या दोन आमदारांच्या वादामुळे छत्तीसगडच काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे.

पंजाब आणि राजस्थान नंतर आता छत्तीसगड राज्यात देखील कॉंग्रेसमध्येही मतभेद होण्याची चिन्हे दिसत आहेत. येथे आमदार बृहस्पति सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना जोर पकडताना दिसत आहे. छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकार मधील आरोग्यमंत्री टी.एस सिंहदेव यांनी आमदार बृहस्पति सिंग यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

त्याचवेळी टीएस सिंहदेव यांना या आरोपाचा इतका राग आला की ते स्वत: च्या बचावासाठी  आपल्याच  कॉंग्रेस सरकारच्या विरोधात गेल्याचे दिसून आले.

टीएस सिंहदेव यांनी वॉकआउट केलं.

टीएस सिंहदेव हे छत्तीसगडचे आरोग्यमंत्री आहेत. मंगळवारी २७ जुलै रोजी त्यांनी विधानसभेचे सत्र देखील अर्ध्यातच सोडले आणि सभागृहाबाहेर निघून गेले. मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पक्ष प्रमुखांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण यामुळे भाजपला मात्र कॉंग्रेसवर निशाणा साधण्याची संधी  मिळाली आहे.

रामानुजगंज येथील कॉंग्रेसचे आमदार बृहस्पती सिंग यांच्या काफिलावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ ते कॉंग्रेस सरकारच्या विरोधात बोलले आहेत. कॉंग्रेसच्या आमदारावर हल्ल्याची चौकशी करण्याच्या बाबतीत सरकार आदेश देत नाही किंवा निवेदनही देत नाही तोपर्यंत आपण या प्रतिष्ठित गटाचा भाग होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यापूर्वी २६ जुलै रोजी छत्तीसगड विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपने या घटनेबाबत बघेल सरकारला घेराव घातला होता. विरोधी पक्षांनी यासंदर्भात सभागृह समितीकडे चौकशीची मागणी केली होती. २७ जुलै रोजी राज्याचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनीही यासंदर्भात सभागृहात निवेदन दिले. मात्र, भाजप यात समाधानी नव्हते. ते म्हणाले की या उत्तरात आरोग्यमंत्र्यांवरील आरोपांचा उल्लेखच नाहीये.

जेंव्हा मीडियाने बृहस्पती सिंग यांनी केलेल्या आरोपांबद्दल सिंहदेव यांना विचारले तेव्हा ते म्हणाले,

“मला यावर काही बोलायचे नाही. ही त्यांची भावना असू शकते. माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी काय केले हे फक्त जनताच सांगू शकते. प्रत्येकाला माझ्याबद्दल माहिती आहे. मला स्वतंत्रपणे काही बोलण्याची गरज नाही. आमदारांमध्ये ताळमेळ असणे, मैत्री असणे चांगली गोष्ट आहे, एका पक्षातील आमदारांनी आप-आपसांत मिळून मिसळून राहावे हीच अपेक्षा”.

या वादासंदर्भात भाजप नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी भूपेश बघेल सरकारला घेराव घातला आहे. त्यांचं म्हणणे आहे कि, 

“हे सरकार गेल्या अडीच वर्षात संपूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. सरकारमधील मंत्री सरकारवरच  अविश्वास व्यक्त करत आहेत आणि त्या अविश्वासाचे समाधानकारक उत्तर देखील त्यांना मिळत नाही हे म्हणून ते विधानसभेत पाऊल टाकणार नाही असं म्हणतात हे खरंच गंभीर गोष्ट आहे. एखादा मंत्री या   सरकारकडून अपेक्षा करत नाही, आणि विश्वास ठेवत नाही तर मग राज्यातील २.७ कोटी लोकं काय  सरकारवर विश्वास ठेवू शकतील ?

त्यांनी कॉंग्रेसवर अशी तिखट टीका केली आहे कि,

“कॉंग्रेस हा पक्ष नाही तर एक दलदल आहे ! टी.एस.सिंहदेव आणि बृहस्पती सिंग यांच्यासह इतरही  आमदारांच्या चढाओढींवरून हे सिद्ध झालं आहे की, भूपेश बघल यांना ना आमदार सांभाळले जात आहेत ना छत्तीसगड.  ते कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस सरकार दोन्ही चालविण्यात अपात्र व असफल ठरले आहेत. ”

कोण आहेत टीएस सिंहदेव ?

टीएस सिंहदेव यांचे पूर्ण नाव त्रिभुवनेश्वर सरनसिंग देव असे आहे. २००८, २०१३ आणि २०१८ अशी सलग अंबिकापूर विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली.

सुरगुजा राज परिवाराशी ते सबंधित आहेत. छत्तीसगडमधील लोक त्याला ‘टीएस बाबा’ म्हणूनही  ओळखतात. ते छत्तीसगडचे सर्वात श्रीमंत आमदार म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. असं सांगितलं जातं की, त्यांची मालमत्ता ५०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांचे वडील आणि आजोबाही राजकारणाशी संबंधित होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या विजयानंतर सिंगदेव हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून मानले जात होते. परंतु कॉंग्रेस हाय कमांडने मात्र त्यांच्या ऐवजी भूपेश बघेल यांची निवड केली. सिंहदेव सध्या छत्तीसगड सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत.

कधी सुरु झाला आहे वाद ? 

शनिवारी म्हणजेच २४ जुलै रोजी संध्याकाळी आमदार बृहस्पति सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या हल्ल्यामागे त्यांनी टीएस सिंहदेव हे असल्याचे आरोप केले. एका कार्यक्रमासाठी अंबिकापूरला जात असताना टीएस सिंहदेव यांच्या नातेवाईकाने त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि बृहस्पति यांच्या ड्रायव्हरकडून चावी काढून घेतली. बृहस्पती सिंह सांगतात कि,

“कारची तोडफोड करण्यात आली. हल्ला करणारा माझ्या शोधात होता परंतु मी आधीच निघून गेलो होतो. ”

बृहस्पति सिंह यांनी असा दावा केला की टीएस सिंहदेव यांच्याकडून त्यांच्या जीवाला धोका आहे.

ते असेही म्हणतात कि,

“आदिवासी आमदारावर हल्ला करुन कोणी मुख्यमंत्री बनू शकेल का? ४-५ आमदारांना मारून आपण मुख्यमंत्री होऊ असा जर त्यांचा विचार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा. मला शंका आहे की माझ्यावर  हल्ला करून मला मारून टाकायचा च त्यांचा विचार असेल त्यामुळे मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना विनंती करतो कि त्यांना पक्षातून हकालपट्टी करावी”

यावर बृहस्पति सिंह यांनी शंका व्यक्त केली कि, गेल्या महिन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते कि, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय कोणताही नेता न ठरवता, पार्टी हाय कमांड घेईल… यानंतर बृहस्पति आणि टीएस सिंहदेव यांच्यात वादाची ठिणगी पडली होती.

आता बघेल सरकार या दोन आमदारांचा वाद संपवण्यात यशस्वी ठरतंय का कि याच वादामुळे सरकारचं अडचणीत येईल का हे येत्या काळात कळेलच.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.