चिराग पासवानांच्या मिटिंग पॉलिटिक्समुळे काका पशुपती पारस टेन्शनमध्ये आले आहेत…

लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी सिद्ध केलंय कि ते राजकारणात कोण्या कच्च्या गुरूचा चेला नाहीत. दिवंगत नेते आणि वडील राम विलास पासवान यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांनी अशी काही राजकीय चाल खेळली आहे कि त्यातून त्यांनी पुन्हा एकदा ठळक बातम्यांमध्ये स्थान मिळवलं आहे.

याहून मोठी गोष्ट म्हणजे चिराग पासवान यांनी आपले काका आणि केंद्रीय मंत्री यांना पद्धतशीरपणे मात दिली आहे.

रामविलास पासवान यांचा मृत्यू मागच्या वर्षी ८ ऑक्टोबरला झाला होता. मात्र हिंदी कॅलेंडरप्रमाणे त्यांचा पहिला स्मृतिदिन उद्या म्हणजे १२ सप्टेंबर रोजी होणार आहे.

याच रामविलास पासवान म्हणजे आपल्या वडिलांच्या पावलावर सध्या चिराग पासवान यांनी पाऊल टाकलं आहे. रामविलास पासवान यांची एक खासियत होती, ती म्हणजे त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यांना राजकारणातील हवेचा अचूक अंदाज यायचा.

चिराग यांनी देखील हेच सूत्र सध्या अवलंबले आहे. ते म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांशी पुन्हा  चांगले संबंध प्रस्थापित करायचे.

कारण मध्यंतरी बिहार निवडणुकीच्या काळात जनता दलाच्या विरोधात उमेदवार उभे करणे आणि पुन्हा लोकजनशक्ती पक्ष फोडाफोडीच्या घटनेवरून चिराग पासवान यांचे जनता दलाशी, भाजपशी आणि काका पशुपतीनाथ पारस यांच्याशी संबंध बिघडले होते.

या संबंध सुधार अभियानाची सुरुवात होते मागच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या तेजस्वी यादव-चिराग पासवान भेटीने. या भेटीनंतर बिहारच्या राजकारणात शक्यता बांधली जात होती कि चिराग पासवान राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वातील महागठबंधनमध्ये सहभागी होतील. पण तसं काही घडलेलं दिसलं नाही.

यानंतर चिराग दिल्लीला आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. आणि त्यांना आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला येण्याची विनंती केली. यानंतर ते केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटले.

त्यानंतर ते गेले थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला.पुढे ते राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालू प्रसाद यादव यांच्या भेटीला गेले आणि त्यांना देखील वर्षश्राद्धात सहभागी होण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांची भेट घेऊन त्यांना देखील आमंत्रित केलं.

या सगळ्या दरम्यान सगळ्यात महत्वाची भेट झाली ती त्यांचे काका पशुपति कुमार पारस यांची. चिराग यांनी काकांच्या घरी जात त्यांना देखील आमंत्रित केले. सोबतच चिराग पासवान आज नितीश कुमार यांना देखील भेटणार होते. पण नितीश कुमार यांनी चिराग पासवान यांना वेळ दिला नसल्याचं सांगितले आहे. 

या आमंत्रण भेटीवरून त्यांनी देशातील आणि राज्यातील सगळ्यात मोठ्या नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.

जर चिराग यांनी मनात आणलं असतं तर हे वर्षश्राद्ध ते सामान्य आणि कौटुंबिक पद्धतीने पार पाडू शकले असते. चिराग यांना देखील माहित होते कि, यातील जास्तीत जास्त नेते पटनामध्ये येऊन सहभागी होणार नाहीत. पण तरी देखील त्यांनी मिटिंग पॉलिटिक्स करत राज्यातील आणि देशातील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

सोबतच चिराग पासवान यांनी मनात आणलं असत तर ते सध्या मोदी सरकार आणि भाजपच्या विरोधात होत असलेल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीमध्ये सहभागी झाले असते. पण मोठ्या हुशारीने त्यांनी या सगळ्याला बगल दिली. वर्षश्राद्धाच्या तयारीचे कारण सांगितले आणि त्यांनी यानिमिताने राज्यातील आपल्या जनसंपर्क आणि नेत्यांच्या भेटी अभियानाला सुरुवात केली.

पासवान यांची जनसंपर्क यात्रा आणि मिटिंग पॉलिटिक्स बघून त्यांच्या काकांनी देखील जनसंपर्क अभियानाची घोषणा केली होती, पण बिहारची जनता त्यांच्यापासून काहीशी दूर राहिलेली दिसून आली.

त्यामुळे यातून एक प्रकारे सिद्ध झाले कि, बिहारची जनता पशुपति पारस यांनी घरातच केलेल्या बंडखोरीच्या विरोधात आहे तर, चिराग पासवान यांच्या जनसंपर्क अभियानाने सिद्ध केले कि रामविलास पासवान यांचे तेच खरे वारसदार आहेत. या सगळ्या गोष्टीनंतर पशुपती पारस यांनी टेन्शन आलं असल्याचं बोललं जात आहे.

याच टेन्शनमधून त्यांनी चिराग यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपला मोठा भाऊ रामविलास पासवान यांच्या वर्षश्राद्धामध्ये सहभागी होतील.

त्यामुळेच आता या मिटिंग पॉलिटिक्स आणि जनसंपर्क अभियानातून त्यांनी थेट काकांवर मात केली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

दुसऱ्या बाजूला आता चिराग पासवान सर्वपक्षीयांच्या आणि विशेषतः भाजपच्या पुन्हा जवळ गेल्याने ते उत्तरप्रदेश निवडणुकीत उतरणार असल्याचं बोललं जात आहे. आणि भाजप देखील चिराग यांना निवडणुकीसाठी दलित मतदार डोळ्यासमोर ठेऊन जवळ करू शकते. यात आता जर चिराग पासवान यांच्या गटाचे २ ते ३ आमदार जरी निवडून आले तरी त्यांच्या बिहारमधील चुकीच्या निर्णयावर पडदा पडू शकतो.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.