉर इंट्रडक्शन ऑफ चित्ता इन इंडियाने भारतात चित्ते आणण्याचं काम हाती घेतलंय. चित्त्यांना आणण्यासाठी भारताचं बोईंग विमान नामिबियाची राजधानी विंडहोक येथे गेलेलं आहे, इंटरेस्टिंग म्हणजे या विमानावर चित्त्याची प्रतिमा रंगवण्यात आली आहे. 

त्यांना घेऊन येताना हे विमान ८ हजार ४०५ किलोमीटरच्या सलग १६ तासांच्या प्रवासात कुठेही थांबता कामा नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. कारण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. एकतर ते माणसांच्या संपर्कात येतात. त्यांना पिंजऱ्यात बंद केल्यामुळे ते पॅनिक होणार. म्हणून या संपूर्ण प्रवासात चित्त्यांना भूल दिली जाणारे. पण भूल अशी दिली जाणार जेणेकरून ते जागे राहतील पण शांत राहतील. त्यांच्यासोबत पशुवैद्य वन्यजीव तज्ञ असतील.

चित्त्यांना दर तीन दिवसांनी १५ किलो मांस लागतंच लागतं.  आता हा लांबचा प्रवास हवाई मार्गाचा असल्यामुळे चित्त्यांना खायला घालणं धोक्याचं आहे. त्यांना उलट्या होऊन हे गुदमरु शकतात, आजारी पडतात आणि ही रिस्क आपण घेणार नाही. म्हणून प्रवासाच्या २ दिवस आधी या चित्यांना खायला घातलं नाही आणि प्रवासात देखील खायला मिळणार नाही. आज शुक्रवारी रात्री नामिबियातून हे विमान निघेल आणि उद्या सकाळी ८ वाजता ग्वाल्हेरला पोहोचेल. येथून या चित्त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कुनो पार्क येथे आणण्यात येणार आहे.

भारतात चित्ते नामशेष कसे झाले त्याचा इतिहास अगदी थोडक्यात बघुयात…

 

सोळाव्या शतकात सम्राट अकबराकडे हजारोंच्या संख्येत चित्ते होते अशा नोंदी आढळतात.  उच्चभ्रू आणि राजघराण्यातील लोक खेळ-शिकारासाठी प्राण्याची शिकार करत असत. पण चित्त्यांची शिकारही मोठ्या प्रमाणात झाल्याने भारतात त्यांचं प्रमाण कमी होत गेलं…

कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्यांच्यानंतर राजाराम महाराजांनी चित्यांकडून शिकार करून घेण्याचा छंद जोपासला होता. जे भारतात चित्ते होते ते आशियाई प्रजातीचे.  ऐकेकाळी चित्त्याचं वास्तव्य आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील सपाट भुभागावर होतं.

भारताच्या वायव्य दिशेला असलेल्या खिंडीतून तो भारतात आला असावा असा कयास मांडला जातो. १९०० सालानंतर चित्त्यांची संख्या कमी होऊ लागली. ऐतिहासिक नोंदीनुसार भारतातील शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार १९४७ मध्ये मध्य प्रदेशातील महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांनी केली होती. तर इतर काही नोंदी सांगतात कि भारतामध्ये शेवटचा चित्ता १९६७ च्या दरम्यान आढळला होता..एकीकडं शिकारीचं प्रमाण वाढलं तर दुसरीकडं चित्त्याचं वस्तीस्थान असलेला गवताळ प्रदेश कमी होत गेला..गवताळ प्रदेशाची जागा शेतीने घेतली..तसेच मानवी अतिक्रमणही झालं आणि भारतातून चित्ता नामशेष झाला

बरं चित्ते भारतात आणण्याचा प्रकल्प हा मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं सांगण्यात येतं पण चित्त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न फक्त मोदींनीच केले नाहीत तर इंदिरा गांधींच्या काळातही झाले होते.

हे चित्ते भारतातून नामशेष झाल्यानंतर चित्ता भारतात आणावा ही कल्पना सगळ्यात आधी १९७२ मध्ये भारतातील वन्यजीव विभागाचे पहिले प्रमुख रणजितसिंह यांनी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारसमोर मांडली होती.  त्याकाळात जवळ जवळ ३०० आशियाई चित्ते इराणमध्येच होते. ते चित्ते भारतात आणायचे आणि त्याबदल्यात इराणला भारतातील आशियाई सिंह द्यायचे अशी डील ठरली होती पण त्यावेळी आलेल्या काही अडचणींमुळे ते शक्य झालं नाही.

त्यानंतर २००८ मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने भारतात चित्यांचं पुनर्वसन करण्यासाठी इराण कडे चित्त्याची मागणी केली होती. त्यावेळी इराणमध्ये आशियाई प्रजातीचे फक्त १२ च चित्ते उरले होते. त्यामुळे इराणने चित्ते द्यायला नकार दिला.  

मग आशियाई चित्त्याच्या खूप जवळचा भाऊबंद असणारा अफ्रिकन चित्ता भारतीय जंगलातील वातावरणाशी सहज जुळवून घेऊ शकेल याचा अभ्यास केला गेला आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेला आफ्रिकन चित्त्याची मागणी केली आणि त्यांनी चित्ते देण्याची तयारी दाखवली. 

तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी चित्ते भारतात आणायचेच मनावर घेतलं. 

सप्टेंबर २००९ मध्ये त्यांनी रणजितसिंहांना  चित्ता भारतात आणण्यासाठी सविस्तर कृती आराखडा बनवण्यास सांगितलं. त्यानुसार मध्य प्रदेशातील  कुनो राष्टीय उद्यान फिक्स केलं. या उद्यानाच क्षेत्रफळ पाहता तेथे भविष्यात चित्त्याची संख्या वाढून २७- ३० चित्ते राहू शकतात असं मत मांडलं. जसं जसं चित्त्यांची संख्या वाढत जाईल तसं तसं भारतातील आणखी ७ जागांची निवड करण्यात आली. 

२०११ मध्ये नामिबियाच्या चित्ता  संवर्धन प्रकल्पाच्या लॉरी मार्कर यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली..त्यांना कुनोचं वातावरण चित्त्यांसाठी खूप पोषक असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता जवळजवळ १० वर्षांनी अखेर हे चित्ते भारतात येतायत

उद्या चित्ते भारतात आणले जातायेत पण त्याच्या पुढंचं नियोजन काय असेल ?

तर चित्यांना ठेवण्यासाठी मध्य भारतातील सुमारे १० ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते त्यापैकी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर हे चित्त्यांसाठी सर्वात योग्य अधिवास ठरेल असा निष्कर्ष काढण्यात आला. भारतात चित्त्यांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करणं इथून पुढे महत्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारलाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. जैव प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे.

आफ्रिकेतून आणलेले चित्ते थेट जंगलात सोडले तर ते पुन्हा नामशेष होण्याची भिती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली होती त्यामुळेच त्यांना मोकळ्या जंगलात न सोडता मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात ठेवलं जाणार आहे.  कुनोला पोहोचल्यानंतर चित्त्यांना ३० दिवस क्वारंटाईन करण्यात येईल. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे. तिथं त्यांना शिकारीसाठी लहान -मोठी हरणं, चार शिंगी हरीण असतील….

हा प्रोजेक्ट जर सक्कसेसफुल झाला तर पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होईल. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत सद्द्याला ८ चित्ते आणले जातायेत मात्र येत्या ५ वर्षात ४० कोटींचा खर्च करून आणखी ५० चित्ते आणले जातील अशी माहिती केंद्रीय पर्यावरण विभागाने दिलेली…त्यामुळे कधीकाळी नामशेष झालेला चित्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे…

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.