नाथ पै कोण होते..? त्यांनी एकदा लोकसभेत नेहरूंची बोलती बंद केलेली..

घोषणे तब्ब्ल २० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग जिह्यात नागरिकांना चिपी विमानतळ मिळाले. या विमानतळामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळाली आहे. आता या विमानतळाला बॅ नाथ पै यांचे नाव देण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. चिपी विमानतळाला कोकणच्या सुपुत्राचे नाव दिल्याने या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. 

चिपी विमानतळाला नाव दिले ते बॅरिस्टर नाथ पै कोण होते  

नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील हे पोस्ट मास्तर होते. पोस्ट खात्यात होणाऱ्या वारंवार बदल्यांना कंटाळून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि वेंगुर्ले येते शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. वेंगुर्ले येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव पंढरीनाथ ठेवण्यात आले होते. पण त्यांना लाडाने ‘नाथ’ म्हटले जात होते. 

नाथ पै यांना लहानपणीच वडिलांना गमवावे लागले. प्लेगच्या साथीत त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या आईने धीराने नाथ आणि त्यांच्या भावंडाना शिकवले. पुढे नाथ पै यांच्या भावाने बेळगावला दुकान सुरु केले होते आणि बहीण पण बेळगावला दिल्याने पै कुटुंबीय बेळगावला स्थलांतरित झाले. नाथ पै यांची कर्मभूमी बेळगाव ठरली. 

बेळगाव येथे बेनन स्मिथ हायस्कुल मध्ये नाथ पै यांनी प्रवेश घेतला. याच शाळेत त्यांना इंग्रजी आणि संस्कृत विषयाची गोडी लागली. फ्रेंच, पर्शियन भाषा त्यांनी याच शाळेत शिकले. बी. ए नंतर नाथ पै पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. इथे त्यांनी इंटरसाठी फर्ग्युसन कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले. नाथ पै यांनी शालेय जीवनापासून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होते. पुण्यात आल्यावर सुद्धा त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. 

१९४२ मध्ये देशात स्वातंत्र्याची अंतिम लढाई जोर धरू लागली होती. नाथ पै यापासून दूर राहणे शक्य नव्हते. 

त्याने पुणे सोडून बेळगाव गाठले. भूमिगत होऊन ते लढत होते. यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. याच काळात त्यांचा राम मनोहर लोहिया यांच्याशी संपर्क आला. त्यांनी ब्रिटिश विरोधात गावा गावात जाऊन प्रचार केला होता.  मधल्या काळात त्यांना तुरुंगवास सुद्धा झाला. 

१९४५ ला बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपले शिक्षणपूर्ण केले. १९४७ त्यांनी आपली बी. एची पदवी घेतली. बी. ए. नंतर नाथ पै यांनी बॅरिस्टर व्हावे अशी इच्छा त्यांच्या घरच्यांची होती. वयाच्या २५ व्या वर्षी ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लडनला गेले. ब्रिटन मध्ये त्यांनी लेबर पार्टीच्या कार्यात आणि लंगर चळवळीत सहभाग नोंदवला. ऑस्ट्रिया सरकारची शिष्यवृत्ती मिळवली होती. बॅरिस्टरच्या दोन परीक्षा पास झाले होते तिसरी आणि अंतिम परीक्षा देण्यापूर्वी १९५२ मध्ये देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली होती. 

बेळगावच्या समाजवादी पक्षाने बेळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून नाथ पै यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाथ पै हे परीक्षा न देताच भारतात परत आले. मात्र त्यांना निवडणुकीत हार पत्करावी लागली. त्यानंतर ते परत इंग्लंडला गेले आणि १९५३ मध्ये त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली. परत आल्यानंतर त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता.   

१९५७ च्या लोकसभेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. संयुक्त महाराष्ट्र मराठी भाषिक प्रदेशातील सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय घेतला होता. या समितीत काँग्रेस सोडून सगळे पक्ष सामील झाले होते. राजापूर लोकसभा मतदारसंघ समितीचा घटक पक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षाला देण्यात आला होता. बॅ. नाथ पै यांना समाजवादी पक्षातर्फ़े उमेदवारी देण्यात आली. 

बॅ नाथ पै हे राजापूर लोकसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आले.

राजापूर मतदारसंघातून १९५७, १९६२ आणि १९६७ असे सलग तीन वेळा ते निवडून आले. नाथ पै यांनी १४ वर्ष राजापूर मतदारसंघाचे नेतुत्व केले. एकदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तो प्रतिनिधी फक्त मतदार संघाचा किंवा राज्याचा राहत नाही तर तो देशाचा प्रतिनिधी होते असे म्हणत. याच प्रमाणे त्यांनी लोकसभेत काम केले. 

पहिल्या अधिवेशनात नाथ पै यांनी लोकसभेत यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. ते जेव्हा बोलायला उभे राहिल्यावर त्यांचे विरोधक सुद्धा मंत्रमुग्ध होत.     

बॅ. नाथ पै यांच्या संसदीय कार्याचा अनुभव, वक्तृत्व व राष्ट्रीय दृष्टी यांचा पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या ज्येष्ठ राजकारण्यांवर सुद्धा प्रभाव पडला होता. चुकीच्या धोरणावर टिका करतांना नेहरूंना कुठले नेहरू खरे असा प्रश्न विचारण्याची ताकत बॅ. नाथ पै यांच्याकडे होती.   

१९६० मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या संप केला होता. त्याचे नेतृत्व बॅ. नाथ पै यांनी केले होते. सरकारने पाशवी बळाचा वापर करून, हा संप मोडून काढला. या संपाबाबत नाथ पै यांनी लोकसभेत चर्चा घडवून आणली.

या चर्चेत जवाहरलाल नेहरू यांनी सरकारची बाजू मांडताना संपाच्या अपरिपक्वतेचा आरोप करून “ज्यांना प्रत्यक्ष एखाद्या गाढवावरही बसता येत नाही, ते वाघावर बसण्याची भाषा बोलतात हे आश्चर्यकारक नव्हे काय?” अशा शब्दांत संपाच्या नेतृत्वावर टीका केली होती. या संपाला ‘सामाजिक बंडखोरी’ असे संबोधून लोकशाहीत संपाचा अधिकार असावा का? असाही प्रश्न उपस्थित केला होता.

नेहरूंच्या आक्षेपांना बॅ.नाथ पै कसे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुसऱ्या दिवशीत्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोकसभेच्या सर्व प्रेक्षक गॅलरी तुडुंब भरल्या होत्या. लोकसभेत येतांना त्यांनी नेहरू यांच्या आत्मवृत्ताची प्रत घेऊन आले होते.

यावेळी त्यांनी पंडितजींच्या आत्मवृत्तामधील १९२६ साली इंग्लंडमधील कोळसा कामगारांच्या संपाला पाठिंबा देणारे पंडितजींचे विचार वाचून दाखवून बॅ. नाथ पै यांनी सवाल केला,

“कोणते नेहरू खरे? १९२६ साली इंग्लंडमधील कोळसा कामगारांच्या संपाला पाठिंबा देणारे की स्वदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला विरोध करणारे?’’

असा प्रश्न उपस्थित केला होता.

यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्राने छापले होते की , “बहुमताच्या बळावर पंडित नेहरू यांनी विजय मिळविला असला तरी प्रत्यक्षात बॅ. नाथ पै यांनी आपल्या प्रभावी भाषणाने सर्वांची मने जिंकली आहेत.’

बॅ नाथ पै हे कधीच स्वतःच्या अथवा पक्षाच्या जीप ने फिरत नसत. ते नेहमी एस. टी ने फिरायचे. यामुळे आपल्याला लोकांसोबत बोलता येत त्यांच्या समस्या समजून घेता येतात असे ते सांगत. समाजवादी विचार, संसदीय लोकशाहीवर दृढ विश्वास आणि जनसामानाच्या प्रशांबद्दल तळमळ हे बॅ. नाथ पै यांच्या स्वभावाचे वैशिट्य होते. अशा नेत्यांचे विमानतळाला नाव देऊन सरकारने एक चांगला निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.