खरं वाटत नाही, पण आपलं बालपण सुखाचं करणारा चिंटू ३० वर्षांचा झालाय…
बऱ्याच जणांना लहानपणापासून एक सवय असते. पेपर वाचताना मागच्या पानापासून सुरुवात करायची. याला कारणं दोन होती, पाहिलं कारण म्हणजे सगळ्यात मागच्या पानावर खेळाच्या बातम्या यायच्या. कोण कसं खेळलं, मॅचमध्ये काय झालं हे माहीत असलं, तरी क्रिकेटर्स आणि इतर खेळाडूंचे फोटो बघण्यात एक वेगळीच मजा वाटायची.
दुसरं कारण आणखी भारी होतं, ते म्हणजे मागच्या पानांपैकीच एका पानावर येणारा ‘चिंटू.’ चिंटू हे त्याच नावानं सुरू असलेल्या व्यंगचित्र मालिकेतलं एक पात्र. खरंतर हे एका आठ-नऊ वर्षांच्या खट्याळ, निरागस, प्रामाणिक आणि तितकाच हुशार असणाऱ्या मुलाचं कार्टून. त्याचं कुटुंब, मित्रपरिवार या काल्पनिक पात्रांच्या जीवनात घडणारे प्रसंग या व्यंगचित्र मालिकेतून चितारले जातात. मराठी वाचता येणारे आणि विनोद समजणारे अनेक जण बालपणापासून चिंटूचे फॅन आहेत.
चिंटूचं पहिलं व्यंगचित्र प्रकाशित झालं ते २१ नोव्हेंबर १९९१ रोजी. तेही दैनिक सकाळमध्ये. चिंटूचे जन्मदाते म्हणून फेमस असणारे चारुहास पंडित आणि दिवंगत प्रभाकर वाडेकर यांच्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना सकाळचे तत्कालीन संपादक विजय कुवळेकर यांनी उचलून धरली आणि २१ नोव्हेंबरच्या अंकात पहिला चिंटू छापून आला.
छोटे पण बोलके डोळे, कपाळावर आलेली केसांची बट, आडव्या पट्यांचा टीशर्ट आणि हाफ पॅन्ट असा ठरलेला ड्रेस हे चिंटूचं रूप होतं. पप्पू, मिनी, राजू, बगळ्या हे मित्र, आई-पप्पा, जोशी काका आणि काकू, सतीश दादा, आजी-आजोबा अशी अनेक पात्रं चिंटूच्या सोबतच लोकप्रिय झाली.
आपल्या रोजच्या जीवनात घडलेल्या घटना चिंटूमधून विनोदी पद्धतीनं सादर व्हायच्या. चिंटूची कल्पना कशी सुचली याबद्दल चारुहास पंडित मायबोली संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, ”मी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये येणार्या गारफिल्ड, डिलबर्ट यांसारख्या व्यंगचित्र मालिका न चुकता वाचायचो. त्याचवेळी अशी एखादी भारतीय मालिका का नाही, असाही विचार नेहमी मनात यायचा. या सगळ्या मालिका निश्चितपणे उत्तम आहेत, त्यातला विनोद, नाविन्यही चांगलं असतं. पण तरीही कधीकधी त्यांचं भारतीय नसणं हे मनाला खटकतं, त्यातल्या काही गोष्टी आपल्याला अजिबातच जवळच्या वाटत नाहीत. उदाहरणार्थ सांगायचं झालं, तर बर्फ पडण्यावरून केले जाणारे विनोद आपल्याकडे तसं हवामानच नसल्यानं आपण त्या विनोदाचं कौतुकच करू शकत नाही.”
”त्यात रोजच्या वृत्तपत्रात अनेक नकारात्मक बातम्याही असतात. त्यामुळं यामध्ये काहीतरी हलकंफुलकं असावं, असं मला स्वत:ला वृत्तपत्र वाचताना जाणवायचं. त्यात असा एखादातरी कोपरा असावा, जो वाचकाच्या चेहर्यावर हसू आणेल, त्याला रोजच्या घडामोडींमधून काहीतरी वेगळं देईल आणि शिवाय ते आपल्या जवळचंही असेल. यातूनच भारतीय मातीतलं असं एखादं व्यक्तिमत्त्व व्यंगचित्र मालिकेद्वारे तयार करायचा विचार सुरू झाला आणि प्रभाकरच्या साथीनं चिंटूचा जन्म झाला.”
सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट असणारा चिंटू पुढे रंगीत फॉरमॅटमध्ये आला. इतकंच काय तर चिंटू ॲनिमेशनच्या रूपातही भेटीला आला आणि सिनेमामधूनही.
चिंटू सगळ्यांच्या पसंतीस पडण्यामागचं मुख्य कारण होतं की, त्यातला मजकूर हा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी आणि माणसांशी कायम निगडीत असायचा. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, उन्हाळाच्या सुट्ट्या, दिवाळी, गणपती असं जे काही घडत असायचं, त्यानुसार चिंटूची चित्र प्रकाशित व्हायची. देशातली किंवा जगातली लाडकी माणसं जेव्हा जग सोडून गेली, तेव्हा प्रदर्शित झालेले चिंटू अत्यंत लोकप्रिय ठरले. विशेषतः ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचं निधन झाल्यावरचा चिंटू आजही अनेकांच्या संग्रहात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यावरही चिंटूतून त्यांना आदरांजली वाहण्यात आली होती.
चिंटूच्या चित्रांसोबत असणारा मजकूरही हास्याचे फवारे उडवायचा. कधी कधी मात्र एकही शब्द न बोलता नुसत्या चित्रांमुळं हसून पुरेवाट व्हायची.
२०१३ मध्ये चिंटू चितारणाऱ्या जोडगोळीतल्या प्रभाकर वाडेकर यांचं निधन झालं, मात्र चारुहास पंडित यांनी चिंटूच्या परंपरेत खंड पडू दिला नाही. आज तब्बल तीस वर्ष झाली, तरी चिंटू वाचण्याची सवय मोडलेली नाही. पेपरात नियमितपणे येत नसला, तरी फेसबुक स्क्रोल करताना चिंटू हमखास दिसतो आणि कितीही टेन्शन असलं, तरी चेहऱ्यावर हसू फुलवतोच.
हे ही वाच भिडू:
- तिखट स्वभावाचा गोड माणूस
- चर्चिलच्या चरित्रात भारतातून फक्त एका व्यंगचित्रकाराची चित्रे छापली गेली. ते होते बाळासाहेब..
- पुलंच्या आयुष्यात घडलेला किस्सा पिळगावकरांनी अत्यंत हुशारीने बनवाबनवीत वापरला