चेतन चौहान ‘हा’ विक्रम करणारे जगातील पहिलेच क्रिकेटपटू ठरले होते.

चेतन प्रताप सिंग चौहान.

माजी भारतीय क्रिकेटर. ऐंशीच्या दशकातील  सुनील गावसकर यांचे ओपनिंग पार्टनर. सध्याचे उत्तर प्रदेशमधील नौगाव सादात विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री. त्यांचा आज वाढदिवस.

सप्टेबर १९६९ साली मुंबई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यातून आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरु केलेल्या चेतन चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामन्यांमध्ये २०८४ रन्स काढले. पण हे २०८४ रन्स काढताना त्यांनी एक असा विक्रम आपल्या नावे केला जो पुढची अनेक वर्षे त्यांच्याच नावावर कायम होता.

चेतन चौहान हे जागतिक क्रिकेटमधले पहिले खेळाडू  होते की ज्यांनी एकही शतक न झळकावता २००० रन्सचा टप्पा पूर्ण केला होता. १९८०-८१ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अडीलेड कसोटी सामन्यात त्यांचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं होतं. हीच त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

 

हा विक्रम पुढे शेन वार्न या महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने २००० रन्सचा टप्पा पूर्ण करेपर्यंत त्यांच्याच नावावर होता. वार्नने याबाबतीत चेतन चौहान यांना मागे टाकले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक न झळकावता ३००० रन्स काढणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला.

chetan chauhan
cricfit

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरी चेतन चौहान यांना शतक फटकावता आलं नसलं तरी प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्यांची कामगिरी अतिशय शानदार राहिलेली आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेल्या १७९ सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर १११४३ रन्स जमा असून त्यात त्यांच्या २१ शतकांसह  ५९ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. १९७२-७३ सालच्या रणजी मोसमात त्यांनी गुजरात आणि विदर्भाच्या संघाविरुद्ध खेळताना सलग २ द्विशतकं झळकावली होती.

त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असला तरी त्यांनी बहुतांश प्रथमश्रेणी क्रिकेट महाराष्ट्र आणि दिल्लीच्या संघाकडून खेळल. वडील सैन्य अधिकारी असल्याने त्यांची बदली पुण्यात झाली होती, त्यामुळे त्यांचा बराच काळ पुण्यात गेला. त्यामुळेच ते रणजी सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत असत. पुढे त्यांनी दिल्लीकडून खेळायला सुरुवात केली.

आपल्या कारकिर्दीतील शेवटचा प्रथमश्रेणी सामना ते दिल्लीकडूनच मुंबईविरोधात खेळले. १९८५ सालच्या रणजी ट्रॉफीचा हा अंतिम सामना होता. सामन्याच्या दोन्ही इनिंग्जमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली. पहिल्या इनिंगमध्ये त्यांचं शतक २ धावांनी हुकलं तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी ५४ रन्स काढल्या. परंतु या सामन्याच्या दुसऱ्या डावात रवी शास्त्रीच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीच्या संघाने मुंबईसमोर शरणागती पत्करली आणि मुंबईने रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले.

सामन्याच्या पहिल्या डावात ४ विकेट्स घेणाऱ्या रवी शास्त्रीने दुसऱ्या डावात देखील दिल्लीच्या ८ फलंदाजांना पॅव्हेलीयनचा रस्ता दाखवत मुंबईच्या जेतेपदात महत्वपूर्ण भूमिका निभावली.

क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेतल्यानंतर चेतन चौहान यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९१ सालची लोकसभा निवडणूक त्यांनी उत्तर प्रदेशातील आमरोहा मतदारसंघातून लढवली आणि जिंकली देखील. १९९६ साली त्यांचा पराभव झाला परंतु परत १९९८ साली निवडणूक जिंकत ते लोकसभेचे सदस्य झाले. पुढे १९९९ आणि २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. सध्या ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.