भारतीय डॉक्टरचा अंत्यविधी चीनच्या पंतप्रधानांनी पार पाडला.

सध्या भारत आणि चीनमधील वातावरण काहीसं तंग बनलं आहे. चीनच्या सीमेवर जवान एकमेकांवर बंदूक रोखून उभे आहेत. दोन्ही देशातील व्यापार आणि राजनैतिक संबंध काहीसे थंडावले आहेत. १९६२ सालच्या युद्धातल्या जखमेची खपली पुन्हा निघाली आहे.

पण एक काळ होता की हे दोन्ही देश एकमेकांना हिंदी चिनी भाई भाई म्हणवून घ्यायचे. भारतासोबतच स्वतंत्र झालेल्या चीनच्या उभारणीत आपल्या देशाचाही सिंहाचा वाटा आहे. दोन्ही देशांच्या मैत्रीचे संबंध स्वातंत्र्याच्याही पूर्वी पासूनचे आहेत.

गोष्ट आहे १९३८ सालची.

अक्राळ विक्राळ आकाराच्या चीनवर चिमुकल्या जपानने हल्ला केला होता. जपानचा राजा अतिमहत्वाकांक्षी होता. त्याने भली मोठी सेना उभी केली होती. हे सैन्य चीनला सहज खाऊन टाकील अशीच शक्यता निर्माण झाली होती.

चीनमध्ये तेव्हा क्वोमिंतांग पक्षाचे राज्य होते. सरंजामशाहीविरूद्ध चळवळ उभारणाऱ्या माओचे आणि या पक्षाचे प्रचंड वैर होते. माओच्या रेड आर्मीचे आणि क्वोमिंतांग पार्टीचे युद्ध देखील झाले होते. यात झालेल्या पराभवानंतर आपले ८५००० वर सैन्य, १५०० वर सैनिक घेऊन माओ चीनमधील ११ प्रांतांत वर्षभर फिरत राहिला व क्रांतीची ज्वाला पेटवत राहिला. यालाच लॉन्ग मार्च म्हणून ओळखले जाते.

पण जेव्हा जपानचं संकट चीनवर ओढवलं तेव्हा क्वोमिंतांग आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले. त्यांनी एकत्र लढा सुरु केला.

दुसऱ्या महायुद्धाचे दिवस होते. जगभरात आघाड्या उघडल्या जात होत्या. इटली, जर्मनी आणि जपान विरुद्ध इंग्लंड, फ्रान्स या देशांची आघाडी उघडली जात होती. भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांचा चीनला पाठिंबा होता. पण तिथल्या सरकारने भारतातल्या स्वातंत्र्यलढ्याकडूनही मदत मागितली.

तेव्हा देशभरात प्रांतीय सरकारे स्थापन झाली होती. काँग्रेसचा या सरकारमध्ये वरचष्मा होता. चीनच्या नेत्यांनी काँग्रेस नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संपर्क केला,

आम्हाला युद्धात  जखमी झालेल्या सैनिंकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे व असे काही डॉक्टर आपण चीनला  द्यावेत अशी मागणी त्यांच्याकडे केली.

नेहरूंनी हा विषय काँग्रेसच्या अधिवेशनात मांडला. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ३० जून १९३८ रोजी जनतेकडे या मदतीसाठी निधी उभा करण्याचे आवाहन केले. या मदतनिधीतून पाच डॉक्टर आणि एक अँब्युलन्स अशी टीम जहाजमार्गाने चीनच्या वूहान प्रांतात पोहचली.

या टीमचे प्रमुख होते अलाहाबादचे डॉ. मदन मोहनलाल अटल. त्यांच्या सोबत नागपूरचे डॉ.चोळकर, कलकत्त्याचे डॉ.बासू आणि डॉ.चटर्जी तर सोलापूरचे डॉ.द्वारकानाथ कोटणीस अशी टीम होती.

त्यांच्या स्वागताला स्वतः झाऊ एन लाय आणि इतर महत्वाचे कम्युनिस्ट नेते हजर होते. हजारोंच्या गर्दीने त्यांचं स्वागत झालं. काही दिवसांतच त्यांची रवानगी युद्धभूमीवर करण्यात आली. तिथे माओंशी त्यांची भेट झाली. अतिशय खडतर परिस्थितीत आणि दुर्गम प्रदेशात युद्धात जखमी होणाऱ्या सैन्यावर उपचार करण्याचं काम त्यांनी केलं. १९३९ साली त्यांचं कार्य पाहण्यासाठी पंडित नेहरू चीनला देखील येऊन गेले.

देशाच्या कानाकोपऱ्यात पसरून हजारो चिनी सैनिकांना भारतीय डॉक्टर्सच्या या टीमने जीवनदान दिले. 

दोन वर्षांनी डॉ.अटल आणि बाकीची टीम भारतात परतली. पण द्वारकानाथ कोटणीस तिथेच राहिले. त्यांची नियुक्ती चीनच्या ‘बेथने इंटरनॅशनल पीस हॉस्पिटल’च्या संचालकपदी करण्यात आली. जवळपास पाच वर्षे चीनमध्ये राहून कोटणीसांनी रुग्णसेवा केली. त्यांनी चीनमधल्याच एका युवतीशी लग्न केलं.

एका मुलाच्या जन्मानंतर ९ डिसेंबर १९४२ रोजी डॉ. कोटणीस यांचा कामाच्या ताणामुळे एपिलेप्सीमुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यनंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना माओ झोडांग म्हणाला,

“सैन्याने मदतीचा हात गमावलाय, देशाने आपला मित्र गमावलाय”

डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून चीनमध्ये त्यांचा पुतळा देखील उभारण्यात आला. फक्त नेत्यांमध्येच नाही तर संपूर्ण चीनमध्ये भारतीय डॉक्टर्सच्या प्रति आदर आणि प्रेमाची भावना होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला इंग्लंडने स्वातंत्र्य दिले. तिकडे चीन मध्ये देखील १९४९ साली माओंच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जनता-प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. या दोन्ही देशांत राजनैतिक संबन्ध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु झाले.

भारतातर्फे चीनला भेट देणाऱ्या पहिल्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून डॉ.अटल यांची निवड करण्यात आली. जपान विरुद्धच्या युद्धात स्वतःचा जीव पणाला लावून त्यांनी केलेलं काम याची आठवण माओ विसरले नव्हते. अटल यांची चीन मध्ये असलेली लोकप्रियतेला लक्षात घेऊनच ही निवड केली गेली होती.

पुढे डॉ.अटल यांनी चीनमध्ये अनेक दौरे केले. अशाच एका १९५८सालच्या दौऱ्या वेळी डॉ.अटल यांचे अकस्मात निधन झाले. ते सत्तर वर्षांचे होते.

भारत आणि चीनमधील संबन्ध दुरावायला सुरवात झाली होती तो हा काळ. डॉ.अटल मृत्यूच्या वेळी सरकारी दौऱ्यावर नव्हते त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीला मोठे अधिकारी हजर नव्हते. तरी  भारताचे चीन मधले राजदूत आर.के.नेहरू व निष्णात दुभाषी वसन्तराव परांजपे उपस्थित होते. आणखी कोणी हिंदी गृहस्थ अंत्ययात्रेला हजर नव्हता.

चिनी अधिकारी येतील अशी शक्यता नव्हती मात्र अखेरच्या क्षणाला थेट चीनचे पंतप्रधान झाऊ एन लाय अचानक तिथे येऊन पोहचले त्यांनी या अंत्यविधीची सूत्रे आपल्या हातात घेतली. हिंदू पद्धतीने सर्व अंत्यसंस्कार अशक्य होते. मग वसंतरावांनी गीतेचा दुसरा अध्याय म्हटला आणि विद्युत्‌दाहिनीत पार्थिव देहास अग्नी देण्यात आला.

चीनचे पंतप्रधान एका परदेशातल्या निवृत्त डॉक्टरच्या अंत्यविधीला जातात हे उदाहरण एकमेवच असेल.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.