कसोटीवीर चेतन चौहान इचलकरंजीच्या या हौशी प्रेक्षकाला कधीच विसरले नाहीत…

चेतन चौहान. सुनील गावस्कर यांचा ओपनिंग पार्टनर अशी प्रमुख ओळख. त्यांच्या संबंधातील कोणत्याही बातमीची सुरुवात ही ‘गावस्कर यांचा ओपनिंग पार्टनर’ याच मथळ्यांनी व्हायची. पण त्या सोबतचं त्यांची स्वतंत्र आणि मोठी ओळख सांगायची झाली तर राहुल द्रविडच्या आधीची भारताची ‘द वॉल’ होते.

कारण आपल्या पहिल्या मॅचपासूनच चेतन चौहान खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहायचे. जागतिक क्रिकेटमधले ते पहिले असे खेळाडू होते की ज्यांनी एकही शतक न झळकावता २००० रन्सचा टप्पा पूर्ण केला होता. म्हणजेचं शतक जवळ आलं की सावध खेळायचे नाही. फक्त टिमसाठी खेळायचे.

अशा या क्रिकेटपटू चेतन चौहान यांचं आणि आपल्या इचलकंजीचं मात्र अतूट नातं होतं.

इचलकरंजी मध्ये त्याकाळी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत चेतन चौहान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बँकेचा संघ सहभागी व्हायचा आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी तब्बल दहा ते पंधरा हजार प्रेक्षक पन्नास वर्षांपूर्वी ही राजाराम मैदानावर येत असत. यातीलच एका हौशी प्रेक्षकांकडून मिळत असलेले ताक आणि भाजलेले शेंगदाणे अनेक वर्षे चेतन चव्हाण यांना अविस्मरणीय राहीले.

इचलकरंजीला खेळाची परंपरा संस्थान काळापासून होती. कबड्डी खो-खो प्रमाणेच शहरातील क्रिकेट त्या काळी गाजलेला असायचा. इचलकरंजी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यावेळी खासदार दत्ताजीराव कदम चषक क्रिकेट सामने भरत असत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र गोव्यासह अनेक संघ इचलकरंजी मध्ये येत होते.

चेतन चौहान हे महाराष्ट्र बँकेकडून कप्तान म्हणू पाच वर्षे इचलकंरजी मध्ये येत असत. चेतन चौहान यांचा महाराष्ट्र बँकेचा संघ आणि त्याचा खेळ याबाबत इचलकरंजी सह परिसरातील नागरिकांना मोठे आकर्षण होते.

त्याकाळी इचलकरंजीमध्ये हॉटेलची किंवा राहण्यासाठी लॉजिंगची सोय नव्हती. त्यामुळे अर्बन बँकेच्या सभागृहात महाराष्ट्र बँकेच्या संघाला गाद्या टाकून त्या ठिकाणी त्यांची निवासाची सोय केली जात होती. सकाळी नाश्ता दुपारी वडापाव आणि मिळेल ते खायचे आणि संध्याकाळी घरगुती जेवणावर चेतन चव्हाण ताव मारत असत.

इचलकरंजी शहरात असलेल्या भरपूर घरगुती खानावळी बँकेतील कर्मचारी त्यांना डबा आणून देत असत व ते मनसोक्तपणे त्या ठिकाणी बसून जेवत असत.

महाराष्ट्र बँकेकडून खेळत असताना गोव्याच्या संघाविरुद्ध फलंदाजी करताना चेतन यांनी याठिकाणी शतक ठोकले होते. त्यांचा खेळ पाहण्यासाठी अक्षरशः सीमा रेषेपर्यंत प्रेक्षक बसलेले असत. त्या काळी सध्याचे बांधकाम अथवा कोणत्याच सुविधा या ठिकाणी नव्हत्या तरीसुद्धा नागरिकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी असत.

त्यातीलच एक हौशी प्रेक्षक चेतन चौहान यांच्या बद्दल प्रचंड आपुलकी असणारा होता. शहापूर येथून रोज सायकलने ती व्यक्ती क्रिकेट पाहण्यासाठी या ठिकाणी येत असत. येताना ताक आणि शेंगदाणे घेऊन येणारा हा प्रेक्षक एकदा भीतभीतच चेतन चौहान यांना ताक पिणारा का असे विचारले.

आपल्या चाहत्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी ताक पिले. ताक त्यांना खूप आवडले आणलेले कच्चे शेंगदाणे बघून उद्या भाजलेले शेंगदाणे आणा असाही सल्ला त्यांना त्यांनी दिला आणि त्यानंतर ज्या ज्या वेळी चेतन चौहान इचलकरंजीला येत असत त्यावेळी ते आवर्जून त्या हौशी प्रेक्षकांकडून शेंगदाणे खाण्यासाठी घेत असत.

इचलकरंजीला खेळण्यासाठी येण्यास आपल्याला खूप आनंद होतो असे ते आवर्जून सांगत. कारण त्यांच्या प्रत्येक खेळाला त्या वेळी इचलकरंजीतील प्रेक्षक भरभरून दाद देत असत.

एका स्पर्धेदरम्यान इचलकरंजी स्पोर्ट्स असोसिएशनचा संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल होण्याची शक्यता होती. त्यामुळे या संघात पुण्याहून दोन-तीन खेळाडू आणण्यासाठी त्यावेळचे खेळाडू बाळ मकवाना हे पुण्याला गेले. डेक्कन जिमखाना याठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रणजी सामन्यासाठी तयारी सुरू होती. मकवाना यांना पाहताच चेतन चौहान यांनी कशासाठी आला आहात असे आवर्जून चौकशी केली.

इचलकंजी संघासाठी तीन-चार खेळाडूची आवश्यकता आहे असे सांगताच त्यांनी राजू भालेकर, अफजल पठाण, विश्वास देशमुख आणि तुषार परमार या चांगल्या फलंदाज व गोलंदाजांची त्यांनी भेट घालून दिले. लगेच चेतन चौहान यांच्या शब्दाखातर हे सर्व खेळाडू रात्रीच्या साडे दहाच्या रेल्वेने निघून हातकणंगले येथे सकाळी दाखल झाले.

राजाराम मैदानावर होणाऱ्या सामन्यावेळी गोलंदाजी खासदार कदम बंगला व एसटी स्टँड अशा बाजूने होत असत. चौहान यांनी खासदार स्टेडियम लगतच राहतात का याची चौकशी केली आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. बाळ मकवाना यांनी सायंकाळी खासदार दत्ताजीराव कदम यांची भेट घालून दिली.

चेतन चव्हाण यांनी खासदार कदम यांना आपण सामना बघावयास आवर्जून यावे अशी विनंती केली. त्यांच्या विनंती खातर खासदार कदम दुसऱ्या दिवशी प्रेक्षक दालनात उभे राहूनच काहीवेळ क्रिकेटचा सामना पाहिला आणि ते पुढे निघून गेले. चेतन चौहान आणि इचलकरंजीचे घनिष्ठ नाते होते. हे संबंध अनेक वर्षे अविस्मरणीय राहिले…..

  • पत्रकार संजय खूळ यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.