नामिबीयातून चित्ते आले पण कोर्टाचा आदेश असूनही गुजरातचे सिंह मध्यप्रदेशला जात नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी मोठ्या गाजावाजात नामिबियातले चित्ते मध्यप्रदेशच्या कुनो अभयारण्यात आणण्यात आले. कित्येक वर्षांच्या सरकारी प्रयत्नानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर अखेर चित्ते भारतात आले.

पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा गिरचे सिंह कुनो अभयारण्यात पोहोचलेले नाहीत. 

वाघ, बिबट्या आणि आता चित्ता अशा मांजर कुळातील तीन प्राण्यांचा अधिवास असलेले कुनोच्या अभयारण्यात जर सिंह आले असते, तर ही कुनोच्या जंगलांसाठी अतिशय गर्वाची बाब ठरली असती. पण २९ वर्षांपासून प्रयत्न करून सुद्धा गिरचे सिंह कुनोमध्ये पाठवण्यात आलेले नाहीत.

गिरचे सिंह कुनोमध्ये पाठवण्यात यावे यासाठी अनेक वन्यजीव अभ्यासकांनी मागणी केलीय. याकरिता न्यायालयीन लढा सुद्धा लढण्यात आला; मात्र अजूनही गुजरात सरकार राज्यातील सिंह दुसऱ्या राज्यात न पाठवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. 

पण प्राणीतज्ञांकडून होणाऱ्या मागण्या आणि न्यायालयीन लढ्यानंतर सुद्धा गुजरात सिंह द्यायला तयार नाही. यामागे कारण काय आहे?

तर एकेकाळी भारतापासून इराणपर्यंत आढळणारे आशियायी प्रजातीचे सिंह, हे सध्या फक्त भारतातल्या गुजरातमध्ये गीरच्या जंगलात उरलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात बेसुमार शिकार झाल्यामुळे हे सिंह लुप्त होण्याच्या मार्गावर पोहोचले होते. मात्र तत्कालीन जुनागढ संस्थानाचा शेवटचा संस्थानिक मुहम्म्मद महाबत खान तिसरा याने सिंहांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.

त्याने स्वतः कधी या सिंहांची शिकार केली नाही आणि ब्रिटिशांना सुद्धा कधी सिंहांची शिकार करू दिली नाही. त्यामुळेच गीरच्या जंगलात अजूनही सिंह अस्तित्वात आहेत. जगामध्ये एकमेव गुजरातच्या जंगलात आशियायी सिंह असल्यामुळे गुजरात त्यांना राज्याचं भूषण मानतो आणि त्यांचं संवर्धन करतो. 

मग गुजरातकडून सिंहांचं इतकं संवर्धन केलं जात असतांना त्यांना दुसऱ्या राज्यात नेण्याची मागणी का होतेय? 

तर गिरमध्ये सिंहांचं संवर्धन केलं जात असलं तरी वाढत्या संख्येमुळे गिरचे अभयारण्य त्यांच्यासाठी अपुरे पडत आहे. सिंह हा बाकी मांजर कुळाप्रमाणे आपला विशिष्ट भाग ठरवतो आणि त्यात राहतो. परंतु वाढत्या संख्येमुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण होतोय. ही गोष्ट वन्यप्राणी संरक्षकांनी वारंवार लक्षात आणून दिली आहे. 

सिंहांच्या या नैसर्गिक व्यवहाराच्या समस्येसोबतच साथीच्या आजारांचा मोठा धोका सुद्धा आहे. माणसाप्रमाणे वन्यप्राण्यांमध्ये सुद्धा साथीचे आजार येतात. असे आजार जर अभयारण्यात पसरले तर एकाच ठिकाणी असलेल्या सर्व सिंहांना धोका उद्भवू शकतो. 

कारण १९९४ सालात टांझानियाच्या सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये जंगलातील कुत्र्यांपासून पसरणाऱ्या कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस सुमारे १ हजार सिंहांचा मृत्यू झाला होता. ही संख्या सेरेंगेटीच्या एकूण सिंहांच्या एक तृतीयांश होती. 

त्यामुळेच १९९३ मध्ये गिरचे सिंह मध्य प्रदेशाच्या कुनो अभयारण्यात नेण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली. त्यासाठी मध्य प्रदेश सरकारने अभयारण्यात राहणाऱ्या २५ गावातील १.५ हजार कुटुंबांना पुरेशी व्यवस्था नसतांना सुद्धा दुसरीकडे स्थलांतरित केलं. मात्र गुजरात राज्याने यासाठी नकार दिला त्यामुळे सिंहांचं स्थलांतरण थांबलं.

पण २००८ मध्ये हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. तेव्हा कोर्टाने कुनोमध्ये सिंह पाठवा पण चित्ते आणू नका असे आदेश दिले.

२००८ मध्ये न्यायालयात गेलेलं हे प्रकरण ५ वर्ष कोर्टात चाललं. पण शेवटी एप्रिल २०१३ मध्ये यावर सुनावणी करताना कोर्टाने वन्यजीव तज्ज्ञांच्या अभ्यासाचा संदर्भ दिला आणि सहा महिन्याच्या आत काही सिंह गिरमधून कुनो अभयारण्यात पाठवावे असा आदेश दिला. तसेच याच आदेशात कोर्टाने सांगितलं की चित्त्यांना जर भारतात आणण्यात आलं तर त्यांना कुनो अभयारण्यात ठेवू नये.

कोर्टाने आदेश देऊन ९ वर्ष लोटल्यानंतर न्यायालयाने नाकारलेले चित्ते कुनोत आले मात्र सिंह अजूनही आले नाही.  

३४४.६८ चौ.कि.मी.चे क्षेत्रफळ असलेल्या कुनो अभयारण्यात वाघांसह मोठ्या संख्येने बिबटे सुद्धा आहेत. यात आता ८ चित्ते आल्याने अभयारण्यातली विविधता वाढली आहे. भविष्यात चित्त्याची संख्या वाढून ती २५ पर्यंत पोहोचेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. 

पण तज्ज्ञांनी पूर्वीच ज्या गोष्टीचं भाकीत वर्तवलं होतं ते या ९ वर्षांच्या काळात गिरमध्ये खरे ठरलेय.  

२०१८ सालात कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसची गिरच्या सिंहांना लागण झाली. त्याच्यामुळे एका वर्षात ३० हुन अधिक सिंहांचा त्यात मृत्यू झाला. त्याच्याच पाठोपाठ २०२० मध्ये आणखी ८५ सिंहांचा मृत्यू झाला. पण हा सिंहांच्या मृत्यूचा घटनाक्रम तेवढ्यावरच थांबला नाही. तर २०२० ते २०२२ या दोन वर्षांच्या काळात तब्बल २८३ सिंह मृत्युमुखी पडले आहेत.  

त्यामुळे लवकरच सिंहांना दुसऱ्या अभयारण्यात शिफ्ट करण्यात आलं नाही तर एकदिवस सगळे सिंह संपतील अशी शक्यता वन्यप्राणी अभ्यासक वर्तवतात. 

आता कुनोमध्ये चित्ते आणल्यामुळे ती जागा भरलेली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यान आणि गांधी सागर वन्यजीव अभयारण्य राजस्थानातील सीतामाता वन्यजीव अभयारण्य, कुंभलगड वन्यजीव अभयारण्य आणि मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प तसेच गुजरातमधील जेसोर-बलराम अंबाजी वन्यजीव अभयारण्य अशी एकूण  एकूण सहा पर्यायी ठिकाणं यासाठी सुचवण्यात आली आहेत.

मात्र यावर गुजरात सरकार काय भूमिका घेणार याकडे वन्यजीव अभ्यासकांचं लक्ष लागलेलं असेल. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.