कोणताही खान कपूर नाही तर ‘चिरंजीवी’ भारतातला सर्वात हायेस्ट पेड ॲक्टर होता.
त्याची एंट्री झाली की पडद्यावर पैशाची बरसात व्हायला लागते. तो नाचू लागला कि विजा कडाडू लागतात. त्याची नजर व्हिलनला चड्डी ओली करायला बास असते. त्याचे डायलॉग पब्लिकला खुळे करून सोडतात. नागार्जुन ते अल्लू अर्जुन, पवन कल्याण ते महेश बाबू हे सगळे त्याच्या पुढे बच्चे आहेत.
भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा तो शेवटचा सुपरस्टार आहे. सुपरस्टार अंहं मेगास्टार चिरंजीवी.
कोणिदेल शिवशंकर वरप्रसाद नावाचा एका हवालदाराचा मुलगा. आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एका छोट्या गावात त्याचा जन्म झाला. वडिलांच्या फिरतीच्या नोकरी मुळे आजोळी वाढला.
एकदा त्याला लहानपणी स्वप्न पडलं की एक म्हातारा आणि मुलगी ‘ चिरंजीवी ’ म्हणून हाक मारत आहेत. त्याला काही स्वप्नाचा अर्थ कळाला नाही. तो आपल्या आईकडे गेला आणि तिला पडलेलं स्वप्न सांगितलं. त्यात त्यांचं कुटूंब हनुमान भक्त. हनुमानालाच चिरंजीवी असं म्हणतात.
आपला मुलगा हनुमानाप्रमाणे बलशाली आणि पराक्रमी व्हावा म्हणून आईने तेव्हापासून त्याच नाव चिरंजीवी ’ हे नाव ठेवलं.
हाच चिरंजीवी ज्याला अख्ख्या दक्षिण भारतात मेगा स्टार ही पदवी मिळाली. असं म्हणतात कि तेलगू फिल्म इंडस्ट्री मध्ये त्याच्या सारखा दुसरा सुपरस्टार कधी झाला नाही आणि कधी होणार नाही.
द बॉस चिरंजीवी. थलईवा रजनीकांत नंतर फिल्म इंडस्ट्रीच सम्राटपण कोणी उपभोगलं असेल तर ते चिरंजीवी यानेच.
चिरंजीवी हा शालेय जीवनापासून हरहुन्नरी होता. शाळेच्या एनसीसीमध्ये बेस्ट कॅडेट म्हणून त्याला नावाजलं गेलं होतं. २६ जानेवारीला दिल्लीच्या रिपब्लिक डे परेडमध्ये एनसीसीकडून सामील झाला. त्याला कोणत्या ना कोणत्या कलेने लोकांचं ध्यान आकर्षित करण्याची खूप आवड होती. यातच त्याला अभिनयाचा किडा चावला.
त्यामुळे त्यांच्या अभिनयाच्या आवडीला पुढं करीयर म्हणून सवड मिळाली. मद्रासच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला. तिथं सुद्धा त्याच्या अभिनया, स्टाईलची हवा होती. हा पुढे जाऊन मोठा हिरो बनणार हे सगळ्यांनाच ठाऊक होतं .
१९७८ साली त्याला तेलगू सिनेमात सुरवातीला त्याला छोटे रोल मिळाले. त्यात त्याने चमक दाखवली.
चिरंजीवीची रांगडी स्टाईल, त्याची ऍक्शन बघून काही काळ तर त्याला व्हिलनचे रोलच मिळत होते. तामिळ आणि तेलगू मध्ये चिरंजीवीने कमल हासन पासून ते रजनीकांत समोर व्हिलन म्हणून उभे राहण्याचे धाडस दाखवले.
नुसता व्हिलन म्हणून तो उभा राहिला नाही तर हिरो पेक्षाही जड जाणारा व्हिलन बनला. अखेर १९८२ साली आलेल्या इंटलो रमय्या विधीलो कृष्णय्या या सिनेमातुन त्याला हिरो म्हणून ब्रेक मिळाला. हा सिनेमा हिट झाला. या पाठोपाठ आलेल्या सुभलेखा या सिनेमाने चिरंजीवीला पहिला फिल्म फेअर मिळवून दिला.
तिथून त्याने माघारी वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक यशाची शिडी तो चढत गेला.
आज चिरंजीवीला डान्सिंग रिव्हॉल्युशन आणणारा स्टार म्हणतात पण सुरवातीला त्याला डान्सची अजिबात काही आवड नव्हती. एक दिवस त्याने ‘ पिया अब तू आजा ’ या गाण्यावर नाचताना हिंदी चित्रपट सृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री हेलनला पाहिलं. आणि तिथून पुढे त्यांनी नाचण्याचं इतकं मनावर घेतलं की प्रत्येक चित्रपट त्यांच्या डान्स मुळे लोकप्रिय झाला.
चिरंजीवीने ब्रेक डान्स पासून शास्त्रीय नृत्यापर्यंत प्रत्येक डान्स स्टाईलमध्ये आपणच बॉस आहे हे दाखवून दिले. चिरंजीवीमुळे तामिळ तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब्रेक डान्स ची लाट आली. आज आपण अल्लू अर्जुन, राम चरण तेजा सारखे डान्समधले स्टार पाहतो याचे क्रेडिट चिरंजीवीलाच जाते.
नव्वदच्या दशकात चिरंजीवी सुपरस्टार झाला होता. फक्त तामिळ तेलगू नाही तर हिंदी फिल्ममधूनही त्याला बोलावणं येत होत. नाही म्हणायला त्याने प्रतिबंध आणि आज का गुंडाराज असे दोन सिनेमे केले पण तो रमला दक्षिणेतच.
जेव्हा त्याची फिल्म रिलीज व्हायची त्याच्या आधीच लोकं थियेटर बाहेर रांगा लावायचे. प्रचंड गर्दी व्हायची. प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिस फोडून बिझनेस करत होता.एकदा त्यांच्या एका चित्रपटासाठी खूप गर्दी जमली होती, ती पोलिसांच्या सुद्धा आटोक्यातून बाहेर गेली. शेवटी चेंगराचेंगरी होऊन चार ते पाच माणसं मरण पावले होते.
आपण गर्दी आंदोलन, सभा यांसाठी पाहतो; पण एका अभिनेत्याच्या प्रेमापोटी प्रचंड जनसमुदाय चित्रपट पाहायला येणं, हे खरच खूप अद्भुत आहे. जे इतर इंडस्ट्रीमध्ये मात्र पाहायला मिळत नाही.
१९८७ साली चिरंजीवी भारतातला पहिला अभिनेता होता ज्याला हॉलिवूडच्या ऑस्कर अवॉर्डने पुरस्कार वितरण समारंभात पाहुणा म्हणून बोलावले होते.
१९९२ सालच्या घराणं मोगडू या चिरंजीवीच्या सिनेमाने तेलगू फिल्म इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदा १० कोटी च्या वर कमाई करता येते हे दाखवून दिले. त्यानंतर एका पाठोपाठ एक विक्रम करतच गेला. त्याचवर्षी चिरंजीवीने एका सिनेमासाठी सव्वा कोटी रुपये इतके मानधन घेतले.
ज्याची चर्चा गॉसिप मॅगझीन मध्ये BIGGER THAN BACHCHAN अशी केली गेली.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये शाहरुख,सलमान, आमिर या खानांचा उदय झाला होता. त्यांचे सिनेमे प्रचंड गाजत होते. हिंदी मीडिया त्यांना सुपरस्टार म्हणून नावाजत होती. मात्र त्याही काळात चिरंजीवीच्या निम्मी देखील लोकप्रियता त्यांना मिळत नव्हती.
आमिर खानने एका सिनेमाला ६कोटी रुपये घेऊन विक्रम केला असं म्हटलं जात होतं पण मेगास्टार चिरंजीवी एका प्रादेशिक भाषेतल्या सिनेमात काम करत असून ७ कोटी रुपये मानधन घेत होता.
फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील चिरंजीवीचे फॅन फॉलोविंग जबरदस्त होते. त्याचे सिनेमे रशियन भाषेत डबा होत होते. त्याला हॉलिवूड सिनेमाची ऑफर आली होती. The Return of the Thief of Baghdad, या सिनेमाची सगळी तयारी देखील झाली होती पण ऐनवेळी काही तरी माशी शिंकली आणि सिनेमा डब्ब्यात गेला.
२००२ साली चिरंजीवीने एक सिनेमा बनवला जो अजरामर आहे.
इंद्रा द टायगर.
सोनाली बेंद्रे, मुकेश ऋषी, प्रकाश राज, आरती अग्रवाल अशी मोठीच्या मोठी टीम सिनेमात आहे. पण पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत संपूर्ण सिनेमात चिरंजीवी भरून राहिला आहे. या सिनेमाने तेलगू मधले सगळे रेकॉर्ड मोडले, सगळे अवॉर्ड खिशात टाकले. फक्त तेलगूच नाही तर हिंदीत डब होऊन तो सेट मॅक्स वर दाखवला जातो आणि त्याचे भक्त किती वेळा जरी हा सिनेमा दाखवला तरी तितक्या वेळा बघतात.
हिंदी मध्ये मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर साउथ मध्ये रिमेक करायचं जेव्हा ठरलं तेव्हा त्या भूमिकेला न्याय देईल असं एकच नाव चर्चेत होतं, ते म्हणजे अभिनेते चिरंजीवी.
हा शंकर दादा गाजल्यानंतर मात्र साउथ मध्ये अभिनय करताना चिरंजीवी बरेच वर्षं दिसले नाही. कारणही तसं वेगळच होतं. त्यांनी अभिनयासोबत राजकारणाचा नवा प्रवास सुरु केला होता.
२००७ नंतर त्यांनी राजकारणाची नव्या इनिंगची सुरुवात केली. स्वतःची प्रजाराज्जम पार्टी तयार केली. त्यानंतर निवडणूक लढवली. ती जिंकली, पण मेगास्टारला आंध्रप्रदेशचा मुख्यमंत्री होणे जमले नाही.
अखेर आपला पक्ष काँग्रेसमध्ये जाऊन ते केंद्रीय पर्यटन मंत्री झाले.
राजकीय करीयर मध्ये काम करत असताना चित्रपट करण्यासाठी त्यांना वेळ निघणं अवघड झालं. त्यात त्यांच्या फॅन्सची मागणी जोर धरू लागली की बॉस पुन्हा चित्रपटात या. आमच्या मनोरंजनाच्या दुनियेला तुमच्या अभिनयाने भरून काढा. शेवटी मग तब्बल दहा वर्षांनी त्यांनी पुन्हा २०१८ ला एक चित्रपट केला.
त्या चित्रपटाचं नाव होतं कैदी नंबर १५० कारण ही त्यांची १५० वी फिल्म होती. या चित्रपटाची निर्मिती त्यांचा मुलगा मगधिरा फेम रामचरण तेजाने केली होती.
२००६ मध्ये पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव भारताने केलेला आहे.
हे ही वाच भिडू.
- ब्रह्मानन्दम : थपडा खाऊन स्टार बनलेला माणूस.
- महाराष्ट्राच्या जावईबापूंच्या जीवावर सलमान खानचं करियर धक्याला लागलं..
- ….तर रजनीकांत हवेत सिगरेट उडवू शकला नसता !