१०० वर्षांपूर्वी शाहू महाराजांना देखील अंबाबाईच्या मंदिर प्रवेशावेळी अडवलं होतं..

महाराष्ट्रात एका नव्याच वादाला तोंड फुटलंय. तो वाद म्हणजे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. 

झालं असं की, संभाजीराजे छत्रपती उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना ते श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी गेले. श्री तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य नेहमीच तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी आल्यावर थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत दर्शन घेतलं जातं. छत्रपतींच्या पुजाऱ्यांतर्फे आरती केली जाते ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. तरीदेखील संभाजीराजे छत्रपती यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. 

संभाजीराजेंनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी नम्र विनंती केली तरीदेखील जिल्हाधिकारी आणि तुळजापूरचे तहसीलदार यांनी गाभाऱ्यात जाण्यास बंदी असल्याचा सरकारी नियम दाखवत महाराजांना मंदिरात जाण्यापासून रोखले. नियम जरी योग्य असलेत तरी महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले जात नाही, ही परंपरा आहे. निजामाने आणि इंग्रजानी देखील यात हस्तक्षेप केला नाही तर मग आत्ता का रोखण्यात येतंय असा सवाल केला जातोय. 

म्हणून या विरोधात राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.. मराठा ठोक क्रांती मोर्चाने जाहीर निषेध व्यक्त केलाय. तसेच संबंधित मंदिर तहसीलदार व्यवस्थापक, धार्मिक व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी या सर्वांना निलंबित करावं नाहीतर राज्यभर जनआंदोलन करू असा इशारा मराठा ठोक क्रांती मोर्चाने दिलाय. 

तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी असल्याचा इतिहास असाय की, 

तुळजापूर देवस्थान हे स्वातंत्र्याच्या अगोदर कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते. स्वातंत्र्यापूर्वी हा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता मात्र छत्रपती घराण्याची कुलदेवता असल्यामुळे निजामाने देखील इथे कधीही हस्तक्षेप केला नव्हता. ब्रिटिशांच्या काळात देखील ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला नव्हता ना कोणते नियम लादले होते.

संभाजीराजे छत्रपती यांचे आजोबा म्हणजेच छत्रपती शहाजी महाराज यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिरावरची मालकी हक्क मागे घेतला आणि मंदिर भारत सरकारला स्वाधीन केले.  

असं असलं तरी छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा परंपरा आजही इथे पाळल्या जातात. जसं की, तुळजाभवानी मातेचा दररोजचा पहिला नैवेद्य हा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचाच असतो. तसेच भवानीमातेची पलंग देखील कोल्हापूरचे छत्रपती घराणेच अर्पण करत असतात. याशिवाय छत्रपती घराण्याने, मंदिराच्या देखभालीसाठी शेकडो एकर जमीन दान दिली आहे.

संभाजीराजेंना छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याची जी घटना घडली. पण असाच एक प्रसंग राजर्षी शाहू महाराज यांच्याही आयुष्यात आलेला. त्यांना कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाण्यापासून रोखलं होतं…

या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी बोल भिडूने इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितल्यानुसार, 

या घटनेला वेदोक्त प्रकरणाची पार्श्वभूमी आहे. १९०० ते १९०५ या ५ वर्षांच्या काळात वेदोक्त प्रकरण घडलं होतं. याच दरम्यान १९०२ ला शाहू महाराज परदेश दौऱ्यावर गेले होते. ते परदेश दौऱ्यावर  जाण्याआधी कोल्हापूरमधील जे ब्रम्हवृंद होते त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं की, 

“तुम्ही परदेशात जाण्याआधी ब्राम्हणांचा आशीर्वाद घेऊन जा, तर तुमची यात्रा सफल-संपूर्ण होईल”. 

मग यावर शाहू महाराज म्हणले कि माझे पूर्वज परदेशात जाताना ब्राम्हणांचे आशीर्वाद घेऊनच गेले होते पण ते तिथेच वारले. आता मी ब्राम्हणांचा आशीर्वाद न घेता जातो आणि बघतो कि माझा दौरा यशस्वी होतो कि नाही. 

पूर्वज म्हणजे शाहू महाराजांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराज. परदेशात गेलेले ते पहिले छत्रपती आहे जे परदेशात गेले होते. याच परदेशी दौऱ्याच्या वेळेस इटलीच्या फ्लोरेन्स शहरात ते वारले. 

आणि म्हणून मग शाहू महाराज म्हणाले कि मी ब्राम्हणांचा आशीर्वाद न घेता जातो काय होते ते बघूया..शाहू महाराज दौऱ्यावर गेले आणि यशस्वीरीत्या परत आले. 

परत आल्यानंतर छत्रपतींच्या रिवाजानुसार, अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात जाण्याचं ठरलं. पण तेथील ब्राम्हणांनी आणि मंदिराच्या पुजाऱ्यांनी महाराजांना असं सांगितलं कि तुम्ही ब्राम्हणांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आणि प्रायश्चित्त घेतल्याशिवाय अंबाबाईचं दर्शन घेऊ शकत नाही कारण तुम्ही समुद्र उल्लंघन करून धर्मशास्त्राचं उल्लंघन केलं आहे. 

त्यावर शाहू महाराज म्हणाले कि, “मी प्रायश्चित्त वैगेरे काहीही घेणार नाही. मी अंबाबाईचं दर्शन घेणारच”. 

त्यासाठी ब्राम्हणांचा प्रचंड विरोध केला मात्र महाराजांनी तो विरोध झुगारून अंबाबाईचं दर्शन घेतलंच.  या संपूर्ण घटनेचा उल्लेख शाहू महाराजांनी लिहिलेल्या पत्रात आहे.  

या घटनेला १०० वर्षे उलटून गेली आणि आजच्या घडीला तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून संभाजी महाराजांना अडवण्यात आलं…

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.