शिक्षकांची तक्रार आली अन् मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेसहित सगळं बाजूला ठेवून शाळेला भेट दिली
भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष आता चांगलाच पेटलाय. शिक्षकांनी प्रशांत बंब यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. उद्या हा मोर्चा काढला जाणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शक्षकांबाबत वाद निर्माण झाला होता तेंव्हा थेट तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुरक्षा, प्रोटोकॉल सगळं बाजूला ठेवून, स्वतः गाडी चालवत शाळेत भेट दिली होती.
दिवंगत नामदार विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी ५ सप्टेंबरच्या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात जाहीरपणे सांगितलेला एक अनुभव……
एका जिल्ह्यातल्या जि.प. शाळांबद्दल बर्याच तक्रारी आल्या होत्या. शिक्षणमंत्र्यांना दोन-तीनदा लक्ष घालायला सांगूनही फारसा फरक पडलेला नव्हता. मुख्यमंत्री त्या जिल्ह्याच्या दौर्यावर गेलेले असताना त्यांना एक पालक भेटले. ते विलासरावांचे जुने मित्रच होते. त्यांनी जि.प.शाळांच्या गैरव्यवस्थेबद्दल विलासरावांना ऐकवलं.
विलासरावांनी नियोजित कार्यक्रमांत थोडा बदल करून एक तास आरक्षित ठेवला.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक या सर्वांना त्यांनी आपण एका खाजगी भेटीवर जात असल्याचं सांगितलं. कोणीही सोबत येऊ नका असंही बजावलं. आणि विशेष मोठी गोष्ट म्हणजे सुरक्षा यंत्रणेलाही एक तासासाठी सुट्टी दिली….फक्त एकच बॉडीगार्ड आणि जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा दोघांनाच सोबत घेऊन ते निघाले. खाजगी इनोव्हा घेऊन ते स्वत: गाडी चालवत निघाले होते. गाडीचा लाल दिवा काढून ठेवलेला होता….
शहराबाहेर पडल्यावर मगच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपण शाळा भेटीवर जात असल्याचं सांगितलं. त्यांनी लगेचच सर्व अधिकार्यांना मेसेज टाकला…रस्त्याने त्यांना पांढर्या कपड्यातले तीन लोक पायी चाललेले दिसले. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली. आणि त्या मंडळींची विचारपूस केली. “काय मंडळी, दुपारच्या इतक्या उन्हात कुठं निघालात म्हणायचं?”
त्यांनी सांगितलं की ते जि.प.शिक्षक आहेत नी आपापल्या शाळांवर निघालेत. विलासरावांचा अंदाज बरोबर निघाला. ते म्हणाले, “आज काय विशेष काढलं शाळेवर?”
“अहो, कसलं डोंबलाचं विशेष आलंया! आत्ताच शिक्षण अधिकार्यांचे मोबाईल आलेयत. सीएम जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. ते शाळा भेटीवर निघालेत. कदाचित आमच्या शाळेवरपण येऊ शकतात. तयार राहा. म्हणूनशान अटेंन्शन! दुसरं काय? आयला त्यान्ला तिकडं कामधंदा नाय, चालले शाळा तपासायला. जो ऊठतो तो प्राथमिक शिक्षकांवर सुटतो.”
विलासराव म्हणाले, “मग बसा गाडीत. आम्ही सोडतो तुम्हाला. आम्ही याच रस्त्यानं पुढच्या गावाला निघालोत”. ते तिघं गाडीत बसले. विलासरावांनी इकडच्या तिकडच्या पिकपाण्याच्या गप्पा सुरू केल्या. त्या तिघांशी चांगली गट्टी जमली.
एकजण म्हणाला,” सर, तुमचा चेहरा अगदी डिट्टो सीएमसाहेबांसारखा दिसतो.” विलासराव हसले. म्हणाले, ” अहो, ते कुठं मी कुठं. सीएम असे स्वत: गाडी चालवतात का कधी? त्यांचा कन्व्हाय, लाल बत्ती, बंदोबस्त, अधिकार्यांचा ताफा घेतल्याशिवाय ते कधीतरी बाहेर पडतात का?”
” हा तेबी बरोबर हाय म्हणा.” तिघंही एकदम उद्गारले. विलासरावांनी हळूच विचारलं, “मग पोर्शन कुठवर आलाय?” पहिला म्हणाला, “कसला पोर्शन घेऊन बसलात. आपण जि.प. अध्यक्षाच्या घरी पी.ए. म्हणून काम करतो. शाळेत जायचं कामच नाय.”
दुसरा म्हणाला, “मला स्थानिक आमदार **यांनी त्यांच्या शेतावर मुकादमाचं काम दिलेलं आहे. शाळेचा पगार घरपोच येतो. शाळेत जायचं कश्याला?”
तिसरा म्हणाला, “शिक्षण सभापती आपले पाव्हणे आहेत. मी त्यांना भाषणं लिहून देतो. त्यांच्या हॉटेलमध्ये गल्ल्यावर बसतो. म्हशीचं, दुधाचं बघतो. अधिकारीच घरी येऊन पगार देतात मला. शाळेचं तोंड काळं का गोरं तेच माहित नाय बघा.”
” मग तुम्हाला आम्ही सोडायचं कुठं आता ?” “तोच तर प्राॅब्लेम हाये नव्हं का? शाळाच सापडून नाय राह्यल्या बघा आमच्यावाल्या.” जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) म्हणाले, “साहेब जिल्ह्यातले ५८ शिक्षक पगार तर घेताहेत पण शाळेवर जातच नाहीत. सगळे पदाधिकार्यांचे लोक आहेत. काय करायचं ते तुम्हीच सांगा?” यानंतर योग्य ते तपासण्या झाल्या आणि कारवाई झाल्याचं देखील सांगितलं जातं पण त्याचे काही तपशील आम्हाला मिळाले नाहीत.
संदर्भ -प्रा.हरी नरके
हे हि वाच भिडू :
- स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुख आभार मानण्यासाठी मातोश्रीवर आले.
- कार्यकर्त्यानं साधं पोस्टकार्ड धाडलं आणि मुख्यमंत्री विलासरावांनी सूत्रं हलवली…
- विलासराव देशमुख म्हणाले, मी काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचा नाही…