शिवरायांच्या मावळ्यांमुळे नॉर्थ इंडियाला मिरचीची ओळख झाली…
गोड गोड पदार्थ खाण्याची सवय असलेले लोकं जास्त मिरचीच्या नादी लागत नाही पण त्यातल्या त्यात तिखटाचं खाणाऱ्या लोकांना कालवणात मिरची नसेल तर त्यांना जेवण झाल्यासारखं वाटतं नाही. तिखट खाणारे माणसं अशी कल्पना कधीच करु शकत नाही की जर मिरची नसती तर…
मिरची नसती आयुष्य फिकट वाटलं असतं.
एक मात्र नक्की आहे की भारताइतकी मिरची इतक्या मोठ्या दुसऱ्या कुठल्याच देशात वापरली जात नसावी. क्वचित काही देश सोडले तर इतर देशांमध्ये मिरचीचं प्रमाण कमी आहे. काही देशांमध्ये मिरचीऐेवजी बेरीज वापरल्या जातात कारण मिरची ही बेरी फॅमिली मधून येते.
बर ते सोडा उगाच विषयांतर नको तर मुद्दा काय होता की,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमुळे नॉर्थ इंडियाला मिरचीची ओळख झाली.
भारतात मिरची ही 600 वर्षे जुनी मानली जाते. 1498 ला खलाशी असलेल्या वास्को द गामाने मिरची भारतात पहिल्यांदा आणली. 15 व्या शतकाच्या सुमारास ब्रिटिश भारतात आले त्यांनी मिरचीची ओळख इथल्या जनतेला करून दिली.
ब्रिटिशांनी मिरचीचा पहिला प्रयोग गोव्यात केला, गोव्यात मिरची चांगलीच बहरली आणि मग गोवामार्गे ती हळुहळू दक्षिण भारतात फेमस होत गेली. गोव्यात व्हायरल असलेली ही मिरची व्यावसायिक उद्देशाने मुंबईच्या ( तत्कालिन बॉम्बे) मार्केटमध्ये येऊन पोहचली. मुंबईत गोव्याहून आलेल्या मिरचीला गोवा मिर्च म्हणून नाव मिळालं.
आता हे सगळं मिरची आली कशी आणि व्हायरल झाली कशी प्रकरण एका बाजूला राहिलं पण दुसरीकडे नॉर्थ इंडियाला मिरचीची काहीच कल्पना नव्हती. तसही मिरची भारतात येण्याअगोदर भारतीय पब्लिक जेवणात भरपूर प्रमाणात काळी मिरी आणि मिरपूड घालायचे. पण मिरचीचा अस्सल ठसका सापडला तो म्हणजे मराठी लोकांच्या जेवणात.
असंही आपले मराठी लोकं तिखट काय लेव्हलचं खाऊ शकतात याचं उत्तर खेडोपाडी भरणाऱ्या जत्रेतल्या कंदुरीच्या जेवणात सापडू शकत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गनिमी काव्यात प्रभुत्व मिळवलेलं होतं. म्हणजे त्याकाळी मुघलांनी गनिमी काव्याचा धसकाच घेतला होता, कधी मावळे यायचे नुकसान करुन जायचे याची साधी कुणकुणही मुघलांना लागत नसे.
याउलट परिस्थिती मुघलांची होती. उघड्या मैदानावर लढण्यात ते वाकबगार होते पण महाराजांच्या गनिमी काव्याने त्यांच्या झोपा उडवल्या होत्या. शिवरायांनी गनिमी काव्याचा वापर खुबीने करुन घेतला आणि सगळा गेम पलटी केला होता.
शेकडोंच्या संख्येने असलेलं मुघल सैन्य शिवरायांच्या मावळ्यांना घाबरून राहू लागलं. कायम फिरतीवर असणाऱ्या गनिमी काव्याचा वापर करणाऱ्या मावळ्यांना पद्धतशीर जेवण मिळणे अवघडच होते. गनिमी काव्याप्रमाणे मराठ्यांचा आहारही तसाच थोडका पण हत्तीच बळ देणारा होता.
शिवरायांच्या या गनिमी काव्याच्या त्रासाला मुघल वैतागले होते. याच दरम्यान मिरचीची तिखट चव मुघलांच्या ऐकण्यात आली होती. त्यामुळे अशी दंतकथा सांगितली जाते की,
मिरची मावळ्यांना अतिशय प्रिय होती. मिरचीच्या तिखट चवीमुळे मावळे जास्त त्वेषाने लढत असे. त्यामुळे मराठ्यांना भयंकर योद्धे बनवण्याच श्रेय मिरचीच्या तिखटपणाला जातं अशी अख्यायिका आहे. जिथं जिथं मराठे गेले तिथं तिथं मिरची पोहचत राहिली.
मिरचीचा गोळा आणि भाकरी अशी मराठ्यांची शिदोरी असायची त्यामुळे जरा उसंत मिळाली की जेवायला बसल्यावर देवाणघेवाण चालायची त्यामुळे जिथं जिथं मराठे जात राहिले, शत्रूला कापत राहिले तिथं तिथं मिरची जाऊन पोहचली.
आज घडीला इतक्या वर्षांनंतर सुद्धा मिरची मराठी लोकांच्या आहारात टॉपला पाहायला मिळते. जगातला सगळ्यात मोठा देश हा भारत आहे की जो लाल मिरचीची लागवड करतो.
अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये जगातली सगळ्यात तिखट मिर्ची पिकवली जाते. अशा प्रकारे मराठ्यांच्या हातून मिरचीचा भारतभर आणि विशेषतः नॉर्थ इंडियामधला प्रवास सांगितला जातो.
छत्रपतींच्या गनिमी काव्याने नॉर्थ इंडियाला मिरचीची ओळख झाली. तर मिरचीच्या लोणच्यापासुन ते मिरचीच्या एखाद्या जब्राट पदार्थाची चव जी तूम्ही कधीच विसरू शकत नाही ते कमेंटमध्ये सांगा.
हे ही वाच भिडू :
- छत्रपती उदयनराजे अन् संभाजीराजे छत्रपती नावाच्या अगोदर आणि नावानंतर छत्रपती असं का ?
- अक्ख्या जगात जी भिवापुरी मिरची तिखट ठसके देते, ती आपल्या महाराष्ट्राची आहे भावांनो
- वडापावमध्ये रमलेल्या पुण्यात पहिली कच्छी दाबेलीची गाडी या तीन भावांनी सुरू केली
- छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातला सर्वात मोठा पुतळा महाराष्ट्राच्या या अवलियाने घडवलाय