पुस्तक बदलून इतिहास बदलायची स्कीम चीनने पण आणलीय अन् तावडीत घावलाय हाँगकाँगचा इतिहास

पुस्तकातील सिलॅबस बदलण्याचं प्रकरण आपल्या भारतासाठी काही नवीन नाही. याच पद्धतीने चीनसुद्धा हाँगकाँगच्या पुस्तकातील इतिहासाच्या सिलॅबस मध्ये बदल करतोय. या नवीन इतिहासानुसार एकेकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेला हाँगकाँग, ब्रिटिशांची वसाहत नव्हताच कधी हे शिकवले जाणार आहे. नेमकं काय आहे हे इतिहास बदलण्याचं प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात. 

बरं झालेला मॅटर असा आहे

हाँगकाँग हा चीनचाच भाग आहे. परंतु त्याच्या स्वायत्ततामुळे त्याला चीनच्या नियमांतून सवलत मिळालेली आहे. त्यामुळे बाकी जगाच्या उदार आणि लोकशाही मूल्यांचा प्रभाव असलेला हाँगकाँग ही पूर्वीची ब्रिटिश वसाहत होती. त्यानंतर १९९७ मध्ये पुढील ब्रिटननं हाँगकाँग शहराला चीनच्या स्वाधीन केलं.

हाँगकाँगला चीनच्या स्वाधीन करत असतांना पुढील ५० वर्ष हॉंगकॉंगची व्यवस्था ब्रिटनच्या नियमाने चालेल अशी तरतूद आहे. असा इतिहास शिकवला जातो. परंतु हा जुना इतिहास बदलून चीन पुस्तकात नवीन इतिहास भरू पाहत आहे. यामुळे हे प्रकरण सुरु झालं.

आता चीन कोणता नवा इतिहास सांगतोय

तर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या मतानुसार ऑटोनॉमस असलेलं हाँगकाँग शहर आणि जवळची मकाऊची पोर्तुगीज वसाहत ही केवळ परकीयांनी ताब्यात घेतली होती. यात चीनने या प्रदेशावरील सार्वभौम अधिकार सोडले नव्हते. त्यामुळे हे शहर ब्रिटिशांची वसाहत कधीच नव्हती. यासाठी चीनने शिकवल्या जाणाऱ्या इतिहासात बदल केलाय.

परंतु खरा इतिहास तर असा आहे

पूर्वी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर अफूचा व्यापार व्हायचा. यात मोठे व्यापारी होते इंग्रज. या व्यापारामुळे आणि यातून मिळणाऱ्या नफ्याने इंग्रज चांगलेच गब्बर झाले. यानंतर १८४१ मध्ये झालेल्या पहिल्या अफू युद्धाच्या शेवटी किंग साम्राज्याने हॉंगकॉंग बेट झिनान प्रांतातून सोडून दिला.

यानंतर ब्रिटनने हॉंगकॉंग बेटावर आपली वसाहत स्थापन केली. त्यानंतर १८४२ मध्ये दुसरं अफू युद्ध झालं. त्यामुळे १८६० मध्ये लहान असलेली  कॉलनी बेटावरून आणखी मुख्य भूमीपर्यंत वाढली. सोबतच १८९८ मध्ये ब्रिटिशांनी आणखी प्रदेश लीजवर मिळवला व प्रदेश आणखी वाढवला.

ही लीज ९९ वर्षांची होती. त्यामुळे १९९७ मध्ये ब्रिटनचा हॉंगकॉंगवरील हक्क संपला आणि त्यांनतर हॉंगकॉंगचा ताबा चीनकडे परत करण्यात आला.

हे तर बरोबरच झालं!

मग यात गडबड होण्याचं कारण काय आहे बरं

ब्रिटन जरी वसाहतवादी देश असला तरी ब्रिटनमध्ये लोकशाही, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य अशी आधुनिक मूल्य सुद्धा होती. ती मूल्य हाँगकाँग मध्ये सुद्धा झिरपली. परंतु चीन हा कम्युनिस्ट देश. चीनमध्ये या विचारांचा जराही मागमूस नाही. त्यामुळे हाँगकाँगच्या लोकांनी चीनकडे परत जाण्यास मनाई केली.

परंतु नियम तो नियम असतो. ब्रिटनने हॉंगकॉंग चीनला परत केला. परंतु जाता जाता हाँगकाँग शहराला पुढची ५० वर्षे आपली व्यवस्था चालवण्याची स्वायत्तता असेल असा करार करून गेला.

मग चीनच्या पोटात याचा गोळा का उठला

चीन हा कायम विस्तारवादी धोरण राबवणारा देश राहिला आहे. त्याला शेजारच्या देशांवर कुरघोड्या करण्याची सवय आहे. तो ह्यो न त्यो पुरावा उकरून काढून कायम दुसऱ्याची जमीन लाटण्याची आणि लोकशाही मूल्यांना नाकारायची संधी सोडत नाही. मग आपल्या देशाचा भाग असलेल्या शहरात नांदणारी लोकशाही त्याला बघवेल तर नवल.

त्याने तेथील लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य मोडून काढायची आणि तिथे आपली कम्युनिस्ट प्रणाली लागू करण्याची एकही संधी सोडली नाही. २०१९ मध्ये हॉंगकॉंगच्या नागरिकांनी रस्त्यावर आणि विमानतळावर चीनविरुद्ध विरोध प्रदर्शनं केली. त्याला मोडून काढण्यासाठी चीनने भरपूर ताकद लावली. यातून चीनची अन्यायकारी व्यवथा उघड होते. 

आता चीनने केलेल्या या बदलावर टीकाकार काय म्हणत आहेत

बीजिंगला अभ्यासक्रमात बदल करून विद्यार्थ्यांचं ब्रेन वॉश करायचं आहे. सिलॅबसमधील १२१ पानांवर तब्बल ४०० वेळा नॅशनल सेक्युरिटीचा उल्लेख आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर गंभीर शिकवण देण्याचं प्रयत्न चीन करत आहे. या चुकीच्या इतिहासामुळे शहरातील मुलं आप्लं शहर कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत होती. हेसुद्धा विसरून जातील.

चीनमधील सत्यावर आणि इतिहासावर कम्युनिस्ट पार्टीची मक्तेदारी आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पार्टी आपल्या विचारधारेला लोकांवर बिंबवण्यासाठी पुस्तकांमध्ये वाट्टेल त्या प्रकारची हेरफेर करू शकते. 

तसं चीन नेहमीच वेस्टर्न प्रभावाच्या इतिहासाला नाकारत आलाय

चीनने कायम इतिहासाची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. पश्चिमेच्या साम्राज्यवादी देशांनी मांडलेला इतिहास चीनने अनेकदा अमान्य केलाय. आणि अनेकदा आपल्या परीने इतिहासाची मांडणी केलीय. याची जाणीव आपल्याला इतिहासकार युव्हाल नोवाह हरारी यांच्या होमो डेऊस या पुस्तकात येतेच. त्यामुळे चीनने इतिहासात असं बदल करणं जगासाठी काही नविन किंवा आश्चर्याची गोष्ट नाही.

चीनची इतिहासाची बाजू ही कायम विरुद्ध बाजूला जाणारी राहिली आहे. तसेच चीन प्रत्येक मंचावरून आपल्या बाजूला कायम नेटाने मांडत आला आहे. परंतु नव्याने मांडणी केलेल्या या इतिहासामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीचा इतिहास बिंबवला जाईल. हे नक्की आहे.

 

हे ही वाच भिडू

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.