यामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान मुलं मैदानात येतात..

सध्या फिफा वर्ल्ड कप सुरू आहे.  यंदाच्या वर्ल्ड कप संदर्भात फॉटबॉल चाहत्यांमध्ये अधिक क्रेझ असण्याचं कारण म्हणजे मेस्सी, रोनाल्डो या दिग्गज फूटबॉलपटूंसह इतरही अनेक फूटबॉलपटूंचा हा शेवटचा वर्ल्डकप असेल असं म्हटलं जातंय.

फूटबॉल मॅचची सुरूवात होण्याआधी संघांतील खेळाडू मैदानावर येतात तेव्हा त्या खेळाडूंसोबत स्टाईलमध्ये, चेहऱ्यावर निखळ आनंद घेऊन येणारी काही शालेय वयातील मुलं तुम्ही पाहिली असतीलच. 

सामना सुरू असताना किंवा सामना संपल्यावर ही मुलं कुठंच दिसत नाहीत.

मग, अश्यावेळी ही मुलं नेमकी कोण असतात? ती मुलं ग्राऊंडवर का येतात? आणि फूटबॉलपटूंसोबत ग्राऊंडवर येण्याची इच्छा असलेल्या लाखो मुलांपैकी याच मुलांची निवड का केली जाते? आणि ही निवड नेमकं कोण करतं? निवड करण्यामागचा क्रायटेरिया नेमका काय असतो? हे प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच.

या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी १९९६ च्या Liverpool Echo या वृत्तपत्राकडे पाहावं लागेल. 1996 मध्ये सर्वात आधी फूटबॉल ग्राऊंडवर खेळाडूंसोबत लहान मुलगा पाहायला मिळाला होता. Liverpool Echo नावाच्या वृत्तपत्राने लिव्हरपूल विरूद्ध एव्हर्टन या सामन्यानंतर एक प्रसिद्ध फोटो प्रसिद्ध केला होता.त्या फोटोमध्ये पहिल्यांदा खेळाडूंसह लहान मुलं दिसली होती.

खेळाडूंसोबत मैदानावर येणाऱ्या या मुलांना ‘प्लेयर एस्कॉर्ट्स (Player Escorts)’ किंवा ‘मॅस्कॉट चिल्ड्रन (Mascot Children)’ असं म्हणतात. खेळाडूंसोबत लहान मुलांनी मैदानात येण्याची ही परंपरा जवळ-पास 20 वर्षांपासून सुरू आहे. त्यानंतर साधारण 2000 साली या पद्धतीत बदल करण्यात आला.

आधी संपूर्ण संघासह एक किंवा दोन प्लेयर एस्कॉर्ट्स असायचे. 2000 सालापासून प्रत्येक खेळाडूसाठी एक एस्कॉर्ट देण्याची नवी पद्धत सुरू करण्यात आली. आणि मग ही पद्धत आजतागायत तशीच आहे.

सुरूवातीच्या काळात सेवाभावी संस्थांसाठी समाजात काही विशिष्ट विषयावर जागरुकता निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवून ही पद्धत सुरू झाली. मात्र, 2002 च्या वर्ल्ड कप पुर्वी UNICEF या संस्थेने व Fifa ने ‘Say Yes For Children’ या हेतूने करार केला.

‘निरोगी आयुष्य आणि दर्जेदार प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. त्याच्या प्रचारा आणि प्रसारासाठी’ हा करार असल्याचं त्यावेळी UNICEF ने म्हटलं होतं.

‘मुलांना प्रत्येक सामन्यात महत्त्वाची भूमिका दिली जाते, प्रत्येक खेळाडूला मैदानावर सोबत घेऊन जात प्रतिकात्मक कृतीतून फुटबॉल प्रेमींना आठवण करून दिली जाते की, ‘मुलांसाठी योग्य जग तयार करण्यात त्यांची प्रमुख भूमिका आहे’,” असं त्यावेळच्या UNICEF च्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं होतं.

2002 सालच्या प्रत्येक सामन्यापुर्वी ‘FIFA/UNICEF’ आणि ‘Say Yes’ असं लिहीलेले टी-शर्ट्स घालून सामन्यापुर्वी खेळाडूंना एस्कॉर्ट करण्यासाठी मुलं ऐटीत मैदानावर येत होती.

या मुलांची निवड कशी केली जाते?

या मुलांची निवड करण्यासाठी संघाकडून स्थानिक शाळा किंवा ज्युनियर संघाकडे जबाबदारी सोपवली जाते. ही जबाबदारी शाळेकडे असल्यास शाळेतील कोणत्या विद्यार्थ्यांना प्लेयर एस्कॉर्ट्स म्हणून पाठवायचं हे ठरवण्याचे संपुर्ण अधिकार शाळेकडे असतात.

बऱ्याचदा, जी मुलं खेळांमध्ये उत्तम कामगिरी करत असतात त्या विद्यार्थ्यांना फूटबॉलपटूंसोबत मैदानावर जाऊन त्यांना एस्कॉर्ट करण्याची संधी दिली जाते.

जागतिक पातळीचा विचार करता, आता प्लेयर एस्कॉर्ट्स म्हणून मुलांना पाठवण्याकरता मोठमोठे ब्रँड्स स्पॉन्सरशीप द्यायला तयार असतात. मॅकडोनल्ड्स सारखी बडी कंपनी फिफाच्या विविध स्पर्धांमध्ये प्लेयर एस्कॉर्ट्स म्हणून मुलांना पाठवण्यासाठी स्पॉन्सरशिप देते. अश्यावेळी कोणत्या मुलांना प्लेयर एस्कॉर्ट्स म्हणून पाठवायचं हे स्पॉन्सर म्हणून पैसे मोजणारी ती कंपनी ठरवते.

प्लेयर एस्कॉर्ट ही पद्धत सुरूवातीला जरी काहीतरी सामाजिक संदेश देण्याच्या उद्दिष्ट्याने किंवा एखाद्या संस्थेच्या मोहिमेकरता सुरू झाली असली तरी, आता 20 वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे.

प्लेयर एस्कॉर्ट्स मागचा इतिहास जरी हा असला तरी, ‘खेळामध्ये निरागसतेचा घटक आणणं, मुलांची स्वप्ने पूर्ण करणं किंवा मुलं त्यांचा आदर्श घेत आहेत याची खेळाडूंना आठवण करून देणं’ ही कारणंही असल्याचं म्हटलं जातं.

काही वेळा विशेष एस्कॉर्ट्स असतात

प्लेयर एस्कॉर्ट्स म्हणून बऱ्याचदा लहान/शालेय मुलं असतात. मात्र, काही वेळेस प्लेयर एस्कॉर्ट्स म्हणून विशेष व्यक्तींना समोर आणलं जातं. याचं सर्वात भारी उदाहरण द्यायचं म्हणजे, अजाक्स ॲमस्टरडॅम या फूटबॉल क्लबचे खेळाडू 2015 मध्ये ‘मदर्स डे’च्या दिवशी आईवर असलेलं प्रेम, आईविषयीची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आपापल्या आईसोबत ग्राऊंडवर आले.

त्यावेळी त्या त्या खेळाडूची आई त्यांच्यासाठी प्लेयर एस्कॉर्ट होती. तर, São Paulo FC या संघाचे खेळाडू एकदा चक्क कुत्र्यांना प्लेयर एस्कॉर्ट म्हणून सोबत घेऊन मैदानावर आले होते. ‘भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातील समस्येबाबत जागरूकता निर्माण करणं’ हा त्यामागचा हेतू होता.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.