मुंबईत छठपूजा फेमस केली ते एका शिवसैनिकाने, तर तीच महत्व कमी केलं मनसैनिकाने.
छठपूजा म्हंटल कि डोळ्यासमोर येत ते म्हणजे, बिहारी लोक आणि राज ठाकरे. छठपूजेला विरोध करत मनसे मोठी झाली. आता छठपूजा जवळ आलीय. पण छठपूजेला विरोध होताना काही दिसत नाही. पण याविषयाविषयी अनभिज्ञ असणाऱ्या हे माहित करून द्यायला हवं की, १९९८ च्या काळात ह्या छठपूजेच्या राजकारणावर संजय निरुपम, शिवसेना आणि राज ठाकरेंचाच वरचष्मा होता.
आधी छठपूजा म्हणजे काय ते समजून घेऊ.
छठ हे लोकांच्या श्रद्धेचं पर्व आहे. या पूजेच्या आयोजनासाठी कोणतंही ऐतिहासिक प्रमाण नाही. अख्यायिका अशी आहे की महाभारताच्या काळात द्रौपदीने निर्जळी उपास करून पाचही पांडवांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्यासाठी तिने षष्ठीला सूर्याची आराधना केली होती. तीच परंपरा अजूनही सुरू आहे, असं सांगितलं जात. म्हणूनच छठपूजेत व्रत करणारे लोक ३६ तास निर्जळी उपास करून सूर्याला अर्घ्य देतात. ही पूजा मुख्यत: बिहारमध्ये केली जाते. नंतर ती झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील लोकांतर्फे केली जाऊ लागली.
आता मुंबईत स्थायिक असलेले उत्तर भारतीय हि पूजा जुहूमध्ये करत. १९९३ मध्ये जुहू चौपाटीवर सार्वजनिकरित्या सर्वप्रथम छठ पूजा करण्यात आली. सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये छठ पूजेचं वातावरण अतिशय वेगळं होतं. त्याकाळी छठ पूजा करण्यासाठी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक पूजा करण्यासाठी येत असत. अगदी ४० ते ६० कुटुंबीय येत असत.
हळूहळू जुहूच्या छठ पूजेचं नाव लोकप्रिय होऊ लागलं. त्यानंतर लोक जमा होऊ लागले, काही वर्षांतच ही संख्या लाखाच्या वर गेली. १९९५-९६ मध्ये अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या नातेवाईकांनी जुहूच्या छठपूजेत भाग घेतला आणि छठपूजेला एक नवी ओळख मिळाली. त्यामुळे छठपूजेचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणावर होऊ लागला.
त्याच दरम्यान तत्कालीन शिवसेना नेते संजय निरुपम यांनी जुहूच्या किनाऱ्यावर ‘बिहारी फ्रंट’ नावाचा एक मंच तयार केला.
या मंचाच्या माध्यमातून पहिल्यांदाच लोकप्रिय गायिका शारदा सिन्हा यांना आमंत्रण दिलं आणि त्यांच्याकडून छठ गीत गाऊन घेतलं. त्यामुळे छठपूजेला आणखी वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर या समुद्रकिनाऱ्यावर अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, मनोज तिवारी, रवी किशन, विजया भारती, रंजना झा तसंच टीव्ही जगताशिवाय राजकारणाशी निगडित असलेल्या डझनभर व्यक्ती सहभागी होऊ लागल्या. या सगळ्यामुळे छठ पूजेचं आकर्षण लोकांमध्ये आणखीच वाढायला सुरुवात झाली.
जुहूमध्ये वाढणारी गर्दी पाहता राजकारणानेही वेग धरला. त्याकाळी निरुपम शिवसेनेचे फायरब्रांड नेते होते. बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ गेले, बाळासाहेबांनीही त्यांना जवळ केले. अनेकदा जाहिरपणे ते निरुपमांना आपला दत्तक पुत्र मानायचे. पण २००५ साली याच राजकारणाच्या कारणावरून संजय निरुपमांनी शिवसेना सोडली. त्यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हंटल होत कि,
माझ्या बिहारी फ्रंटतर्फे छठपूजा साजरी करण्यासाठी जुहूच्या किनाऱ्यावर जो उत्तर भारतीयांचा प्रचंड संख्येने समुदाय जमत होता, त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता होती. एकदा तर खुद्द शिवसेनाप्रमुखांनी त्याबद्दल माझ्यापाशी नाराजी व्यक्त केली होती.
पुढं २००८ मध्ये राज ठाकरे यांनी छठ पूजेविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. ३ मे २००८ ला शिवाजी पार्कवर मनसेचा दुसरा वर्धापन साजरा झाला. या समारंभात राज ठाकरे म्हंटले,
महाराष्ट्राचा ताबा मिळवण्याची उत्तर प्रदेश अन बिहारी लोकांची योजना माझ्यामुळे निष्फळ ठरली. त्यामुळे ते मला लक्ष्य बनवत आहेत. मणिपूरसारख्या राज्यांमध्ये उत्तर भारतीयांची झालेली हत्या आमच्या माध्यमांना दिसत नाही का? त्या लालूला म्हणावं, ये अन माझ्या घरासमोर छठपूजा करून दाखव. तो परत जाणार नाही.
राज ठाकरेंच्या विरोधात संजय निरुपम यांनी दंड थोपटले. त्यांच्याकडून छठपूजेच्या त्या मंचाचं काँग्रेसीकरण, छठ उत्सव महासंघाकडून व्यासपीठाचं भगवीकरण किंवा सुभाष पासी यांच्याकडून मंचाला राजकीय रंग देणं सुरूच राहील.
छठच्या राजकीयकरणामुळे छठच्या भक्तीला धक्का लागला. पुढं हा मुद्दा काळाच्या ओघात कुठं गायब झाला ते समजलंच नाही.