रडारडीचा विषय निघाला की आज पण “चिमणी पाखरं” आठवतो

आपल्या लहानपणी मराठीत फक्त दोन टाईपचे पिक्चर असायचे. लक्ष्या-अशोक सराफचे दे दणादण हसवणारे आणि त्याला फाईट द्यायला अलका कुबलचे आया बहिणींना धाय मोकलून रडवणारे. दर रविवारी ४ वाजता सह्याद्री वाहिनीवर आपण या पिक्चरची वाट बघायचो.

लक्ष्या अशोक सराफ या सिनेमांना सचिन आणि महेश कोठारे या दिग्दर्शकांनी मोठं केलं. तुफान कॉमेडी टायमिंग पकडणं फक्त या दोघांनाच जमलं होतं. महेश कोठारेचे पंचाक्षरी सिनेमे तर याचा बाप समजले जायचे.

अलका कुबल टाईप पिक्चर हा तर मराठी सिनेमाचा एक खास जॉनर.

माहेरची साडी या सिनेमातून तो गाजू लागला. लोकांना रडवणं ही देखील एक कला आहे. आस म्हणतात की अलका ताई पडद्यावर दिसली तरी महाराष्ट्राच्या मातांच्या डोळ्यातून पाणी फुटायला सुरवात व्हायची. मराठी निर्मात्या दिग्दर्शकांनी या टाईपचा सिनेमा चांगलाच पिळून काढला. जखमी कुंकू,दुर्गा आली घरा, माया ममता, माहेरचा आहेर, हळदी कुंकू, हळद रुसली कुंकू हसलं टाईप सिनेमे आले. हळूहळू आयामाया देखील या सिनेमानां बघून रडायच्या कमी झाल्या. 

मनमोहन सिंग यांच्या जागतिकीकरणाची फळं आता घराघरात पोहचली होती. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही रंगीत झाले. त्यावर केबल आलं. हळूहळू मोजक्या घरात कॉम्प्युटर देखील डोकावू लागला.

नव्वदच दशकच्या शेवटी शेवटी तर मराठी सिनेमा देखील लक्ष्या अशोक सराफ अलका कुबलच्या सावलीमधून आधुनिक बनू लागला होता. याची झलक बिनधास्त सिनेमाने दाखवून दिली होती. फिमेल ओरिएंटेड सिनेमे येऊ लागले.  त्यात झकपक दिसत होतं. लोक म्हणाले अलका कुबल टाईप सिनेमाचा जमाना संपला.

१ जानेवारी २०००. नवीन मिलेनियमचा पहिला दिवस. सगळं जग नव्या बदलासाठी तयार झालेलं. हिंदी सिनेमात अमीर खान चा मेला, शाहरुखचा फिर भी दिल है हिंदुस्थानी हे मोठी स्टार कास्ट असणारे सिनेमे रिलीज होणार होते. अशातच राकेश रोशनचा मुलगा देखील आपला कहो ना प्यार है नावाचा सिनेमा घेऊन आला होता.

या सगळ्या धांगडधिंग्यात महेश कोठारे साहेबांनी आपला एक सिनेमा न्यू ईयरच्या दिवशीच रिलीज केला. विशेष म्हणजे या सिनेमाचं नाव त्यांच्या स्टाईल प्रमाणे पाच अक्षरी नव्हतं. यात ड्यामिट महेश ज्याधव नव्हता किंवा वेंधळा लक्ष्या हवालदार नव्हता. टकलू हैवान, कुबड्या खविस, गिधाड गॅंग, तात्या विंचू हे व्हिलन देखील यात नव्हते.

तो सिनेमा होता चिमणी पाखरं.

एक विधवा स्त्री पतीच्या पश्चात आपल्या चार चिमण्या पाखरांचा सांभाळ करीत असतानाच तिला कॅन्सर असल्याचं निदान होतं. स्वतःचा मृत्यू समोर दिसत असतानाच ती आपल्या पश्चात आपल्या ‘पिलां’ची सोय लावण्यासाठी जो जीवाचा आटापिटा करते, त्याची ही कथा.

लोकांना आपल्या धांगडधिंग्यातून खळखळून हसवणारे महेश कोठारे पहिल्यांदाच एक शोकांतिका घेऊन आले होते. आकाशढुथु नावाच्या मल्ल्याळम सिनेमाचा हा रिमेक होता. या सिनेमाची निर्मिती केली होती मच्छिन्द्र चाटे यांनी. जगप्रसिद्ध असणाऱ्या चाटे क्लासेसचे ते मालक. मराठी सिनेमाला हायफाय करत बदल घडवला असं म्हणणाऱ्या बिनधास्त या सिनेमाच्या निर्मितीतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत एंट्री केली होती.

पण महेश कोठारे यांच्या प्रमाणे मच्छिन्द्र चाटे यांच्यासाठी देखील चिमणी पाखरं हा मोठा प्रयोग होता.

महेश कोठारेंच्या पिक्चरबद्दल इतर काहीही असो मात्र त्यांचा सिनेमा ग्रँडच असतो हे आजवर मराठी पब्लिकने पाहिलेले होते. ७० एमएम सिनेमा पासून ते डॉल्बी डिजिटल या सगळ्या टेक्नॉलॉजी त्यांनी मराठीत आणल्या याचं श्रेय त्यांनाच जात. असेच काही प्रयोग त्यांनी चिमणी पाखरं साठी करून सिनेमाच जबरदस्त फिनिशिंग केलेलं. त्याच प्रमोशन देखील तुफान करण्यात आलं होत.

याशिवाय या सिनेमाबद्दल उत्सुकता होती ती स्टार कास्ट बद्दल.

हिंदीतल्या सुपरस्टार पद्मिनी कोल्हापुरे या सिनेमातून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवत होत्या.

राज कपूर यांची फाईंड म्हणवल्या जाणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या सत्यम शिवम सुंदरम पासून प्रेमरोगी पर्यंत अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं होतं. मध्यंतरी लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करायचं बंद केलं. पण चिमणी पाखरं साठी त्या आपल्या माय मराठी मध्ये परतत होत्या.

सिनेमाचा हिरो होता सचिन खेडेकर. सोबत विनोदाचा शिडकावा म्हणून लक्ष्या आणि विजय चव्हाण हे महेश कोठारे यांचे हुकमी एक्के होते.

यांच्यासह राजशेखर, बाळ धुरी, अंबर कोठारे, नागेश भोसले, प्रिया बेर्डे, रमेश देव, तुषार दळवी, रेशम टिपणीस या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. भारती चाटे, अविनाश चाटे, मेघना चाटे आणि निहार शेंबेकर हे बालकलाकार देखील होते. खुद्द मच्छिन्द्र चाटे यांची मुलं पिक्चरमध्ये मेन रोल मध्ये होते.

नवीन मिलेनियममध्ये आमीर खान शाहरुख खान यांच्या पिक्चरची वाट पाहणाऱ्या पब्लिकला महेश कोठारे यांच्या या सिनेमाने चांगलाच हादरा दिला. अख्ख थिएटर डोळ्याला रुमाल लावून रडतंय हे चित्र खूप दिवसांनी दिसत होतं. आयामाया सोडा पण बाप्ये लोक सुद्धा मना वळवून वळवून रडत होते.

पिक्चरच्या गाण्यांच्या वेळी तर अश्रूंचा महापूर आला. पिक्चर संपवून बाहेर येणारे लोक डोळे पुसत पुसतच येत होते. 

सगळ्या कलाकारांनी आपापले रोल जबरदस्त निभावून नेले होते. पद्मिनी कोल्हापुरे यांनी तर कमालच केली. अलका कुबल यांच्या सिंहासनाला हादरा देईल असा रोल त्यांनी केला होता. सचिन खेडेकर लक्ष्या वगैरे दिग्गज कलाकारांनी तर आपले रोल चांगले केलेच होते पण चाटेंच्या चिमुरड्या लेकीने देखील पडदा गाजवला. महेश कोठारे देखील एका गाण्यात झलक मारून गेले होते.

चिमणी पाखरं प्रचंड गाजला. मराठीचा त्या वर्षीचा सगळ्यात जास्त बॉक्सऑफिस त्यांनी गोळा केलं. ग्रामीण भागात कराड सारख्या ठिकाणी थिएटरमध्ये गर्दी झाल्यामुळे लोकांनी थिएटरमध्ये गोणपाट अंथरून खाली बसून हा सिनेमा बघितला.

अनेक सेंटर वर तर माहेरची साडीचा देखील रेकॉर्ड मोडला. मुंबईच्या प्लाझा थिएटरमध्ये चिमणी पाखरं तर वर्षभर चालला. कहो ना प्यार है च्या धडाक्यात अमीर खान शाहरुख चे सिनेमे फ्लॉप होत होते, तेव्हा हा मराठी सिनेमा नुसता उभाच राहिला नाही तर त्याने प्रचंड कमाई देखील केली.

चिमणी पाखरं ने कित्येक रेकॉर्ड ब्रेक झाले. म्हाताऱ्या कोताऱ्यांपासून ते कॉलेज गोइंग तरुणाई पर्यंत अखंड पब्लिक एकत्र बसून पिक्चर बघताना रडतंय हे पहिल्यांदाच आणि शेवटचं घडलं. चिमणी पाखरं स्टाइलच्या बांगड्याची संपूर्ण महाराष्ट्रात फॅशन आली होती.

पब्लिक अजूनही इमोशनल आहे हे या सिनेमाने दाखवून दिलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश कोठारे फक्त कॉमेडीचं नाही तर चिमणी पाखरं सारखा हृदयस्पर्शी सिनेमा बनवू शकतो आणि तो सुपरहिट करू शकतो हे त्यांनी प्रूव्ह केलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.