या माणसामुळे “मेड इन चायना” चा ब्रॅण्ड जगभरात धुमाकूळ घालू लागला

ही गोष्ट आहे माओच्या चीनची. साधारण भारत स्वतंत्र झाला याच काळात माओने चीनमध्ये लाल क्रांती करून सत्ता आपल्या हातात आणली. भारताने गांधीजींच्या अहिंसक चळवळीच्या जोरावर स्वातंत्र्य मिळवल होतं तर माओची कम्युनिस्ट क्रांती रक्तरंजित होती.

चंग कै शेक च्या जुलमी राजवटीला प्रत्युत्तर देण्यासाठी जवळपास 1 लाख सहकाऱ्याना घेऊन माओ लॉंग मार्च साठी निघाला. पण 1 वर्षानंतर तो आपल्या नियोजित ठिकाणी पोहचला तेव्हा त्याचे फक्त २० हजार सहकारी जिवंत होते. खाण्यापिण्याची चिंता न करता जमेल त्या शस्त्रानिशी गनिमी काव्याने हे २० हजार लाल सैनिक लढले. त्यांच्याच बळावर माओने चीनमध्ये क्रांती घडवली होती.

याच त्याच्या २० हजार सच्च्या अनुयायांमध्ये एक होता डेंग झ्याव पिंग

माओप्रमाणे डेंग हा काही शेतकऱ्याच्या घरात जन्मला नव्हता. तो चीनच्या एका सुखवस्तू घरात जन्मला. शिकायला फ्रान्सला गेला. तिथेच एका कारखान्यात फिटर म्हणून अप्रेशिप केली. याच परीस मधल्या काळात त्याची ओळख साम्यवादी विचारसरणीशी झाली आणि तो परत चीन ला आला ते थेट कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य बनला. त्याला लाल आर्मीचा पॉलिटिकल कमिशनर बनवण्यात आलं.

सुरवातीपासून तो माओचा खंदा समर्थक म्हणून ओळखला जायचा. त्याच्या नेतृत्व उभारणी मध्ये डेंग सारख्या कार्यकर्त्यांचा नक्की सिंहाचा वाटा होता. माओने चीनला स्वातंत्र्य मिळवून दिल्यावर एकाच पक्षाची हुकुमशाही लागू केली. चीनमध्ये मार्क्सवादी साम्यवाद आणायचं त्याच्या मनात पक्क होतं. त्यादृष्टीने पाउले टाकताना डेंगवरही अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या आल्या.

चीनमध्ये बंदिस्त कम्युनिस्ट अर्थव्यवस्था लागू करण्यात आली होती आणि १९५०च्या दशकात डेंग झ्याव पिंगला चीनचे अर्थमंत्रालय देण्यात आले.

माओ नंतर कोण याच उत्तर अनेकांना डेंगमध्ये दिसत होतं. माओ देखील त्याच्या कडे आपला वारसदारापैकी एक म्हणून पहात असे. त्याला  कम्युनिस्ट पक्षाचा जनरल सेक्रेटरी बनवण्यात आलं होत. माओने सुरु केलेल्या उजव्या विचारसरणीच्या विरोधातल्या मोहिमेचे डेंगने नेतृत्व केले. चीनचा आजवरचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या गेलेल्या ग्रेट फोरवर्ड लीपची जबाबदारी देखील डेंगच्या खांद्यावर होती.

पण हा प्रकल्प म्हणजे माओची सर्वात मोठी चूक ठरली.

लोकांना कम्युनमध्ये पाठवण्यात आले. शेतकऱ्यांची शेती काढून घेऊन त्यांना सार्वजनिक शेतीमध्ये कामास भाग पाडण्यात आले. याचा परिणाम असा झाला की फायद्याचा लोभ न दिसत असल्यामुळे अनेकांनी उत्पादन वाढीसाठी जास्त मेहनत घेतली नाही. माओ पर्यंत खरी परिस्थिती पोहचलीच नाही आणि चीनमध्ये पाऊसपाणी चांगला असूनही मोठा दुष्काळ पडला.

जवळपास २ कोटी लोक चीनमध्ये अन्नावाचून मृत्युमुखी पडले असा अंदाज आहे.  

माओच्या या धोरणावर दबक्या आवाजात टीका होऊ लागली. डेंग तोवर चीनचा उपपंतप्रधान बनला होता. त्याने शिऊ नावाच्या आणखी एका नेत्याच्या मदतीने माओचा दैनंदिन कारभारातील हस्तक्षेप कमी केला. आपली आर्थिक धोरणे पुढे रेटण्यास सुरवात केली. माओचा सार्वजनिक जीवनातील वावर कमी झाला. चीनच्या अर्थव्यवस्थेवरील माओवाद कमी होऊ लागला.

अखेर माओ परत आला. त्याने आपली तब्येत खणखणीत बरी आहे हे दाखवून देण्यासाठी त्याने हजारो लोकांच्या साक्षीने नदीत उडी मारून दाखवली. परत आल्यावर त्याने सांस्कृतिक क्रांती सुरु केली.

भांडवलशाही विचारसरणीचा चीनमधून समूळ नाश करण्याचा हा प्रयत्न होता.

जे कोणी या विचारसरणीची समर्थक आढळतील अशा विचारवंत, शिक्षक, प्रोफेसर, इतिहासकार, डॉक्टर अशा अनेकांची रस्त्यात धिंड काढण्यात आली. प्रचंड मारहाण केली गेली. अनेकांचा यात मृत्यू झाला. अनेकांना शिक्षा म्हणून शहरापासून दूर शेतात कामासाठी पाठवण्यात आले.

 डेंगचा ही या शिक्षेत समावेश होता. एकेकाळी चीनचा उपपंतप्रधान असणारा सर्वशक्तिशाली डेंग झ्याव पेंग एका खेड्यात ट्रक्टरचा रिपेअरिंग करायच्या कामावर नेमला गेला होता.

माओच्या सांस्कृतिक क्रांतीवेळी चीन बाहेरच्या जगापासून प्रचंड अलिप्त झाला होता. कर्मठ कम्युनिस्ट विचारसरणीचा पगडा वाढला होता. विरोधी विचारसरणीचे लाखो लोक मारून टाकण्यात आले होते. माओची चौथी बायको आणि आणखी तीन जण माओच्या नावाखाली उच्छाद मांडत होते. चीनच्या इतिहासात या चौघांना गंग ऑफ फोर म्हणून ओळखल जातं.

माओच्या लक्षात हे येत होतं. त्याने सांस्कृतिक क्रांतीच्या शेवटानंतर डेंगला परत येण्यास हिरवा झेंडा दाखवला. ते वर्ष होते १९७४

त्याची नियुक्ती परत उपपंतप्रधानपदी करण्यात आली. काही दिवसात तो पक्षाच्या उपाध्यक्षपदी देखील नेमला गेला. यावेळी त्याने सावध पवित्रा घेतला होता. माओवादाच्या चौकटीत राहून आर्थिक सुधारणा करण्यास त्याने प्राधान्य दिले. पण तरीही  गँग ऑफ फोर च्या कानभरण्यामुळे माओने डेंग सगळ्या पदावरून हटवले.

पुढच्या दोन वर्षात चीनचे राष्ट्रपिता माओचे निधन झाले. त्याच्या नंतर गँग ऑफ फोरने सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या वर वचक बसवण्यासाठी इतर पक्षाच्या नेत्यांनी डेंगला परत आणले. डेंगने  गँग ऑफ फोरचा बंदोबस्त केला.

हा चीनच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरला.

डेंग झ्याव पिंग याच्या कडे राष्ट्राध्यक्षपद किंवा पक्षाचे चेअरमनपद असे कोणतेही मोठे पद नव्हते. पण तरीही चीनचा सर्वशक्तिमान नेता तोच यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याने चीनच्या बंधिस्त अर्थव्यवस्थेच्या खिडक्या उघडल्या. चीनचा बाजार बाकीच्या देशांसाठी खुला केला. ते वर्ष होते १९७८.

याचाच अर्थ भारताच्या आधी ११ वर्षे कम्युनिस्ट चीनने जागतिकीकरण स्वीकारले. इथूनच चीनच्या वेगवान प्रगतीला सुरवात झाली. चीनने भारताला स्पर्धेतून मागे टाकले.

डेंगने घोषणा केली होती,

“पैसे मिळवणे ही वाईट गोष्ट नाही. दारिद्र्य म्हणजे साम्यवाद नव्हे. श्रीमंत होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.”

सव्वाशे कोटी चीनी जनता झपाटल्याप्रमाणे श्रीमंत होण्याच्या मागे लागली.

औद्योगिकीकरण आले. नवे उद्योग सुरु झाले. चीनच्या वस्तूंना देखील बाहेरच्या देशातील बाजार खुला झाला. याचा अर्थ चीनमधील कम्युनिझम संपला असे नव्हते. तर डेंगने जागतिकीकरण स्वीकारताना कम्युनिस्ट पक्षाची पकड घट्ट केली होती. परदेशी बाजारव्यवस्थेला प्रवेश कुठे असावं कुठे असू नये याची बंधने घातली होती.

१९७८ साली चीनच्या सामान्य व्यक्तीचे दरडोई उत्पन्न जेव्हडे होते त्याच्या शेकडो पट आज आहे. याचे सर्व श्रेय डेंगला जाते. चीनची आजची राजकीय व्यवस्था डेंगने ऐशीच्या दशकात आखून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे चालते.

याचा अर्थ असं नव्हे की डेंग हा आदर्श नेता होता. त्याने देखील अनेक चुका केल्या. चीनमध्ये सरकारविरुद्ध प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रणगाडे घालण्याच काम त्यानेच केलेलं आहे. चीनमधील कडक फमिली प्लनिंगचे धोरण पण त्याचेच.

आजही चीनसाठी माओ लाच सर्वश्रेष्ठ नेता मानल जात. मात्र बाकी काही का असेना चीनला जगाशी जोडण्यासाठी डेंगने केलेलं योगदान तिथली जनता विसरू शकत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.