कॉफीचे मळे शोधत केरळला जायची गरज नाही. आपल्या विदर्भात आहे खास डेस्टीनेशन!
भिडूनो आता थंडी सुरु झाली आहे. लग्नाचा पण सिझन सुरु झालाय. दर रविवारी एखाद लग्न असतंच. आता लग्न म्हटल की हनिमून सुद्धा आलं. हनिमून म्हटल की, सगळ्यांचा कल एक तर गोवा नाही तर हिल स्टेशनला जाण्याकडे असतो.
मग आपल्याला टाईम काढता येईल आणि खिशाला परवडेल असं डेस्टीनेशन शोधून काढल जात. किंवा केसरी वीणावाले ते तुमच्या गळ्यात मारतात. लईच कमी वेळ असणारे गल्लीत असणाऱ्या लोणावळा खंडाळा महाबळेश्वरला जातात. लईच बक बलन्स वाले युरोप ला नाही तर बँकॉक-पट्टायाला जातात.
काही जण काश्मीर कुलू मनाली करतात तर निम्मा महाराष्ट्र खाली केरळ, कुर्ग, उटी, कोडाईकॅनालला जातात.
हनिमूनला काय कोण फिरायला, इतिहास बघायला जात नाही. गेले तरी माहिती मिळवण्यापेक्षा फोटो काढण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. उटी,कुर्ग, दार्जिलिंग, केरळला जाणाऱ्याचा हनिमूनचा एक फोटो फेमस असतो,
“चहाच्या नाही तर कॉफीच्या मळ्यात तसले ट्रॅडीशनल कपडे घालून खास फोटो”
अहो प्रीवेडिंग पोस्ट वेडिंग काय काय फड निघालय आज काल. तेवढ्यासाठी उटीला, केरळला जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. तर मायमराठीचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्यानो फक्त एवढ्यासाठी इतक्या दूर गैर मुलखात जाऊ नका. जे जे तुम्हाला उटी दार्जिलिंगमध्ये मिळणार आहे ते इथे महाराष्ट्रात एक ठिकाणी अव्हेलेबल आहे.
चिखलदरा.
चिखलदरा हे समुद्रसपाटीपासून ३५६४ फुट उंचीवर सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आहे. त्यामुळे इथली हवा कायम थंड असते. चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन, विदर्भाचे काश्मीर म्हणूनही संबोधतात. म्हणजे काय तुम्ही आपल्या जोडीदाराला तुला काश्मीरला नेऊन आणलो म्हणून पण इम्प्रेस करू शकता.
इथल्या दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलात लपलेल्या हनिमून रिसोर्टमध्ये राहायला जाऊ शकता. रात्री बाहेर वाघाच्या डरकाळ्या तुम्हाला सहज ऐकू येऊ शकतात. मग आपल्या बायकोला मिठी मारायचं खास कारण मिळेल हा एक्स्ट्रा फायदा. कधी कधी वाघ तुमच्या खिडकीत येऊन ऑल इज वेल आहे का बघून जाऊ शकतो. म्हणजे काय वन्य जीवाचा सहवास घ्यायला आफ्रिकेच्या सफारीला जायला पाहिजे अस नाही.
मग हनिमून मधलं मुख्य काम उरल. म्हणजे दुसर मुख्य काम “फोटो काढणे”
त्यासाठी इथ लई पॉइंट्स आहेत. पंचबोल, देवी, प्रोस्पेट, बेलाव्हिस्टा, बेलेंटाईन, भीमकुंड, मंकी, लॉग, लेन, वैराट, हरिकेन. हे काय सगळ्या टिपिकल हिलस्टेशन प्रमाणे आहे. पण एक गोष्ट आहे जी अख्ख्या महाराष्ट्रात मिळत नाही ती म्हणजे कॉफीचे मळे!!
कॉफी हे इथले मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते. संपूर्ण महराष्ट्रात कॉफीचे उत्पादन फक्त चिखलदऱ्यात होते. कॉफीची शेती बघायला आपल्याकडील लोक केरळ मधील वायनाड, मुन्नर, उटी अशा ठिकाणी जातात.
मग काय आता असले फोटो काढायला महाराष्ट्र सोडून जायची गरज नाही.
पंचबोल पॉइंटला जायचं , एकीकडे कॉफीचे मळे तर दुसरीकडे पाच पहाड अशा विलोभनीय दृश्यावरून टायटॅनिक पोज द्यायची. फेसबुकचा भारी फोटो मिळेल याची ग्यारंटी भिडू घेतोय. शिवाय या पॉइंटवर उभे राहून ओरडल्यास आपला आवाज पाच वेळा दरीतून घुमतो. म्हणजे तिथ बायकोला आयलव्ह यु म्हणून रोमांटिकपणा करू शकता.
याशिवाय बायकोला इम्प्रेस करायचं असेल तर थोड जनरल नॉलेज पण देतो. उगीच फिरताना तुम्ही चिखलदऱ्याचा इतिहास सुद्धा बायकोला सांगू शकता. इथला इतिहास थेट महाभारताच्या काळापर्यंतचा आहे.
इथच पांडव वनवासातील काही दिवस होते. विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला ते ठिकाण हेच. भीमाने कीचकाचे दोन तुकडे केले आणि दरीत फेकून दिले ती कीचक दरी इथेच आहे. हा सगळा कारभार केल्यावर भीम जिथ जाऊन रक्ताचा हात धुतला ते भीमकुंड देखील आजही इथल्या लोकांनी जपून ठेवले आहे. (इथे सुद्धा फोटो भारी येतात.)
याच कीचकदरीच अपभ्रंश होऊन चिखल दरा हे नाव पडले.
आता एवढी माहिती सांगितली तर तुमची बायको तुम्हाला कौन बनेगा करोडपती खेळायला नाही का पाठवणार? असो.बघा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असते. बायकोवर भाव टाकायचं असेल तर एकदम ऑफबीट डेस्टीनेशनला नेतो म्हणून सांगून गोडगुलाबी थंडी असणाऱ्या चिखलदराला न्या. खिशाला पण एकदम परवडणार, वेळेची बचत करणार आणि केरळ-स्विझर्लंडचा आनंद पण देणार !!
हे ही वाच भिडू.
- पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरी पिकते याच श्रेय इंग्रजांना नाही तर जमशेदजी टाटांना जातं.
- भारत वर्ल्ड कप जिंकला आणि श्रीकांतचा हनिमून कॅन्सल झाला.
- एकूणच प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.