नक्षलवादी समजून आपल्याच नागरिकाची हत्या केल्याचे छत्तीसगढ पोलिसांवर आरोप होतायेत

जवळपास दीड ते दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. काश्मीरची. आपल्या जवानांनी नक्षलवादी समजून एका बसवर फायरिंग केली आणि त्यातील सगळे लोक मारले गेले. नंतर उघडकीस आलं की, ते लोक नक्षलवादी नसून आपल्याच देशाचे साधारण नागरिक होते. मग काय वातावरण असं काय पेटलं की  शेवटी अमित शहा यांना माध्यमांसमोर जाहीर माफी मागावी लागली.

मात्र आता परत असाच प्रसंग छत्तीसगढमध्ये झाल्याचं कळतंय. छत्तीसगडमध्ये पोलिसांनी नक्षलवादी समजून आपल्याच जवानाच्या भावाला मारल्याच्या चर्चा आहेत. याने परत एकदा वादाचं वातावरण निर्माण होण्याची चिन्ह दिसतायेत.

हे नेमकं प्रकरण काय आहे?

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात एका नक्षलवाद्याला ठार केल्याचा दावा पोलिसांच्या पथकाने केला आहे. रविवारी रात्रीचे जवळपास दीड वाजले असतील तेव्हा भरंडाच्या बीएसएफ कॅम्पजवळ पोलीस आणि नक्षलवाद्यांत ही चकमक झाल्याचं सांगण्यात आलंय. हा ठार झालेला नक्षलवादी सेक्शन कमांडर दर्जाचा होता, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

अशा प्रकारचा धोका सध्या भरंडाच्या बीएसएफ कॅम्पवर आहे याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. पोलिसांचं म्हणणं आहे की, दोन दिवसांपूर्वी भरंडा क्षेत्रात बॉम्बस्फोट झाले होते. आणि अशा सूचनासुद्धा मिळाल्या होत्या की प्रजासत्ताक दिनाच्या आसपास अजूनही हल्ले होऊ शकतात. म्हणून सर्च ऑपरेशन सुरु होतं. 

याच सर्च ऑपरेशन दरम्यान ही चकमक झाली. नक्षलवादी पहिल्यापासून कॅम्पवर पाळत  ठेवून होते. रात्री उशिरा जेव्हा पोलीस कर्मचारी सर्चिंगवर होते तेव्हा नक्षलवादयांनी त्यांच्यावर पुढून हल्ला केला. पोलिसांनीही या हल्ल्याला प्रतिउत्तर दिलं. पोलीस जेव्हा आपल्यावर भारी पडत आहेत, असं नक्षलवाद्यांना जाणवलं तेव्हा ते पळून गेले आणि अशाप्रकारे पोलीस लढाई जिंकले. 

चकमकीनंतर पोलिसांनी त्याठिकाणाची सर्चिंग केली. ज्यात त्यांनी एका नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. शिवाय बंदुकीसोबतच कुकर बॉम्ब आणि इतर स्फोटकेही सापडली. 

नंतर ठार झालेल्या मृतक व्यक्तीची ओळख पटली. ठार झालेल्या व्यक्तीचं नाव मनुराम नुरेटी असं असून त्याचं वय २६ वर्ष होतं. मात्र मनुराम यांच्या घरच्यांच्या आरोप आहे की, पोलीस, डीआरजी आणि बीएसएफनं बनावट चकमक केली आहे. त्यांचं म्हणणं खोटं आहे. मनुराम हा नक्षलवादी नव्हता, शिवाय त्याचा दूरदूरपर्यंत नक्षलवाद्यांशीही संबंध नव्हता.

आता मनुराम यांच्या घरच्यांच्या आरोपाने घटनेला नवीन वळण लागलं आहे. आणि खुपसारे प्रश्न उभे राहत आहेत. 

मनुराम  विवाहित असून त्यांच्या पत्नीने दावा केलाय की, मनुराम  त्यादिवशी पक्ष्यांची शिकार करायला म्हणून रात्री  १० च्या आसपास घरातून निघाले होते. मात्र पोलिसांकडून चूक झाली आणि त्यांनी नक्षलवादी समजून आपल्या पतीची हत्या केलीये. तर मनुराम यांचा मोठा भाऊ स्वतः डीआरजी युनिटचे जवान असून आपला भाऊ नक्षलवादी नसल्याचं ते म्हणताय. 

उलट मनुराम यांना नक्षलवाद्यांच्या विरोधात लढाई करायची होती. त्यांना नक्षलवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या ‘बस्तर फाइटर बटालियन’ मध्ये जवान  म्हणून सामील व्हायचं होतं. त्यासाठी मनुराम तयारी देखील करत होते.

आता मनुराम यांच्या घरच्यांनी पोलिसांवर आरोप केल्यावर पोलिसांनीही प्रतिउत्तर दिलं आहे. जे या घटनेकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन तयार करतंय.

पोलिसांनी हे मान्य केलं आहे की, मृतक व्यक्ती हा डीआरजी जवानाचा भाऊ आहे. पण त्यात त्यांनी खुलासा केला आहे की, हा डीआरजी जवान स्वतः आधी नक्षलवादी संघटनांमध्ये कार्यरत होता आणि नंतर जो जवान म्हणून भरती झाला. कदाचित मनुराम नक्षली संघटनांमध्ये कार्यरत असून त्याने ही गोष्ट घरच्यांपासून आणि डीआरजी जवान भावापासून लपवली असेल, असं त्यांचं म्हणणं आहे. 

आतापर्यंत या घटनाक्रमात जे झालं ते समोर आहे. पण याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. छत्तीसगढ आधीच नक्षलवादी हालचालींसाठी ओळखल्या जातं. याठिकाणी आदिवासी मोठ्या प्रमाणात असल्याने नक्षलवाद्यांचा प्रभाव जास्त असल्याचं सांगितलं जातं. पण अनेकदा सामान्य व्यक्ती यामध्ये भरडल्या जातात. फक्त संशयित म्हणून हल्ले होतात आणि मारल्या गेल्यावर ओळख पटल्यावर सामान्य व्यक्ती असेल तर एक तर बातमी दाबल्या जाते, नाहीतर माफी मागितली जाते, असं अनेक घटनांतून समोर आलंय.

आता ही घटना मीडियामध्ये उचलून धरल्या जातेय, असं दिसतंय. काही माध्यमातील पत्रकारांनी ट्विटरवर डॉक्युमेंट्स सादर केले आहेत. ज्यामध्ये मनुराम सामान्य कुटुंबाचा असल्याचा आणि त्याचा नक्षलवाद्यांशी दूर दूर संबंध नसल्याचं दाखवलं जातंय. त्यामुळे आता छत्तीसगढ पोलिसांवर परत प्रश्न उपस्थित होत असून पुढे या घटनेत काय होतंय, याकडे लक्ष लागलं आहे.

हे ही  वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.