चीनी मातीची भांडी पुर्वी गरिबींच प्रतिक होतं, पण नाव बदललं आणि…

महागडे कपडे, महागड्या गाड्या, आलिशान बंगले आणि डीनर टेबलावर बोनचायना भांडी. असं वर्णन केल्यावर लगेच एखाद्या श्रीमंत घराची इमेज डोळ्यासमोर येते. श्रीमंतांची चैन आणि सुखसुविधा प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटतात.

पण थांबा या सगळ्या वस्तूंमध्ये आपण ज्या बोनचायना भांड्याचा उल्लेख केलाय ते भांडं आज जरी श्रीमंतांच्या डीनर टेबलवर दिसत असलं तरी ते मुळात श्रीमंतांच्या घरचं भांडं नाही. 

हे वाचून आश्चर्य वाटलं ना. एवढं एक्सपेन्सिव्ह भांडं श्रीमंतांच्या घरातलं नाही तर मग कुणाच्या घरातलं आहे? असा प्रश्न पडला असेल तर या चिनी मातीच्या भांड्याचा गरीबाच्या घरापासून श्रीमंतांच्या डिनर टेबलापर्यंत प्रवास कसा झाला ते समजून घ्या.

चायना का माल सस्ते में अशी एक म्हण आहे.

या म्हणीप्रमाणेच चिनी भांडे सुद्धा एकेकाळी फार स्वस्त होते आणि म्हणूनच या भांड्यांचा वापर गरीब परिवारांमध्ये सामान्य होता. एवढंच नाही तर एकेकाळी घरामध्ये आलेल्या सगळ्यात कमी दर्जाच्या पाहुण्यांना चिनी मातीच्या भांड्यामध्ये जेवण दिलं जायचं.

पण हेच चिनी मातीचं भांडं बोनचायना या इंग्लिश रूपात अवतरलं आणि चिनी मातीच्या भांड्यांचा दर्जा एकदमच वाढला.

पूर्वीपासूनच भारत आणि जगभरात चिनी मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो. भारतात पूर्वी गरीबाच्या घरी मातीची आणि चिनी मातीची भांडी प्रचलनात होती. तर मध्यमवर्गीय आणि श्रीमंत घरात दररोजच्या वापरासाठी तांबा, पितळेची भांडी वापरली जायची तर घरात पाहुणे राहुळे आले असल्यावर कासा किंवा चांदीच्या भांड्यांचा वापर केला जायचा.

पण ब्रिटिशांच्या काळात या भांड्यांच्या वापरात बदल व्हायला लागला. तांब्या पितळेची भांडी तशीच राहिली पण यात एक आणखी एका चमचमत्या भांड्याच्या समावेश झाला. 

तो म्हणजे स्टीलच्या भांड्याचा..

हळूहळू भारतातील मध्यमवर्गीय लोकं दररोज तर तांब्या पितळेची भांडी वापरायची. मात्र घरी पाहुणे आले असतील किंवा घरात काही विशेष असेल तर स्टीलच्या भांड्यांचा वापर करत होते. तर सामान्य दर्जाचे पाहुणे घरात आले असतील तर त्यांना साध्या चिनी मातीच्या भांड्यात जेवण वाढलं जायचं.

मात्र भारतात हळूहळू वेस्टर्न पद्धतीचा प्रभाव वाढायला लागला. युरोपीय देशांमध्ये प्रसिद्ध असलेली बोनचायना क्रॉकरी भारतात प्रसिद्ध व्हायला लागली. त्याचबरोबर स्टीलची भांडी स्वस्त असल्यामुळे ती सामान्य लोकांच्या आवाक्यात आली आणि चिनी मातीच्या भांड्यांचं युरोपियन व्हर्जन असलेली महागडी व नाजूक क्रॉकरी श्रीमंतांच्या टेबलावर यायला लागली. 

पण हे चिनी मातीचं भांडं बोनचायना या नावाने परतण्यामागे सुद्धा किस्सा आहे. 

झालं असं की चिनी मातीची भांडी एका देशातून दुसऱ्या देशात नेतांना फुटायची त्यामुळे व्यापारी थेट चिनी मातीचा व्यापार करायचे. यामुळे ज्या देशात भाडे विकायचे आहे त्याच देशात भांडे तयार केले जायचे. पण युरोपियन देशांना याबद्दल मोठी अडचण व्हायची, कारण एवढ्या दूर चीनमधून इंग्लंडमध्ये माती आणि भांडी वाहून आणण्यासाठी प्रचंड खर्च यायचा.

या खर्चात कपात करण्यासाठी इंग्लंडमधील थॉमस फ्रे यांनी १७४८ मध्ये यावर एक तोडगा काढला. त्याने शेजारच्या कत्तलखान्यातली हाडं गोळा केली आणि त्यांना उकळून साफ केलं. नंतर त्या हाडांचा भुगा केला आणि तो चिनी मातीत मिसळला. चिनी माती आणि हाडांच्या भुग्यापासून तयार झालेली ही नवीन भांडी चिनी मातीसारखीच गुळगुळीत आणि सुंदर असायची.

हाडांमुळे नैसर्गिकरित्या पांढऱ्या रंगाच्या या भांड्यांना मागणी वाढायला लागली आणि भरपूर किंमत सुद्धा मिळत होता. मुळात चिनी माती आणि त्यात हाडांचा भुगा मिसळलेल्या या भांड्यांना “बोनचायना” असं मिक्स नाव मिळालं. हळूहळू इंग्लंडच्या अनेक कंपन्यांनी बोनचायना भांडी बनवण्याचा व्यवसाय चांगलाच वाढवला. त्यामुळे ही भांडी युरोपात फेमस व्हायला लागली होती. 

पण यात एक सिक्रेट होतं. ते म्हणजे ही बोनचायना भांडी कशापासून बनवायची याची विधी फक्त ब्रिटिश लोकांनाच माहित होती. 

ही भांडी बनवण्यासाठी साधारणपणे ५० टक्के हाडांचा भुगा, २५ टक्के चिनी माती आणि २५ टक्के चिनी दगडांचा भुगा आणि केमिकल्सचा वापर केला जातो. २० व्या शतकापर्यंत केवळ ब्रिटिश लोकांची मक्तेदारी असल्यामुळे ही भांडी अतिशय महागड्या किमतीत विकली जायची. त्यामुळेच ही भांडी केवळ श्रीमंत वर्गापुरती मर्यादित होती.  

जगभरात प्रतिष्ठा असलेल्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ सुद्धा या बोनचायना भांड्यांचा वापर करत होत्या. त्या चहा पिण्यासाठी बोनचायना टी कपचा वापर करत होत्या. सोबतच राजमहालाच्या महत्वाच्या भांड्यांमध्ये बोनचायनाच्या क्रॉकरीचा समावेश आहे.

आता महाराणी वापरते म्हटल्यावर श्रीमंत लोकं कशी काय मागं राहतील. ते सुद्धा बोनचायना क्रॉकरीला प्रतिष्ठेचं लक्षण मानायला लागले. श्रीमंत चैन मानतात म्हणून कंपन्या सुद्धा श्रीमंतांना भुरळ पडेल अशा सुंदर, पातळ, नाजूक आणि गुळगुळीत क्रॉकरी बनवायला लागले. त्यावर सुंदर चित्र बनवायला लागले.

याचाच प्रभाव भारतातील श्रीमंत वर्गावर पडला आणि गरीबाच्या घरचं चिनी मातीचं भांडं श्रीमंतांच्या डीनर टेबलवर दिमाखात वापरलं जायला लागलं. तांब्या पितळेच्या भांड्यांऐवजी बोनचायना भांडी प्रतिष्ठेचं लक्षण मानली जाऊ लागली. पण जरी बोनचायना भांडं चिनी मातीपासून बनवलं जात असलं तरी त्यात हाडांचा वापर होत असल्यामुळे भारतातील अनेक लोक याचा वापर करत नाहीत. त्याजागी बोनचायनाप्रमाणे दिसणाऱ्या सिरॅमिक आणि पोर्सलीनच्या भांड्यांचा वापर करतात. 

एकेकाळी ब्रिटिश लोकांची मक्तेदारी असलेल्या या फॉर्म्युलाची माहिती जगातील बाकीच्या देशांना सुद्धा कळली.

मग काय परत चीन आणि एशियन देशांमध्ये या बोनचायना भांड्यांची निर्मिती करायला लागली. २०२० च्या आकडेवारीनुसार चीनने ३२ हजार २६७ करोड रुपये, बांग्लादेशाने २६ हजार ५८७ करोड रुपये आणि इंडोनेशियाने १७ हजार २८६ करोड रुपयांच्या पोर्सलीन भांड्यांचा व्यवसाय केला होता.

२०२१ सालात या भांड्यांचा जागतिक व्यापार १ लाख ८१ हजार ९११ हजार करोड रुपयांचा होता. तो २०२२ संपेपर्यंत ३ लाख ६२ हजार करोड रुपयांचा होणार आहे. तर २०३२ साल संपेपर्यंत हाच व्यवसाय ६ लाख ३२ हजार कोटींपर्यंत वाढेल. गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात त्याप्रमाणे थॉमस फ्रे भाऊंनी बोनचायना भांड्यांचा शोध लावला आणि गरीबाच्या घरचं चिनी मातीचं भांडं श्रीमंतांच्या डिनर टेबलवर जाऊन पोहोचलं. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.