कंगनाच्या पिक्चरचा हिरोच नितीश कुमार यांच्यासाठी पनौती ठरलाय !!

बिहारच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. भाजप आणि राजद मध्ये जोरदार फाईट सुरु आहे. काँग्रेस कायं आधी पासून खिजगणतीत ही नव्हती. सगळ्यात मोठं  अपयश नीतिश कुमार यांचं आहे. त्यांच्या मागच्या वेळच्या ७१ जागा घटून आता ४०-५०च्या दरम्यान आकडा  जाईल अशी शक्यता आहे.

याच कारण म्हणून चिराग पासवान यांच्या कडे बोट दाखवलं जातंय. चिरू भाऊंनी जिथे जिथे उमेदवार उभे केले त्यांनी नितीश कुमार यांची मते खाऊन त्यांना पनौती लावली.

चिराग पासवान यांची ओळख म्हणजे मुरलेले राजकारणी रामविलास पासवान यांचे सुपुत्र, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष, सध्याच्या निवडणुकीचे मुख्यमंत्र्याचे प्रमुख विरोधक आणि बिहारच्या राजकारणाचा भविष्यकाळ.

पण चिराग पासवान यांच्या बद्दल फक्त एवढीच ओळख सांगता येणार नाही. चिराग पासवान हे एका सिनेमाचे हिरो देखील राहिलेले आहेत. हिरोईन कोण माहित आहे ?

हिमाचली कंगना राणावत.

हो तीच ती आपली कंगना. शिवसेनेला नडणारी, स्वतःच ऑफिस पाडून  घेणारी, वाय सिक्युरिटीमध्ये वावरणारी आणि ह्रितिक रोशनच्या रात्रीची झोप उडवणारी घनी बावरी कंगना.

आता तुम्ही म्हणाल कि कंगना तर बाबा भारतातली नम्बर वन हिरोईन आहे.(असं तिचं स्वतःच ठाम मत आहे .) तिचे सगळे पिक्चर नॅशनल अवॉर्ड जिंकणारे, बॉक्स ऑफिस फोडून पैसे कमवणारे असतात आणि आम्ही हा पिक्चर बघितला नाही हे कसं शक्य आहे ?

तर मित्रांनो गोष्ट खूप जुनी आहे. साधारण दहा पंधरा वर्षांपूर्वीची.

चिराग पासवान नुकताच आपली इंजिनियरिंग पूर्ण करून करियर कशात सेट करायचं याचा विचार करत होते. मित्र म्हणायचे हँडसम दिसतोस, वडील केंद्रात मंत्री होते, बिहारी बाबूचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढला. त्यांनी मायानगरी मुंबईला प्रस्थान केलं. बापाने सुद्धा पोराचा हट्ट पुरवण्यासाठी परवानगी दिली.

चिराग पासवान सांगतात की त्यांनी देखील इतरांप्रमाणे मुंबईत स्ट्रगलिंग केलं. छोटे मोठे ऍक्टिंगचे क्लासेस लावले, डान्स क्लास लावला. बरीच मेहनत केली. आपल्या बोलण्यात बिहारी लहेजा प्रयत्नपूर्वक घालवला.

प्रत्येक बिहारी तरुणाप्रमाणे शाहरुख  खान सारखा हिरो बनायचं त्याचं स्वप्न होतं.

इकडे त्यांचा स्ट्रगल चालू होता आणि तिकडे त्यांचे पिता रामविलास पासवान हे देखील कधी नव्हे ते निवडणूक हरले होते आणि केंद्रातलं मंत्री पद हरवून घरी आले. खरं तर १९८९ पासून ते २०२० पर्यंत प्रत्येक पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात रामविलास पासवान यांची मंत्रिपदाची सीट बुक असायची मात्र तो तेवढाच त्यांचा बॅड पॅच.

असं म्हणतात कि रामविलास पासवान यांनीच आपल्या मुलाचं करियर सावरायचं ठरवलं आणि त्याला पहिला ब्रेक मिळवून दिला.

ते साल होतं २०११. तन्वीर खान नामक दिगदर्शक मिले ना मिले हम नावाचा सिनेमा बनवत होते. रामविलास पासवान यांनी पोराला लॉन्च करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. हिरोईन म्हणून कंगनाला निवडण्यात आलं.

गँगस्टर फॅशन वन्स अपॉन टाइम इन मुंबई या सारख्या सिनेमामुळे कंगना तो पर्यंत मोठी ऍक्ट्रेस बनली देखील होती. आदित्य पांचोली बरोबर ब्रेक अप करून ती अध्ययन सुमन नावाचा चॅप्टर तिच्या आयुष्यात सुरु होता. फँशनसाठी  नॅशनल अवॉर्ड देखील जिंकला होता. एवढं असूनही ती या न्यूकमर बरोबर पिक्चर करायला तयार झाली.

गंमत म्हणजे पिक्चर ची हिरोईन ती एकटी नव्हती तर तिघी होत्या. सागरिका घाटगे (आपल्या झहीरची बायको, चकदे इंडिया वाली ) आणि निरू बाजवा(सिरीयल वाली) हे सोडून श्वेता तिवारीचा आयटम सॉंग देखील ठेवण्यात आला होता. सलमानचे लाडके साजिद वाजिद म्युजिक डिरेक्टर होते.

शिवाय बाबाच्या रोल मध्ये कबीर बेदी, आई म्हणून पूनम धिल्लो फुल पैसे खर्च केले होते.

चिरू भाऊचं पिक्चर मधलं नाव सुद्धा चिरागचं होतं. यात पण तो श्रीमंत बापाच्या मुलाच्या रोल मध्ये होता. याचाच अर्थ त्याला ऍक्टिंग विशेष काही करायची नव्हती. पण बिचाऱ्याला ते जमलं नाही. मख्ख चेहरा करून तो संपूर्ण सिनेमात वावरला.

kanganachirag

चिराग पासवान सांगतो,

“मला माहीतच  नव्हतं कि हे क्षेत्र माझं नाही. मी खूप तयारी करून सेटवर जायचो आणि स्वतःचे डायलॉग सोडून इम्प्रूव्हाईज करत वेगळेच डायलॉग  म्हणायचो. समोरच्यालाही बोलू द्यायचो नाही. बाकी काही नाही पण या निमित्ताने मला भाषण करायला आवडते हे कळालं. “

मिले ना मिले हम बॉक्स ऑफिस वर जोरात आदळला. त्याला क्रिटिक्सनी पाच पैकी दिड -दोन स्टार दिले. नाही म्हणायला स्टार डस्ट अवॉर्ड ने न्यू कमर साठीच नॉमिनेशन त्याला दिलं होतं. पण तेही मिळालं नाही.

एवढं होई पर्यंत रामविलासजीनी हवेचा रोख ओळखून एनडीएमध्ये प्रवेश केला होता, त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं होतं. पोराला त्यांनी समजावून सांगितलं,

मुंबई हमारे बस  कि बात नाही वापस आजा

फिल्मइंडस्ट्री मधल्या नेपोटीजमला शिव्या घालत चिरूभाऊ आपलं घराणेशाही च राजकारण सांभाळायला बिहार ला परत आले.

आता या गोष्टीला पण अनेक उन्हाळे पावसाळे उलटून गेले. सिनेमात गंडलेला चिराग पासवान राजकारणात मात्र चांगला जम बसवून गेला. कंगना बरोबर सेटवर झालेली मैत्री तो विसरला नाही. जेव्हा बिहारचा सुपुत्र सुशांत सिंह राजपूत साठी कंगना लढू लागली आणि शिवसेनेने  तिचं ऑफिस पाडलं तेव्हा तिच्या समर्थनार्थ पुढे येणाऱ्या नेत्यांमध्ये चिराग पासवान एक नंबरला होता.

पण काहीही म्हणा त्याला ऍक्टिंग आजही जमत नाही. वडील वारल्यावर श्रद्धांजली वाहतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा सुद्धा लोक हेच म्हणाले. परवा निवडणुकी वेळी रागा रागा त एनडीए चा राजीनामा दिला पण भाजप सोडून फक्त जेडीयू विरुद्ध उमेदवार उभे केले तेव्हा देखील त्याची ऍक्टिंग उघडी पडली.

असो आपल्याला काय? त्याने सिनेमा सोडला आणि राजकारण पकडलं हेच त्यातल्या त्यात महाराष्ट्रा साठी चांगली गोष्ट झाली म्हणायचं एवढंच .

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.