चीन म्हणतंय, अरुणाचलमध्ये दौरा करण्याचा भारतीय उपराष्ट्रपतींना कुठलाही अधिकार नाही

संपूर्ण भारतामध्ये आपण कुठेही कधीही फिरू शकतो, वास्तव्यास राहू शकतो. असे अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहेत असे आपण अनेकदा ऐकले असेल किंवा वाचले असेल.आणि ते खरं सुद्धा आहे. संविधान आपल्याला दिलेल्या या अधिकारचा वापर करून प्रत्येक जण भारतात मनमोकळेपणाने  वावरत असतो. आता भारताच्या सीमेच्या आत वावरत असताना जर कोणत्या परकीय देशाने त्यावर आक्षेप घेतला तर तुम्ही त्यावर काय बोलणार.

 तुम्ही बोलणार कि आमचा देश आहे आणि आम्ही कुठेही फिरू… तुम्हाला त्याचाशी काय घेणंदेणं..बरोबर ना !

आता पण एक अशीच एक घटना घडली आहे. झालं असं कि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ९ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान त्यांनी राज्य विधानसभेच्या विशेष सत्रालाही संबोधित केले. विशेष सत्राला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी अरुणाचल प्रदेशचा वारसा सविस्तर मांडला होता. आता अलिकडच्या वर्षांत बदलाच्या दिशेने आणि विकासाची गती वाढवताना नवीन बदल होत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले होते.

आता तुम्ही म्हणाल कि हि तर सामान्य गोष्टी आहे. भारताचे पंतप्रधान,राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,मंत्री, हे देशभर विविध भागात दौरे करीत असतात. यामध्ये नवीन काय ? आणि कोणाला आक्षेप घेण्यासारखं तरी यामध्ये काय आहे. तुम्हाला हे प्रश्न पडणे साहजिकच आहे.

भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. त्यांनी तर सरळ सरळ बोलून टाकलं कि अरुणाचल प्रदेश मध्ये दौरा करण्याचा भारताच्या उपराष्ट्रपतींना कुठलाही अधिकार नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले,

“सीमा मुद्द्यावर चीनची स्थिती सुसंगत आणि स्पष्ट आहे. भारतीय सरकारने स्थापन केलेल्या एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे तथाकथित अरुणाचल प्रदेशला चीन सरकारने कधीही मान्यता दिली नाही. आणि भारतीय नेत्यांच्या संबंधित प्रदेशातील भेटींना तीव्र विरोध आहे.”

हा चिनी प्रवक्ता एवढ्यावरच थांबला नाही. तो पुढे म्हणाला कि

“आम्ही भारताच्या बाजूने आग्रह करतो की चीनच्या मुख्य चिंतांचा प्रामाणिकपणे आदर करावा. सीमाप्रश्नाला गुंतागुंतीची आणि विस्तारणारी कोणतीही कृती थांबवावी आणि परस्पर विश्वास आणि द्विपक्षीय संबंध बिघडवण्यापासून दूर राहावे. चीन-भारत सीमाभाग आणि द्विपक्षीय संबंध मजबूत आणि स्थिर विकासाच्या मार्गावर येण्यास मदत करत आहे,” असे झाओ लिजियान म्हणाले.

चिन्यांनी केलेल्या या वक्तव्यावर भारताकडून जवाब तो मंगता  है ना भिडू !

चीनच्या प्रवक्त्याच्या वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “भारताच्या राज्यात एखाद्या नेत्याच्या देशाबाहेर जाण्यावर चीनचा आक्षेप अनावश्यक आहे आणि भारतीय नागरिकांच्या समजण्याच्या पलीकडे आहे. आम्ही चीनच्या अधिकृत प्रवक्त्याचे विधान पाहिले आहे. आम्ही अशा गोष्टी नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे.”

गेल्या काही महिन्याआधी चीनने भारताच्या काही भूमीवर कब्जा मिळवला असल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्यांनी अरुणाचल प्रदेश भारताचा भाग नसल्याचं सांगितलंय. ह्या वादाची सुरुवात कधी झाली होती, नक्की भारत आणि चीन चा अरुणाचल प्रदेश वरील हा वाद नक्की काय हे जाणून घेऊया 

भारत आणि चीन यांच्यात 3 हजार 488 किमी लांबीची सीमा आहे. ही सीमारेषा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते. ही सीमा तीन सेक्टर्समध्ये विभागलेली आहे – पश्चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मिडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश.

अनेक भागांवरून दोन्ही देशांमध्ये वाद असल्याने अजून बऱ्याच ठिकाणी सीमेचं आरेखन झालेलं नाही.पश्चिम सेक्टरमधल्या अक्साई चीन भागावर भारत आपला दावा सांगतो. हा भाग सध्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे.

1962 सालच्या भारत-चीन युद्धादरम्यान चीनने हा संपूर्ण भाग ताब्यात घेतला होता. तर पूर्व सेक्टरमध्ये चीन अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगतो. चीनच्या म्हणण्यानुसार हा दक्षिण तिबेटचा भाग आहे.

तिबेट आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात आलेल्या मॅकमोहन रेषेलाही चीन मानत नाही.

1914 साली ब्रिटीश भारत आणि तिबेटच्या प्रतिनिधींनी हा करार केला त्यावेळी आपण तिथे उपस्थित नव्हतो, असं चीनचं म्हणणं आहे. तिबेट आमचा भाग असल्याने तिबेट स्वतः एकट्याने कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, असं चीनचं म्हणणं आहे.

खरंतर 1914 मध्ये तिबेट एक दुबळं मात्र स्वतंत्र राष्ट्र होतं. मात्र, तिबेट स्वतंत्र राष्ट्र आहे, हे चीनने कधीच मान्य केलं नाही. 1950 साली चीनने तिबेटवर पूर्णपणे ताबा मिळवला.

एकूण काय तर चीन मॅकमोहन रेषेला मानत नाही आणि अक्साई चीनवर भारताने जो दावा सांगितला आहे, त्याचंही चीनने खंडन केलं आहे.

आता ह्या चीनला कोण सांगणार कि शेतीचा धुरा हळू हळू बाजूला सरकवत बाजूचे शेत हडप करणारे आम्ही भारतीय आहोत. कधी तिबेटसहीत उर्वरित भागावर भर कब्जा करेल हे कळणार सुद्धा नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.