आपल्या जमिनी झाल्या, डेटा झाला, आता चीन भारतातल्या गाढवांच्या पण मागं लागलंय
तस्करी शब्द वाचला की, एकदम गूढ वाटतं. कारण आपल्या डोक्यात बातम्याच तसल्या येतात. चंदन तस्करी करणाऱ्या गुंडांना अटक. वाळूची तस्करी करणाऱ्या लोकांना धरलं. पोटात सोनं लपवून तस्करी करणारा जेरबंद.
चंदनवाला म्हणजे जंगलातला कार्यकर्ता, याच्याकडे बंदूक असणार याची टोळी असणार. वाळूवाले तस्कर एकदम पॉवरफुल, रग्गड पैसा आणि रग्गड डेयरिंग. सोन्याची तस्करी करणारे म्हणजे सुमडीत कोंबडी. ज्याच्या चेहऱ्यावरुन हा स्मगलर आहे, असा डाऊट येणार नाय, तो सोन्याच्या तस्करीत फॉर्ममध्ये. ही लोकं आपल्या आजुबाजूला असली, तरी आपल्या लक्षात येत नाहीत. त्यामुळंच तस्करी हा शब्द एकदम गूढ वाटतो.
आता हा विषय तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे चीन. गल्लीतली बारकी पोरं कशी कीडे करण्यात पटाईत, तसं आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन. कायतरी काड्या करणार हे फिक्स.
आता गेल्या काही दिवसांपूर्वी एक बातमी आलेली, की चीन पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतुन गाढवं आयात करणार आहे. पाकिस्तानकडे मुबलक प्रमाणात गाढवं असल्यानं, त्यांनी मदत करावी अशी चीनची मागणी होती.
तशी भारतातही गाढवांची संख्या कमी नाही, पण चीनला मदत करायची म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची. भारत मदत करेना, म्हणून चीननं नव्या काड्या केल्यात. आता तो विषय सांगण्याआधी चीनला गाढवं लागतात तरी कशाला हे माहिती करुन घेऊ.
आपल्याकडे कसं आयुर्वेद आहे, तसं चीनमध्येही कायतर खळबळ असते. पण आपलं आयुर्वेद नॅचरल आहे, हिंस्त्र नाही. चीनमध्ये मात्र प्राण्यांच्या रक्ताचा, कातडीचा, हाडांचा वापर औषधं बनवण्यात होतो. गाढवांच्या कातडीचा वापर चक्कर येणं, रक्तस्त्राव, कोरडा खोकला अशा आजारांवरचं औषध तयार करण्यात गेला जातो. चीनमध्ये लय हिट असणारं ‘इजियाओ’ हे पारंपारिक औषधही गाढवाच्या कातडीपासूनच बनवलं जातं. त्यामुळे चीन गाढवं शोधण्यात गुंतलेलं असतं.
आता भारत काय गाढवं देईना, म्हणल्यावर चीन भारतातून गाढवांची तस्करी करतंय. म्हणजे भारतातली गाढवं सूममध्ये चीनमध्ये नेली जातायत, तेही त्यांच्या कातडीसाठी. याधीही चीन वाघांची तस्करी करण्याच्या कुरापती करत होतंच.
आता एक प्रश्न पडतो की, गाढवं गायब होतायत हे कळलं तरी कसं?
ब्रुक इंडिया या कंपनीनं एक सर्वे केला. यात लक्षात आलं की, देशातल्या गाढवांच्या संख्येत ६१.२३ टक्क्यांनी घट झालिये. आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं, तर राज्यातली गाढवंही ३९.६९ टक्क्यांनी कमी झाली आहेत.
जेजुरी कनेक्शन
आपल्याकडे जेजुरीत गाढवांचा बाजार भरतो. तिथल्या यात्रेत मोठ्या संख्येने गाढवं असतात. ब्रुक इंडियाचे शरत वर्मा, जेजुरीला गेले होते. तेव्हा त्यांना गावकऱ्यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांत ही संख्या कमी झाल्याचं सांगितलं. त्यांनी सादर केलेल्या अहवालात, ‘काही वर्षांपूर्वी चीनमधून एका माणसानं २०० गाढवं हवी आहेत सांगत व्यापाऱ्यांशी संपर्क केला होता’ असंही नमूद करण्यात आलं आहे.
फक्त जेजुरीच नाही तर राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये होणाऱ्या गाढवांच्या मेळाव्यातली गाढवांची संख्याही कमी झाली असल्याचं समोर आलं आहे.
पण देशातली गाढवं कमी होण्यामागं फक्त चीन हेच कारण आहे का? तर नाही. आता आधी गाढवं वापरली जायची, ती सामान वाहून नेण्यासाठी, ओझं नेण्यासाठी किंवा गेलाबाजार वाहतुकीसाठी. आता या सगळ्याला पर्याय आलाय, त्यामुळं हौसेनं म्हणा किंवा लई मन लाऊन गाढवं पाळण्याऱ्यांची संख्याही कमी झाली आहे.
साहजिकच पैदास कमी होत असेल, तर संख्या घटणारच की. पण जिवंत गाढवं, त्यांची कातडी आणि मांस चीन चोरुन नेतंय म्हणल्यावर जरा कठीणच केस झालीये. हे वाचून तुम्हाला चिनी लोकांना फिक्स म्हणावं वाटत असणारं, जरा लाजा धरा आणि सुधरा की राव!
हे ही वाच भिडू:
- सनातन्यांनी बंद पाडलेलं गाढवाचं लग्न बाळासाहेबांच्या मदतीने पुन्हा उभं राहिलं
- लोकं गाढविणीचं दुध विकून लखपती व्हायला लागलेत, कसं ते वाचा.
- ट्रम्प तात्यांच्या विरोधी उमेदवाराचं चिन्ह गाढव का यामागे पण एक किस्सा आहे !