प्रिन्स ४८ तासात, शिवम ४० मिनिटात; बोअरवेलमधून पोरं बाहेर काढण्याचा फक्त वेळच बदललाय
२१ जुलै २००६. ही तारीख आठवते? आपण भारतीय लोकं त्यादिवशी हातातली कामं सोडून टीव्हीसमोर बसलो होतो. तर काही तासांनी बातम्यांची चॅनेल्स लागत होती. तो अशा दुर्मिळ दिवसांपैकी एक दिवस होता, जेव्हा टीव्हीसमोर बसण्याचं कारण ना क्रिकेटची मॅच होतं आणि ना कुठला पिक्चर.
हे कारण होतं प्रिन्स.
हरयाणातल्या कुरुक्षेत्रमध्ये ५ वर्षांचा प्रिन्स नावाचा मुलगा ६० फूट बोअरवेलमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं तात्काळ हालचाल केली. पण सगळी सूत्र हातात घेतली ती भारतीय सैन्यानं.
सगळ्या माध्यमांनी प्रिन्सचं हे रेस्क्यू ऑपरेशन लाईव्ह दाखवलं आणि प्रिन्सचं नाव घरोघरी पोहचलं. कित्येकांनी त्याला शिक्षणाचा खर्च देऊ वैगेरे बरीच आश्वासनं दिली. त्याच्या सुटकेसाठी सामान्य नागरिकांपासून देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांनी प्रार्थना केली. अखेर अथक प्रयत्नांनंतर भारतीय सैन्यानं तब्बल ४८ तास काम करत, प्रिन्सची सुखरूप सुटका केली.
आज १५ वर्षांनी प्रिन्सची आठवण येण्याचं कारण म्हणजे, गुजरातमध्ये नुकतीच घडलेली एक घटना.
सुरेंद्रनगर जिल्ह्यात शिवम नावाचा एक १८ महिन्यांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. ही बोअर पाणी असलेली होती आणि त्यात ३०० फूट खोल. पण सुदैवानं शिवम २५ ते ३० फुटावरच अडकला. हि घटना घडल्यानंतर स्थानिक पोलिसांनी एनडीआरएफ आणि सैन्याला पाचारण केलं.
साधनसामुग्री आणि वैद्यकीय पथकाला घेऊन घटनास्थळी पोहोचल्यानंतर शिवमला बाहेर काढण्याच्या ऑपरेशनला सुरुवात झाली, जे फक्त ४० मिनिटांत पार पडलं. शिवम सुखरुप बाहेर आला. त्याला लगेचच जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथं त्याची तब्येत ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
गेल्या १५ वर्षांत अनेक लहान मुलं बोअरवेलमध्ये पडली. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्नही झाले, पण सगळीच ऑपरेशन्स यशस्वी झाली नाहीत. कित्येक कोवळे जीव या बोअरवेल्समध्ये गुदमरुन गेले.
प्रिन्स ते शिवम या १५ वर्षांच्या अंतरात एक गोष्ट बदलली, ती म्हणजे ऑपरेशनला लागलेला वेळ.
जेव्हा प्रिन्स अडकला होता, तेव्हा भारतीय सैन्यानं त्याला बाहेर काढण्यासाठी, बाजूची एक कोरडी विहीर खोदली. त्यानंतर रस्ता खोदत प्रिन्स अडकलेला त्या बोअरवेलपर्यंत पोहोचले आणि मग प्रिन्सला बाहेर काढलं.
शिवमला बाहेर काढताना मात्र अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची मदत घेण्यात आली. भारतीय सैन्यानं एक धातूचं हुक तयार केलं. त्यानंतर ते हुक ‘मनिला रोप’ला बांधलं आणि हा रोप बोअरवेलमध्ये सोडण्यात आला. शिवमच्या शर्टाला त्या हुकचं टोक अडकलं आणि त्याला झटकन बाहेर काढण्यात यश मिळालं.
अर्थात हे सगळं करण्यासाठी बोअरवेलचा व्यासही मोठा होता.
या अशा प्रकारच्या ऑपरेशन्समध्ये घटना जिथं घडलीये तिथली भौगोलिक परिस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. बोअरवेलचा व्यास, आजूबाजूची माती, बोअरवेलची खोली यावर ऑपरेशन कसं राबवायचं हे अवलंबून असतं. जर आजूबाजूला खडकाळ दगड असतील, तर साहजिकच बचाव कार्यातले अडथळे आणखीन वाढतात.
इतक्या वर्षांत कुठलीही ठोस आणि खात्रीशीर पद्धत तयार झाली नसल्यानं, हे बचावकार्य बऱ्याचदा जुन्याच पद्धतींना अनुसरुन केलं जातं. बोअरवेला समांतर आणखी एक भोक खोदतात, मग त्याला मधून खोदत बोअरवेल आणि हे नवं भोक जोडून अडकलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.
या सगळ्याला किती वेळ लागेल, हे यशस्वी होईल का याचा अंदाज लावता येत नाही. बोअरवेलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असतो, त्यामुळं लहानग्या जीवांना तग धरता येत नाही आणि त्यांचा अंत दुर्दैवी होतो. जगभर गाजलेल्या प्रिन्सच्या अपघाताला पंधरा वर्ष उलटून गेली, तरी अजूनही भारताकडे पुरेशी साधनसामुग्री नाही, हेही दुर्दैव आहेच.
२०१० मध्ये सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारांना एक आदेश दिला होता, ज्यात सांगण्यात आलेलं,
‘कोरड्या पडलेल्या, सोडून दिलेल्या, नवीन बांधलेल्या, दुरुस्ती सुरू असलेल्या बोअरवेल किंवा ट्यूबवेलबाबत मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं गरजेचं आहे. जर बोअरवेल सोडून दिली, तर संबंधित सरकारी विभागाकडून प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे.
खोदलेल्या किंवा दुरुस्तीचं काम सुरू असलेल्या बोअरवेला कुंपण किंवा झाकण असणं बंधनकारक आहे.’
२०१९ मध्ये एनडीआरएफनं जाहीर केलेल्या माहितीनुसार २००९ ते २०१९ या दहा वर्षांच्या काळात ४० पेक्षा जास्त लहान मुलं बोअरवेलमध्ये पडली. त्यांना बाहेर काढण्याच्या ऑपरेशन्स पैकी फक्त ३० टक्के ऑपरेशन्सच यशस्वी ठरली. यात ९२ टक्के मुलांचं वय १० वर्षांपेक्षा कमी होतं.
भारत हा सर्वात जास्त जमिनीतलं पाणी वापरणारा देश आहे. जवळपास ३० मिलियन बोअरवेल भारतात खणण्यात आल्यात. त्यातनं पाणी उपसलं जातं, वापरलं जातं, एकदा पाणी थांबलं की पुन्हा त्या बोअरकडे ढुंकूनही पाहिलं जात नाही. त्यात त्यांना झाकण किंवा कुंपणही नसतं आणि नकळत अपघात घडतो.
मध्यंतरी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत प्रिन्स म्हणला होता, “माझ्या कानावर अध्येमध्ये मुलं बोअरवेलमध्ये पडल्याच्या बातम्या येतात मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष करतो. सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनही बोअरवेल झाकल्या जात नाहीत, याची भीती वाटते.”
थोडक्यात १५ वर्षांत अडकलेल्या मुलाला काढायचा वेळ तेवढा कमी झालाय, बाकी समस्या मात्र तशीच आहे, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
हे ही वाच भिडू:
- हर्षवर्धन आणि सुशीलकुमार ! पहिल्या दोन करोडपतींचं काय झालं..?
- ती सध्या काय करते..?
- ४५ वर्षात पुण्याच्या J.M. रोडवर एकही खड्डा पडला नाही. हा चमत्कार असा घडला