आपली हरणं मारून गावाचे चित्ते जगवायलेत म्हणून बिश्नोई समाज आक्रमक झालाय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील नामिबियामधून ८ चित्ते भारतात आणण्यात आले. हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडल्याची चर्चा सगळीकडे होत आहे. सोबतच७० वर्षांनंतर चित्ते भारतात आणण्यात आलेत याचा अनेकांना आनंद सुद्धा झालाय.

पण या चित्त्याच्या शिकारीसाठी जंगलात काळविटांना सोडल्यामुळे बिश्नोई समाज मात्र नाराज झालाय

बिश्नोई समाजातील सगळ्यात मोठी संघटना मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे सदस्य हरियाणा राज्यातील फतेहाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत. 

आंदोलनकर्त्या महासभेचं म्हणणं आहे की,

“भारतात आणलेल्या ८ चित्यांची भूक भागवण्यासाठी मध्यप्रदेशातील राजगडच्या जंगलांमधुन १८१ चितळ आणि हरीण कुनो अभयारण्य पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. म्हणून या चितळांना परत राजगडच्या जंगलात सोडण्यात यावं”

आंदोलनाचं नाही तर बिश्नोई महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. तसेच चितळांना परत त्यांच्या मूळ अधिवासात पाठवण्यात यावं अशी मागणी केलीय. येत्या २१ सप्टेंबर रोजी ट्विटरवर

#SaveDeer आणि #kunoNationalPark

हे दोन हॅशटॅग ट्रेंड करण्याचं आवाहन केलं जात आहे.

पण ही मागणी करणाऱ्या बिष्णोई समाजाचं नाव कुणासाठीच नवीन नाही. कारण शाळेच्या पुस्तकातच त्यांच्यासोबत आपला पहिला परिचय झालेला… 

इ.स. १७३० मध्ये जोधपूरच्या महाराज अभयसिंह यांनी राजवाडा बांधायचा ठरवलं होतं. त्यासाठी चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवं होतं. त्यासाठी त्यांनी शोध सुरु केला. शोध पोहोचला जोधपूरपासून सोळाच मैलांवर बिश्नोईंचं खेजडली गावापर्यंत. या गावाजवळ खेजडीची मुबलक झाडं होती आणि जवळच चुन्याच्या खाणीही होत्या.

खाणीपर्यंत जाण्यासाठी आणि चुना काढून आणण्यासाठी ती खेजडीची झाडं अडथळा बनली होती. त्यांना दूर करून मार्ग सुकर होणार होता. म्हणून राजाचे कामगार कुऱ्हाडी घेऊन खेजडलीला पोहोचले. हे बघताच बिश्नोई लोकांनी विरोध केला. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत दिवाणाने झाडे तोडण्याचा हुकूम केला.

गावकरी विनवणी करत होते…हा पर्यावरण आमचा धर्म आहे. कृपया तो तुडवू नका, ही वृक्षसंपदा नासू नका.” 

तरीही राजाचे सैनिक ऐकत नाही म्हटल्यावर बिश्नोई समाजाच्या स्त्रिया पुढे सरसावल्या आणि त्यांनी झाडांना कवटाळलं. त्यात गावातली अमृतादेवी आघाडीवर होती. मात्र आदेशाचं पालन करण्यासाठी सैनिकांनी कठोर होत गावकऱ्यांवर तलवारीने वार केला. अर्धवट कापलेलं शरीर, शरीरापासून दूर झालेले शीर जमिनीवर पडले. रक्ताचे पाट वाहू लागले.

अमृतादेवीसह गावातले ३६३ गावकरी मारले गेले.

बिश्नोईंचा जीव गेल्याची बातमी राजाकडे पोहोचली. पर्यावरणाच्या बाबतीत बिश्नोई लोकांची श्रद्धा आणि समर्पण बघून राजाची मग्रुरी उतरली. तो स्वतः खेजडलीला पोचला आणि गावकऱ्यांची माफी मागितली. यापुढे बिश्नोईंच्या गावाजवळचं एकही ‘हिरवं’ झाड तुटणार नाही, अशी हमी राजाने दिली.

उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान या प्रांतांत बिश्नोई समाजाचं वास्तव्य आहे.

अशा या पर्यावरण वेड्या बिश्नोई समाजाची स्थापना केली होती जांभोजी यांनी. इ.स. १४५१ ते १५३६ असा त्यांचा कालखंड होता. त्यांच्या हयातीत १४८५ मध्ये मारवाडमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. अनेक जण कुटुंबासह आणि जनावरांसह माळव्याकडे रवाना होऊ लागले होते. मानवाचं हे दु:ख पाहून जांभोजींनी त्यांना मदत केली आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रेरित केलं.

ज्या काळात भारतीयांना आधुनिक विज्ञान माहित नव्हतं, ‘खेजरी’ वृक्षाच्या मुळाशी वातावरणातील नायट्रोजन स्थिर करणारे जीवाणू वास करतात, हे माहीत नव्हतं… त्या काळात जांभोजींनी खेजरीचं महत्त्व ओळखून त्याचं रक्षण करण्याचं कार्य सुरू केलं. जांभोजींनी वृक्ष-वनस्पतींमध्ये आत्मा निवास करतो असं सांगितलं. आज आपण विज्ञानात ‘झाडं सजीव असतात, त्यांच्यात देखील श्वसन क्रिया असते’ हे जे शिकतो ते बिश्नोई समाजाला जवळपास ५३० वर्षांपेक्षा आधी ज्ञात झालं होतं. 

त्याचप्रमाणे गवत खाऊन जगणाऱ्या हरणाचं महत्त्वही त्यांच्या डोळ्यांपासून लपून राहिलं नाही. हरणांच्या मलमूत्रातून जमीन सुपीक होण्याची प्रक्रिया आपोआपच होत असते कारण हरणं दूरवर उड्या मारत राहतात, हे देखील त्यांनी ओळखलं. म्हणून जांभोजींनी जंगलात वसलेल्या हरणांना शेतात आणि  खेड्यापाड्यात आणलं.

पंधराव्या शतकात भारतावर दिल्ली सल्तनतच्या तुर्की राज्यकर्त्यांनी राज्य केलं आणि चहूबाजूंनी हिंसेचं वातावरण निर्माण झालं तेव्हा जांभोजींनी बिश्नोई पंथाची स्थापना केली. जांभोजी यांनी आपल्या अनुयायांसाठी २९ नियम दिले होते. ज्यात पर्यावरण संरक्षण आणि मानवी मूल्यांच्या वितरणावर भर देण्यात आला. या २९ नियमांमुळेच या समाजाला मिळालं.

२० आणि ९ असं मिळून बिश्नोई नाव तयार झालं.

या २९ नियमांमध्ये बहुतांशी नियम पर्यावरणाच्या रक्षणाचे होते. २९ नियमांपैकी ८ नियम प्राणी, पक्षी, वृक्ष आणि पर्यावरणाच्या संरक्षणाशी संबंधित आहेत. हिरवं झाड तोडणं, जनावरांची कत्तल करणं हे नियमांच्या विरुद्ध होतं. त्यावेळी खेजडीच्या झाडाला राजस्थानातील कल्पवृक्ष म्हटलं जायचं कारण वाळवंटी परिस्थितीतही भरभराटीला आलेलं हे झाड होतं. त्यांच्यापासून जनावरांना चारा तर मिळालाच, पण माणसांचं अन्नही त्यांच्या फळांपासून मिळवलं जायचं.

पुढे जांबोजीचा प्रभाव समाजाच्या लोकांच्या मनावर खूप खोलवर झाला. बिश्नोईंनी निसर्गसंवर्धनालाच त्यांच्या जीवनशैलीचा आधार मानलं. जगातील सर्व जीवांविषयी कळवळा घेऊन अहिंसा आणि सदाचाराचं जीवन जगणं हाच या जगात जगण्याचा उत्तम मार्ग असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

निसर्गप्रेमाची भावना पर्यावरण रक्षणाचं मूळ आहे आणि हेच मानवनिसर्गप्रेम माणसाचं अस्तित्व जपण्यात यशस्वी होऊ शकते, असं बिश्नोईंचं म्हणणं आहे.

मानवी संस्कृतीच्या इतिहासात नैसर्गिक संपत्तीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पर्यावरण आणि मानव हे परस्परपूरक आहेत. प्राचीन काळापासून पृथ्वीवर मानवी संस्कृतीची भरभराट होण्यात वृक्षांनी अभूतपूर्व योगदान दिलंय. शुद्ध हवा, गोडे पाणी, जमिनीची सुपीकता आणि मूलभूत गरजा – अन्न, वस्त्र निवारा यांचा पुरवठा हा मानवी जीवनाचा पाया आहे, जो मुळात जंगलांवर आधारित आहे.

या गुणांमुळे झाडांना पृथ्वीवरील ‘सजीव देव’ अशी बिश्नोईंची श्रद्धा आहे.

सम्राट हर्षवर्धन, सम्राट अशोक, शेरसाह सुरी यांनी बांधलेल्या महामार्गांसाठी असंख्य वृक्षांना कापलं लागलं. तेव्हा पर्यावरणातील हा दोष आणि त्यामुळे झालेला बदल टाळण्यासाठी नंतर हाजारो वृक्ष रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावावी लागली.

माणसाची साधी वृत्ती आहे. ज्याच्याकडे माणूस श्रद्धापूर्वक बघतो, त्याला तो कधीही हानी पोहोचवत नाही आणि तर इतरांपासूनही त्याचे रक्षण करतो. याचा परिचय प्रत्येकालाच कधी ना कधी आलेला असणारच. नेमकं हाच मानसशास्त्रीय-वैज्ञानिक अप्रोच जांभोजी यांनी ओळखला होता. म्हणून त्यांनी निसर्ग कसा पूजनीय आहे, हे बिश्नोईंना सांगितलं.

तेव्हापासून पर्यावरण हाच बिश्नोईंचा धर्म बनला. आणि धर्म रक्षणासाठी माणूस कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सध्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचं निरीक्षण केलं तर समजून येईलच.

निसर्गाचा नाजूक समतोल राखला जावा आणि माणसाचं भविष्य अधिकाधिक सुरक्षित राहावं, यासाठी माणूस आणि निसर्ग यांच्यातील प्रेमसंवादाचा अनोखा आधार म्हणजे जांभोजींची ही संकल्पना आहे. त्यांचा प्रभाव इतका मोठा होता की दोन शतकांनंतरही दुर्गम वाळवंटातील खेजडली गावातील झाडे जगवण्यासाठी ३६३ जणांनी आत्मबलिदान केलं आणि जगाच्या कल्याणात योगदान दिलं.

जगाच्या इतिहासातील ही एक अभूतपूर्व आणि अद्वितीय घटना मानली जाते. वृक्षप्रेमी रिचर्ड बेकर हे जेव्हा भारतात आले होते आणि त्यांनी ही घटना ऐकली तेव्हा ते अवाक झाले. त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ट्री ह्युमन ऑर्गनायझेशनच्या १०८ शाखांच्या माध्यमातून ‘पर्यावरण संरक्षण मॉडेल’ म्हणून जगातील सर्व देशांत त्यांनी या कथेचा प्रसार केला.

पुढे या चळवळीने भारतातील लोकांनाचिपको चळवळहाती घेण्याची प्रेरणा दिली.

एप्रिल १९७३ मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात ‘चिपको’ आंदोलनाची सुरुवात झाली. अलकनंदा खोऱ्यातील जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या कंपनीला देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयाला विरोध करण्यातून ‘चिपको’ आंदोलन उभं राहिलं.

गावातील आंदोलकांनी विरोध करूनही जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. ठेकेदारांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतलं आणि त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. मात्र एका मजुराने हे बघितलं आणि धावत गावात खबर दिली.

त्यावेळी गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुलं होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार होते. मात्र तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया हिरिरीने उतरल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली.

पेड कटने नही देंगेच्या घोषणा त्यांनी दिल्या.

ठेकेदारांनी स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या. पण, एकीनीही ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही. शेवटी मजूरांनी माघार घेतली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आंदोलन होतं. जे बिश्नोई समाजाच्या प्रेरणेतून जन्माला आलं.

आजही बिश्नोई समाज राहत असलेल्या संपूर्ण परिसरात वृक्ष, हरीण, ससा, नीलगाय अशा वन्यप्राण्यांची शिकार करण्याची परवानगी कोणालाच नाही. बिश्नोई हरणाचं संरक्षण तर करतातच, शिवाय हरणावर उपचार करतात, त्यांचं संगोपनही करतात. एखाद्या हरणाच्या पिल्लाला आई नसेल तर बिश्नोई माता स्वतः त्याला स्तनपान देतात.

अशा प्रकारचं उदाहरण या पृथ्वीतलावर वसलेल्या कोणत्याही मानवी समाजात क्वचितच आढळेल.

जोधपूर, नागौर, बिकानेर, जैसलमेर, बाडमेर इथल्या काटेरी कोरड्या जंगलात बिश्नोई समाजाने हरणांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय कुत्र्यांच्या चावण्याने जखमी आणि आजारी असलेल्या हरणांवर उपचार करण्यासाठी रेस कम सेंटर उभारले आहेत.

हरणांबरोबरच इतर जखमी प्राणी- पक्ष्यांवरही या केंद्रांवर उपचार केले जातात. बिश्नोईंच्या गावात बकऱ्यांची देखील कत्तल केली जात नाही. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी संपूर्ण गावाने उचलली असते.

या समाजाच्या भावनांचा आदर करून सरकारने बिश्नोई बहुल गावांलगतच्या परिसराला ‘अखेत प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केलं आहे.

बिश्नोई समाजाकडून प्राण्यांच्या रक्षणासाठी बरीच दक्षता घेतली जाते, त्यानंतरही शिकाऱ्यांकडून हरणांची छुपी शिकार करण्याच्या घटना घडतात. अनेकदा बिश्नोई समाजातील लोकांनी शिकारींचा प्रतिकार करताना प्राणांची आहुती दिली आहे.

अशा समाजातून लॉरेंस येतो ज्याने सलमानला मारण्याची धमकी दिली असल्याचं बोललं जातंय आणि  कारण दिलं जातंय की त्याने काळवीटाची हत्या केली होती. पण बिश्नोई समाजाचा एकंदरीत इतिहास बघता.. पर्यावरणातील संपूर्ण सजीवांचं रक्षण आणि अहिंसा हा त्यांचा जीवनमंत्र असल्याचं समजतं. त्याच्या रक्षणासाठी हवं तर स्वतःचा जीव ते देतात.

अशात ते कोणत्याही मानवाचा जीव घेणारी हिंसा करतील का? आणि जर करणार असतील तर बिश्नोई समाजाचे मूल्य बदलले आहेत का? हे प्रश्न डोक्यात घर करतात…  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.